शाळकरी मुलांना ‘जेई’ लसीकरण
पिंपरी, ता. २५ : ‘जापनीज एन्सेफलायटीस’ अर्थात ‘जेई’ हा विषाणूजन्य आजार रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने पुढाकार घेतला आहे. यात प्रामुख्याने शाळकरी मुलांना लसीकरण केले जाणार आहे. यासाठीची मोहीम एक मार्चपासून सुरू करण्यात येणार आहे.
याबाबतची बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती. यावेळी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयाचंद्र दादेवार, शिक्षण सहायक आयुक्त विजयकुमार थोरात, प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांच्यासह वैद्यकीय, शिक्षण विभाग अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
‘जेई’ हा विषाणूजन्य आजार असून, तो प्रामुख्याने १५ वर्षांखालील मुलांना होतो. या आजारामुळे गंभीर मज्जातंतू विकार होण्याची शक्यता असते. तसेच त्याचा मृत्यूदरही अधिक आहे. ३० ते ४० टक्के बरे झालेल्या मुलांमध्ये विशिष्ट परंतु मज्जातंतूशी संबंधित दिव्यांगत्व आयुष्यभर राहते. त्यामुळे या आजारापासून बचावासाठी लसीकरण करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. विद्यार्थ्यांना लसीकरणाचे महत्त्व पटवून देऊन पालकांसाठी जनजागृती सभा आयोजित कराव्यात. शाळेतील विद्यार्थ्यांची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांना उपलब्ध करून द्यावी. लसीकरण सत्रासाठी जागा आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. सर्व विद्यार्थ्यांनी लस घेतली आहे, याची खात्री करावी, अशा विविध सूचना देण्यात आल्या.
---------
चौकट : लसीकरण मोहिमेचे स्वरूप -
- १ मार्चपासून शहरात मोहीम राबविली जाणार.
- १ ते १५ वर्षे वयोगटातील सर्व मुलांचे शाळा आणि समाज स्तरावर मोफत लसीकरण होणार.
- राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत ही लस सुरक्षित आणि प्रभावी आहे.
कोट
‘जेई’ प्रतिबंधक लसीकरण ही महत्त्वाची मोहीम आहे. पालक व शिक्षकांनी या उपक्रमात सक्रीय सहभाग घ्यावा. प्रत्येक बालकाला लसीकरण मिळावे, यासाठी प्रयत्न करावेत. संपूर्ण समाजाने या मोहिमेस सहकार्य करून आपल्या पुढील पिढीचे आरोग्य सुरक्षित करणे आवश्यक आहे.
- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

