वाहनचालकांना भूर्दंड, दर कमी करण्याची मागणी
‘हायड्रो टेस्टिंग’ दरवाढीने वाहनचालकांची ‘होरपळ’
चौपट दरवाढीने फटका : ‘आरटीओ’ने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २५ : ‘सीएनजी’ इंधनावरील वाहनांच्या सिलिंडर ‘हायड्रो टेस्टिंग’साठी एक फेब्रुवारीपासून तब्बल २,८०० रुपये मोजावे लागत आहेत. या दरात अचानक चौपट वाढ करण्यात आली आहे. याचा थेट फटका वाहनचालकांना बसत आहे. दरम्यान, या दरवाढीबाबत ‘आरटीओ’ अर्थात प्रादेशिक परिवहन विभागाने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली जात आहे.
पेट्रोल आणि डीझेलच्या तुलनेत ‘सीएनजी’ (कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस) स्वस्त आहे. शिवाय, हे इंधन पर्यावरणपूरक असल्याने अनेकजण या वाहनांना प्राधान्य देतात. तसेच नवीन वाहन घेताना पेट्रोल आणि ‘सीएनजी’ हायब्रिड वाहने घेण्यास प्राधान्य देतात. सुरक्षेच्या दृष्टीने सर्व सीएनजी वाहनांच्या सिलिंडरची ‘हायड्रो टेस्ट’ दर तीन वर्षांनी करणे बंधनकारक आहे. कारमधील सीएनजी सिलिंडर हायड्रो टेस्टसाठी पूर्वी १,००० रुपये आणि रिक्षासाठी ७०० रुपये घेतले जायचे. मात्र, आता हे दर सरसकट २,८०० रुपये करण्यात आले आहेत.
------
हायड्रो टेस्टिंग म्हणजे काय?
सीएनजी किट रिट्रोफिटिंग करणाऱ्या केंद्रावर हायड्रो टेस्टिंग केली जाते. वाहनात बसवलेल्या हायड्रो सिलिंडरची क्षमता किती आहे, सिलिंडर जोडणी, सिलिंडरची गळती होते का? अशी महत्त्वाची तपासणी करून सिलिंडर वापरण्यास योग्य आहे की नाही हे ठरविले जाते.
----
दर तीन वर्षांनी तपासणी आवश्यक
नियमानुसार सर्व ‘सीएनजी’ वाहनांना दर तीन वर्षांनी सिलिंडरची हायड्रो टेस्टिंग बंधनकारक आहे. विहित वेळेत तपासणीनंतर ‘सीएनजी’ वाहन रस्त्यावर नेण्यास योग्य आहे का? याची खातरजमा करूनच सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र दिले जाते.
-----
कोठे कराल तपासणी?
अधिकृत सीएनजी डीलरकडे सीएनजी किट रिट्रोफिट करून घेऊ शकता. जेथे सीएनजी किट बसवले जाते, त्याच केंद्रावर हायड्रो टेस्टिंग तपासणी करावी लागते. त्यासाठी संबंधित केंद्रचालकांना शासनाने तशी नियमावली करून दिली आहे.
-----
टेस्टिंगचे फायदे
- ‘सीएनजी’ सिलिंडर आणि यंत्रणेच्या सुरक्षेची माहिती समजते
- वाहनात बिघाड आणि धोका टाळण्यासाठी
- आरटीओकडून वाहनांचे पासिंग वेळेत होते.
----------
हायड्रो टेस्टिंगसाठी लागणाऱ्या साहित्यात वाढ झालेली नाही. मग अचानक कसे इतके दर वाढविले, हे समजले नाही. याबाबत तोडगा काढण्यासाठी हायड्रो टेस्टिंग करणारे आणि वाहन चालकांच्या संघटनेबरोबर बैठक घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी ‘आरटीओ’ला दिले आहेत. त्याला महिना उलटला आहे. पण, ही बैठक झालेली नाही.
- बापू भावे, अध्यक्ष, रिक्षा फेडरेशन
गेल्या पंधरा वर्षांपासून हायड्रोटेस्टिंगचे दर वाढलेले नाहीत. कामगारांचे पगार, जागेचे भाडे, साहित्य आणि इतर सर्वांच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे आम्ही हायड्रोटेस्टचे दर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
- विवेक ढेरंगे, मालक, हायड्रो टेस्टिंग सेंटर
---------
पिंपरी चिंचवड शहरातील स्थिती
‘सीएनजी’वरील वाहने - २९,६२५
पेट्रोल/सीएनजी वाहने - १,५६,४९२
सीएनजी पंप - ६५
हायड्रो टेस्टिंग सेंटर - २३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

