एसटीतील प्रवाशांची सुरक्षेचा प्रश्‍ऩ ऐरणीवर

एसटीतील प्रवाशांची सुरक्षेचा प्रश्‍ऩ ऐरणीवर

Published on

‘पॅनिक बटन’ केवळ शोभेपुरतेच आहे का?
एसटी बसमधील यंत्रणा बंद : प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर

पिंपरी, ता. २६ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) मंडळाच्या ताफ्यातील बहुतांश बसमध्ये ‘पॅनिक बटन’ नाहीत. तर, नवीन बसमध्ये ही यंत्रणा असली तरी बहुतांश बटन बंद आहेत. स्वारगेट येथील लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर प्रवाशांच्या सुरक्षा आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी बसमधील ‘पॅनिक बटन’ केवळ शोभेची वस्तू आहे का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.
एसटी महामंडळाच्या ताफ्यात सुमारे १४ हजार ५०० बस आहेत. त्यामधून दररोज सुमारे ४५ लाखांहून अधिक जण प्रवास करतात. प्रवासी सुरक्षा लक्षात घेऊन रस्ते वाहतूक मंत्रालयाने सर्व टॅक्सी, बस आणि सार्वजनिक वाहनांमध्ये ‘व्हेइकल ट्रॅकिंग डिव्हाइस’ (व्हीटीएस) किंवा ‘जीपीएस’ आणि ‘पॅनिक बटन’ बसविण्याची सक्ती केली होती. त्यामुळे एक जानेवारी २०१९ नंतर एसटीच्या ताफ्यात दाखल झालेल्या बसमध्ये हे बटन आहेत. मात्र, अशा बसची संख्या सुमारे अडीच हजार आहे. त्यातही बहुतांश पॅनिक बटन बंद आहेत. तर, जुन्या बसमध्ये अशी यंत्रणाच नाही. त्यामुळे आपत्कालीन परस्थिती उद्भवल्यास प्रवाशांना मदतीसाठी कोणतीही व्यवस्था नाहीत. तसेच एसटीचे स्वतंत्र राज्यस्तरीय कंट्रोल सेंटर नसल्यामुळे पॅनिक बटन केवळ शोभेची वस्तूच असल्याचे दिसून येते.

...तर तरुणीला मदत मिळाली असती!
प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेले राज्यस्तरीय ‘कमांड कंट्रोल सेंटर’ अंधेरी येथे उभारले जात आहे. राज्यातील एसटीसह सर्व सार्वजनिक प्रवासी वाहने या केंद्राला जोडली जाणार आहेत. महिलांना प्रवासादरम्यान असुरक्षित वाटल्यास किंवा बसमधील कोणी गैरकृत्य केल्यास मदत मागण्यासाठी ‘पॅनिक बटन’चा वापर करता येणार आहे. हे बटण दाबल्यानंतर अंधेरी येथील ‘कमांड कंट्रोल सेंटर’ला त्याची माहिती मिळेल. या केंद्राचे लवकरच उद्घाटन होणार आहे. पण, सध्या तरी एसटीसह राज्यातील कोणतीही परिवहन संस्थेच्या बस अजूनही ‘कंमाड कंट्रोल’शी जोडलेल्या नाहीत. जर हे सेंटर सुरू असते, तर स्वारगेट येथील घटनेतील पीडितेला तत्काळ मदत मिळाली असती.

‘पॅनिक बटन’बाबत जनजागृती आवश्‍यक
सार्वजनिक प्रवासी वाहनांमध्ये खिडकीच्या वरील बाजूस लाल रंगाचे पॅनिक बटन असते, साधारपणे एक बसमध्ये चार ‘पॅनिक बटन’ असतात. आपत्कालीन परिस्थितीत हे बटन दाबल्यास तत्काळ मदत मिळणे अपेक्षित असते. पण, याची फारशी माहिती सामान्य प्रवाशांना नसते. शिवाय, एसटी महामंडळाने याबाबत फारशी जनजागृती केलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com