‘पिंपरी-चिंचवड’चे कारभारी १२८ च

‘पिंपरी-चिंचवड’चे कारभारी १२८ च
Published on

पिंपरी, ता. ११ : महापालिका निवडणुकीसाठी चार सदस्यांचा प्रभाग करण्याचा आदेश सरकारने दिला आहे. त्यानुसार प्रारूप प्रभाग रचनेचे काम सुरू होईल. त्यासाठी २०११ ची लोकसंख्या ग्राह्य धरली जाणार आहे. मात्र, गेल्या पंधरा वर्षांत लोकसंख्या पर्यायाने मतदारसंख्याही वाढलेली आहे. त्यामुळे मतदान केंद्रांची संख्या वाढेल, पण नगरसेवकांची संख्या २०१७ इतकी म्हणजेच १२८ च राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने एप्रिलमध्ये दिला. त्यानुसार सरकारने मुंबईवगळता राज्यातील सर्व महापालिकांची निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात पिंपरी-चिंचवडचाही समावेश आहे. ही निवडणूक २०११ च्या जनगणनेनुसार २०१७ च्या चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होईल. त्यासाठी १२८ जागांसाठी ३२ प्रभाग असतील. असे असले, तरी कायद्यानुसार प्रारूप प्रभाग रचना तयार करावी लागेल. त्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन होईल. त्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्राची संपूर्ण माहिती असलेला अधिकारी, प्रभाग रचनेशी संबंधित नेमलेला अधिकारी, नगर रचनाकार, संगणक तज्ज्ञ यांचा समावेश असेल. ते प्रारूप प्रभाग रचना जाहीर करतील. त्यावर हरकती व सूचना मागविण्यात येतील. त्यांवर सुनावणी होऊन अंतिम प्रभाग रचना जाहीर होईल. मतदानासाठी मतदार अर्हता दिनांक जाहीर होऊन नवीन मतदान नोंदणी सुरू राहील. त्या तारखेनंतर प्रारूप मतदार यादी जाहीर करून त्यावर हरकती व सूचना मागवण्यात येतील. त्यावर सुनावणी होऊन अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल.

दृष्टिक्षेपात शहराची लोकसंख्या
२०११ च्या जनगणनेनुसार एकूण : १७,२७,६९२
अनुसूचित जाती (एससी) : २,७३,८१०
अनुसूचित जमाती (एसटी) : ३६,५३५

३२ प्रभागांनुसार आरक्षण
प्रवर्ग / एससी / एसटी / ओबीसी / खुला / एकूण
खुला / १० / १ / १७ / ३६ / ६४
महिला / १० / २ / १८ / ३४ / ६४
एकूण/ २० / ३ / ३५ / ७० / १२८
(एससी : अनुसूचित जाती, एसटी : अनुसूचित जमाती, ओबीसी : नागरिकांचा मागास प्रवर्ग, खुला : सर्वसाधारण)

महापालिका निवडणुकीसाठी नजीकच्या काळातील म्हणजेच २०११ ची लोकसंख्या निश्चित धरून १२८ जागांसाठी प्रभाग रचना केली जाईल. त्यावर हरकती व सूचना मागवल्या जातील. मतदान केंद्रांवरील मतदार संख्या व त्यानुसार मतदान केंद्र संख्या निश्चित केली जाईल.
- अविनाश शिंदे, सहायक आयुक्त, निवडणूक विभाग, महापालिका

यापुढील कार्यवाही...
- महापालिका निवडणूक प्रभागांमध्ये आरक्षण निश्चितीचा नियम जाहीर केला जाईल
- आरक्षण निश्चितीचा नियम जाहीर झाल्यानंतर निवडणूक आयोग प्रभाग रचना करण्याबाबत आदेश जारी करेल
- प्रभाग रचना, आरक्षण सोडत व सुनावणी असा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोग जाहीर करेल
- अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी आरक्षित प्रभागांसह प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव महापालिका आयुक्त तयार करतील
- अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी आरक्षित प्रभागांसह प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव तपासणीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविला जाईल
- अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी आरक्षित प्रभागांसह प्रारूप प्रभाग रचनेच्या प्रस्तावास राज्य निवडणूक आयुक्त मान्यता देतील
- नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिलांसाठी आरक्षण सोडत काढण्यासाठी महापालिका आयुक्त जाहीर नोटीस प्रसिद्ध करतील
- नागरिकांचा मागास प्रवर्ग (इतर मागासवर्गीय तथा ओबीसी) व महिलांसाठी आरक्षण सोडत काढली जाईल
- आरक्षण सोडतीनंतर प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना महापालिका आयुक्तांकडून राजपत्रात प्रसिद्ध केली जाईल
- प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना महापालिका आयुक्त मागवतील
- प्रारूप प्रभाग रचनेवरील प्राप्त हरकती व सूचनांवर सुनावणी होईल
- प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकती व सूचनांवर सुनावणी घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी केलेल्या शिफारशी नमूद करून त्या राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केल्या जातील.
- प्रारूप प्रभाग रचनेवर प्राप्त हरकती व सूचनांचा काळजीपूर्वक विचार करून निवडणूक आयोग निर्णय देईल
- प्रभाग रचनेच्या सुनावणीनंतर झालेल्या निर्णयानुसार प्रभाग रचना अधिसूचना व नकाशामध्ये योग्य ते बदल करून प्रभाग रचनेची अंतिम अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध केली जाईल
- मतदार यादी ग्राह्य धरण्याचा दिनांक जाहीर होईल
- महापालिका आयुक्त निवडणूक कार्यक्रमाची सूचना प्रसिद्ध करतील
- उमेदवारी (नामनिर्देशन पत्र) अर्ज विक्री व स्वीकृती कार्यक्रम होईल
- उमेदवारी अर्जांची छाननी व उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल
- उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असेल
- उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप, उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध, मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध, मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल
- मतदान व मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल.
--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com