

पिंपरी, ता. १९ ः छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्साह उद्योगनगरीत बुधवारी (ता. १९) दिसून आला. शहरातील विविध ठिकाणी छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आले. तसेच विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले.
महापालिकेच्यावतीने अभिवादन
पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने शिवजयंतीनिमित्त शहरातील विविध ठिकाणी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. आयुक्त शेखर सिंह यांनी भक्ती शक्ती चौक उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी पिंपरी चिंचवड महापालिका मुख्य प्रशासकीय भवनातील प्रतिमेस तसेच शहरातील पिंपरी वाघेरे, रहाटणी चौक, एच. ए. कॉलनी पिंपरी, कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी, लांडेवाडी चौक भोसरी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी थेरगाव गावठाण, डांगे चौक थेरगाव आणि प्रेमलोक पार्क चिंचवड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उपायुक्त राजेश आगळे यांनी भोसरी येथील पीएमटी चौक, मोशी, चऱ्होली येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी व स्थानिक नेते उपस्थित होते.
शाहू वाचनालयाच्यावतीने अभिवादन
शाहूनगर, चिंचवड येथील शाहू वाचनालयाच्यावतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. वाचनालयाचे ज्येष्ठ संचालक भरत गायकवाड यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. छत्रपती शिवरायांच्या कार्याची माहिती उपस्थितांना सांगण्यात आली. याप्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष बालकिशन मुत्याल, उपाध्यक्ष राजेंद्र घावटे, सचिव राजाराम वंजारी, खजिनदार राजेंद्र पगारे, ग्रंथपाल अनिता पाटील, प्राजक्ता पवार, रवींद्र अडसूळ आणि वाचक वर्ग उपस्थित होता.
राष्ट्रवादीच्या कार्यालयात शिवजयंती
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या खराळवाडी येथील मध्यवर्ती कार्यालयात शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. योगेश बहल म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या शौर्याचे प्रतीक आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक नाव नसून शौर्य, समता, प्रेरणा आणि आस्थेचे केंद्र आहे.’’
यावेळी प्रदेश सरचिटणीस ॲड. गोरक्ष लोखंडे, युवक अध्यक्ष शेखर काटे, विद्यार्थी अध्यक्ष चेतन दुधाळ, माजी उप महापौर मोहम्मदभाई पानसरे, जगन्नाथ साबळे, माजी नगरसेवक प्रकाश सोमवंशी, सतीश दरेकर,
काळूराम पवार, राजू बनसोडे, राजू लोखंडे, माजी नगरसेविका शमीम पठाण, अमिना पानसरे, मायला खत्री, प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
दुर्गा टेकडीवर व्याख्यान
दुर्गा टेकडीवरील सर्वोच्च ठिकाणी असलेल्या सुप्रभात योग मंदिर येथे आयोजित शिवजयंती कार्यक्रमात ‘युगप्रवर्तक छत्रपती शिवराय’ या विषयावर व्याख्यान झाले. ज्येष्ठ व्याख्याते राजेंद्र घावटे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाविषयी माहिती दिली. सुप्रभात मित्र मंडळ व सूर्यनमस्कार ग्रुपच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सामाजिक कार्यकर्ते अशोक मोहिते यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. शाहीर प्रकाश ढवळे, रवींद्र मोहिते, भगवान पठारे, संपत शिंदे, अंकुश बंडगर, बाबा नायकवडी, विजय शिंदे, राकेश भोंडवे, पवन पवार, गजानन ढमाले, ज्ञानेश्वर सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. रवींद्र मोहिते यांनी प्रास्ताविक केले.
मोहननगर येथे पुतळ्याला अभिवादन
मोहननगर मधील शिवदर्शन कॉलनी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला शिवजयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी अ क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकारी शीतल वाकडे, आरोग्य अधिकारी राजू साबळे, पोलिस अधिकारी दिलीप बोकेफोडे, दिगंबर बालुरे, अप्पा मोरे, सुरेश भिसे व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
स्वराज्य ग्रुपच्यावतीने अभिवादन
शिवजयंतीनिमित्त स्वराज ग्रुपच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. यावेळी ग्रुपचे अध्यक्ष विजय चौधरी यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संदीपान झोंबडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, झोपडपट्टी सेल अध्यक्ष संतोष निसर्गंध, माजी सरपंच अरविंद तरकसे, तुषार गवारे, संगीता अष्टेकर, सुप्रिया सोनवणे, राम केंगार, उमेश होनमाने, श्याम टेंगार व पदाधिकारी उपस्थित होते.
‘आप’च्या वतीने अभिवादन
आम आदमी पार्टीच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आकुर्डी गावठाण येथे साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात आम आदमी पार्टीच्या पिंपरी चिंचवड शहराच्या अध्यक्षा मीना जावळे, वैजनाथ शिरसाट, सुरेश बावनकर, भारती जाधव, सुनंदा पालेकर, दीक्षा पालेकर व इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रमणी जावळे यांनी केले.
अभिनेत्री आर्या घारेकडून प्रबोधन
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. त्यामुळे त्यांचे चरित्र अवगत करण्यासाठी ‘नाचून नव्हे शिवचरित्र वाचून शिवजयंती साजरे करूया’ हा उपक्रम अभिनेत्री आर्या घारे हिने शिवजयंतीनिमित्त राबवला. आर्या घारे हिने आपल्या मैत्रिणींसह पिंपरी मोरवाडी चौक येथे शिवचरित्राचे वाटप करून शिवजयंती साजरी केली. मोरवाडी चौकात जवळपास तीन हजार पुस्तकांचे तिने वाहन चालकांना व नागरिकांना वाटप केले. यात चौकात बंदोबस्ताला असलेल्या वाहतूक पोलिसांनादेखील हे चरित्र देऊन तिने शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. पारंपारिक पोशाख करून तिने राबवलेल्या या उपक्रमाचे हजारो लोकांनी कौतुक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.