देशाचे डोळे अन् कान बना
पिंपरी, ता. २५ ः ‘‘देशापुढे बाह्य सुरक्षा आणि अंतर्गत सुरक्षा अशी दोन आव्हाने आहेत. चीन, पाकिस्तान आणि बांगलादेश हे आपले प्रमुख शत्रू राष्ट्र आहेत. माओवाद, नक्षलवाद हे चीनने भारताविरुद्ध चालवलेले छुपे युद्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी देशाचे डोळे आणि कान बनावे,’’ असे आवाहन ब्रिगेडिअर (निवृत्त) हेमंत महाजन यांनी केले.
शिवशंभो फाउंडेशनतर्फे महाशिवरात्रीनिमित्त शाहूनगर येथील शिवशंभो मंदिराच्या प्रांगणात आयोजित शिवशंभो व्याख्यानमालेत ‘भारतापुढील संरक्षणाची आव्हाने’ विषयावरील व्याख्यानात महाजन बोलत होते. ज्येष्ठ उद्योजक बजरंग गडदे, व्याख्याते राजेंद्र घावटे, कामगार नेते सुजीत साळुंखे, फाउंडेशनचे संस्थापक केशव घोळवे, अध्यक्ष संजय तोरखडे आदी उपस्थित होते.
महाजन म्हणाले, ‘आर्थिक घुसखोरी हे चीनचे धोरण आहे. भारतीयांना लागलेली स्वस्त चिनी मालाची सवय, चिनी बनावटीचे मोबाइल आणि गॅझेट्स यामुळे मोठ्या प्रमाणावर माहितीची चोरी होते. त्यासाठी चिनी मालावर बहिष्कार हा सर्वात प्रभावी उपाय आहे. जगात कोठेही दहशतवादी हल्ला झाला तर त्यात पाकिस्तानचा हात असतो. मात्र, याच दहशतवादामुळे पाकिस्तान रसातळाला गेला असून, समोरासमोर लढायची त्याची ताकद राहिलेली नाही. तरीही सीमेपलीकडून ड्रोनच्या साहाय्याने पाकिस्तान भारतात ड्रग्ज पाठवत असतो. बांगलादेशात राजकीय अस्थैर्य वाढल्याने बांगलादेशी घुसखोर हा आपल्या देशाला झालेला कर्करोग आहे. त्यासाठी पोलिसांची संख्या वाढविणे, दहशतवादातील खटल्यात जलद न्यायव्यवस्था आणि राजकीय इच्छाशक्ती या गोष्टींनी बाह्यसुरक्षा सक्षम करता येईल. देशद्रोही स्वयंसेवी संस्था, डाव्या विचारसरणीच्या संस्था, विकासविरोधी आंदोलनजीवी या घटकांमुळे अंतर्गत सुरक्षेचे मोठे आव्हान देशापुढे आहे. यावर मी नागरिक म्हणून देशासाठी काय करू शकतो हा प्रश्न प्रत्येकाने अंतर्मुख होऊन स्वतःला विचारला पाहिजे आणि कृतिशील झाले पाहिजे.’’
‘स्वजाणिवेचे विज्ञान म्हणजे अध्यात्म’
‘शांत चित्ताने एका जागी स्थिर बसून मनात येणाऱ्या अनेक विचारांवर नियंत्रण मिळवीत मनाची केलेली निर्विकार अवस्था म्हणजे योग होय. तर, स्वतःला जाणून घेण्याचे विज्ञान म्हणजे अध्यात्म होय,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ योगसाधक रिता कलावार यांनी केले. ‘विज्ञान व अध्यात्म’ विषयावर कलावार बोलत होत्या. ज्येष्ठ उद्योजक नितीन काकडे, व्याख्यानमाला समन्वय समिती अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे आदी उपस्थित होते. कलावार म्हणाल्या, ‘‘भारतीय अध्यात्माची परंपरा खूप प्राचीन आहे. आता त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने जगाला त्याचे महत्त्व कळाले आहे. ‘ज्ञानेश्वरी’त वर्णन केलेल्या आभामंडळाचे महत्त्वही आता कळू लागले आहे. ध्यानातून विज्ञान आणि अध्यात्म जोडले जाऊ शकते, त्यामुळे ध्यान करणे आवश्यक आहे.’’ महाशिवरात्री महोत्सवात शिशुगट ते नववीपर्यंत चार गटातून सुमारे साडेचारशे विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धेत सहभाग नोंदवला. विविध गुणदर्शन स्पर्धेत ‘महापुरुषांची वेषभूषा’ करून विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचा संदेश दिला. राजेंद्र पवार यांनी सूत्रसंचालन केले. सविता बारवकर यांनी आभार मानले.
--
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

