

अमोल शित्रे ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १६ ः मावळातील कुंडमळा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आढावा घेतला तर पिंपरी-चिंचवड शहराच्या सीमावर्ती भागातून ग्रामीण भागाला जोडणारा मामुर्डी ते सांगवडे पवना नदीपात्रावरील साकव धोक्याचे संकेत देत आहे. मागील २५ ते ३० वर्षे जुन्या लोखंडी पुलावरून ये-जा करणे जिवावर बेतण्याची शक्यता असल्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेने याठिकाणी सिमेंटचा उड्डाणपूल बांधण्यास सुरुवात केली आहे. या पुलामुळे ग्रामीण भागात सध्या दहा ते बारा किलोमीटरचा वळसा घालून जाणाऱ्या नागरिकांचे प्रवासाचे अंतर कमी होणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून ग्रामीण भागात जाण्यासाठी मागील २५ ते ३० वर्षापूर्वी बांधलेल्या लोखंडी पुलाचा (साकव) वापर करावा लागतो. या पुलाची क्षमता दिवसेंदिवस कमी होत चालल्याने पुणे जिल्हा अधिकारी यांच्याकडून पुलावरून जाण्यासाठी केवळ पादचारी आणि दुचाकीस्वारांनाच परवानगी देण्यात आली आहे. तरी, काही चारचाकी वाहने घेऊन नागरिक या अरुंद पुलावरून जीवघेणा प्रवास करत आहेत. पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाचा लगतच्या ग्रामीण भागातील नागरिकांना फायदा व्हावा, यासाठी महापालिकेने मामुर्डी-सांगवडे जोडण्यासाठी पवना नदी पात्रावर उड्डाणपूल बांधण्यास सुरुवात केली आहे. पुलाच्या कामाला गती देण्यासाठी महापालिकेने १४ फेब्रुवारी २०२२ रोजी निविदा काढली.
मात्र, मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणूक काळात पुलाची निविदा प्रक्रिया सहा महिने रखडली होती. त्यानंतर पुढील सर्व प्रक्रिया पार पाडून पुलाच्या कामाला पंधरा दिवसांपूर्वी सुरूवात करण्यात आली. महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडून मामुर्डी येथील पवना नदीपात्रालगतच्या स्मशान भूमीजवळ पुलाच्या पहिल्या पिलर नंबर १२ चे कास्टिंग सुरू करण्यात आले आहे. पुलाची रुंदी पंधरा मीटर आणि १२ मीटरचे जोड डीपी रस्ते तयार केले जाणार आहेत. नदीवरील पूल आणि दोन्ही बाजूचे जोड रस्ते अशी ५५० मीटर एकूण लांबी असणार आहे. एकूण पुलाची उंची ७.९ मीटर असणार आहे. नदीपात्रात तीन पिलर उभा करून त्यावर पूल तयार केला जाणार आहे. पुढील ३० महिन्यांत पुलाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.
पंधरा किलोमीटरचा वळसा वाचणार
मामुर्डी येथून पवना नदीच्या पलीकडील ग्रामीण भागात जाण्यासाठी हा साकव एकमात्र पर्याय नागरिकांसाठी सध्या उपलब्ध आहे. हा साकव केवळ दुचाकी आणि पादचाऱ्यांसाठी उपलब्ध आहे. तरी, काही नागरिक आपल्या चारचाकी वाहनातून लोखंडी जीर्ण पुलावरून जीवघेणा प्रवास करतात. सार्वजनिक वाहतुकीचा विचार केला तर किवळे, रावेत, मामुर्डी, ताथवडे, पुनावळे भागातील नागरिकांना ग्रामीण भागात जाण्यासाठी मारुंजी येथून जांबे, नेरे मार्गे पुढे दहा ते पंधरा किलोमीटरचा वळसा घालून जावे लागते. तर, ग्रामीण भागातील नागरिकांना देखील एवढे मोठे अंतर कापून शहरात यावे लागते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. हा उड्डाणपूल तयार झाल्यानंतर नागरिकांची कायमची सोय होणार आहे.
आयटीयन्सचे अंतर होणार कमी
हिंजवडी आयटी पार्कमध्ये नोकरी करण्यासाठी जाणाऱ्या रावेत, किवळे, विकासनगर, मामुर्डी, ताथवडे भागातील कर्मचाऱ्यांना ताथवडे, पुनावळे मार्गे भूमकर चौकातून मोठे अंतर कापून जावे लागते. परंतु, मामुर्डी येथे पवना नदीपात्रावर नियोजित उड्डाणपुलाचे काम पूर्ण होऊन हा पूल वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांवर आयटी पार्क येणार आहे. त्यामुळे वरील भागातील नागरिकांना हिंजवडी आयटी पार्क येथील बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरीसाठी जाण्याचे अंतर काही मिनिटांवर येणार आहे.
मामुर्डी-सांगवडे उड्डाण पुलाचा पहिला पिअर बांधण्याचे काम मागील पंधरा दिवसांपूर्वी सुरू केले आहे. महापालिका हद्दीतील जोड रस्त्याचे काम देखील प्रगती पथावर आहे. कामाची मुदत तीस महिने असून, मुदतीत पुलाचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.
- स्वप्नील शिर्के, उपअभियंता, ब क्षेत्रीय कार्यालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.