

पिंपरी, ता. ११ ः ‘‘आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता ‘संकल्प ते सिद्धी’ अभियानाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या विविध विकास योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवा. यामध्ये चार कोटी लोकांना पक्की घरे, ‘हर घर जल’, आयुष्मान भारत अशा योजनांचा समावेश आहे. या कामगिरीची आणि सरकारच्या विकासकामांची माहिती मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोचविणे आवश्यक आहे. २०४७ पर्यंत विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करा,’’ असे आवाहन भाजपचे प्रदेश महामंत्री राजेश पांडे यांनी केले.
पिंपरी-चिंचवड शहरात गोविंद गार्डन बॅंक्वेट हॉल पिंपळे सौदागर येथे ‘विकसित भारत संकल्प सभा आणि जिल्हा कार्यशाळा’ झाली. त्यावेळी पांडे बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला ११ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भाजपने देशभरात ‘संकल्प ते सिद्धी’ अभियान सुरू केले आहे. त्याअंतर्गत आयोजित कार्यशाळेत जिल्हा प्रभारी वर्षा डहाळे, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, अमित गोरखे, माजी आमदार अश्विनी जगताप आदी उपस्थित होते.
काटे म्हणाले, ‘‘संकल्प ते सिद्धी अभियानांतर्गत १० ते १२ जून या काळात जिल्हास्तरावर प्रदर्शने, संवाद सत्रे आणि कार्यशाळा आयोजित केल्या जात आहेत. याव्यतिरिक्त १६, १७ आणि १८ जून दरम्यान विविध ठिकाणी कार्यक्रम घेण्यात येतील. पाच जून रोजी एक वृक्ष मातृभूमीसाठी हे विशेष अभियान सुरू केले आहे. २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर १७ ते २० जून दरम्यान योग सत्र आयोजित केली आहेत. आणीबाणीस स्मरून देशभरात जनजागृती कार्यक्रम होणार आहेत.’’ संयोजक संजय मंगोडेकर यांनी प्रास्ताविक केले. मोरेश्वर शेडगे यांनी सूत्रसंचालन केले. विकास डोळस यांनी आभार मानले.
‘सबका साथ, सबका विकास’ या सरकारच्या ध्येयानुसार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय भूमिका बजावणे आवश्यक आहे. संघटनात्मक बांधणी आणि जनसंपर्क महत्त्वाचा आहे. सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावे. आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या कार्यक्रमांद्वारे लोकांना सरकारच्या कामगिरीबद्दल माहिती देऊन, त्यांना विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घ्या.
- महेश लांडगे, आमदार, भोसरी
फोटो ः 21953
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.