रेड झोनच्या हद्दीमुळे नागरिकांत संभ्रम
पिंपरी, ता. १६ ः महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप विकास आराखड्यात (डीपी) निगडी, चिखली, तळवडे परिसरात देहूरोड संरक्षण विभागाच्या हद्दीची अर्थात रेडझोन सीमा दर्शवली आहे. यमुनानगर, त्रिवेणीनगर, रुपीनगर, म्हेत्रेवस्ती, साने चौक, ज्योतिबानगर अशा नागरी वस्तीचा त्यात समावेश आहे. शिवाय, झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र (एसआरए) सुद्धा दर्शविले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी शहरासाठी प्रारूप विकास आराखडा (डीपी) १४ मे रोजी मंजूर केला आहे. त्यावर ६० दिवसांत म्हणजेच १४ जुलैपर्यंत हरकती व सूचना मागवल्या आहेत. या डीपीमध्ये पवना, मुळा, इंद्रायणी नद्यांच्या पूररेषांसह रेडझोनची सीमाही दर्शविल्या आहेत. यामध्ये दिघी, देहूरोड, औंध कॅम्प, डेअरी फार्म या लष्करी आस्थापनांचा समावेश आहे. दिघी व देहूरोड आस्थापनांमुळे संरक्षित क्षेत्र (रेडझोन) दर्शविले आहे. त्यामुळे भोसरी, चऱ्होली, वडमुखवाडी, दिघी आणि तळवडे, चिखली, निगडी, रावेत, किवळे या गावांच्या काही भाग बाधित होत आहेत. रेडझोनची हद्द दोन हजार यार्ड असल्यामुळे बाधितांची संख्या अधिक आहे. त्यामुळे हे क्षेत्र पाचशे यार्डपर्यंत कमी करण्याची वर्षानुवर्षांची मागणी आहे. या संदर्भात संरक्षण विभागासमवेत बैठकीही झाल्या आहेत. मात्र, अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, असे असताना डीपीमध्ये मात्र रेडझोनची सीमा नमूद केलेली आहे. त्यामुळे बाधित होणारे क्षेत्र दर्शविले आहे. सेक्टर २१ मधील काही भाग, सेक्टर २२ या नागरी वस्तीसह रुपीनगर, त्रिवेणीनगर, तळवडे, चिखलीतील म्हेत्रे वस्ती, साने चौकाचा काही भाग रेडझोनमध्ये दिसत आहे. त्यामुले सर्वसामान्य नागरिकांमध्ये घबराटीचे व संभ्रमाचे वातावरण आहे. दरम्यान, प्रसिद्ध केलेल्या प्रारूप विकास आराखड्याबाबत नागरिकांकडून हरकती व सूचना मागवल्या आहेत. त्यासाठी ६० दिवसांचा कालावधी नागरिकांना दिला आहे. त्यानंतर हरकती व सूचनांवर सुनावणी होईल, असे एका अधिकाऱ्यांनी सांगितले.
रेडझोनमध्ये ‘एसआरए’
निगडी प्राधिकरणातील सेक्टर २१ यमुनानगरच्या काही भागाचा समावेश रेडझोन हद्दीत दर्शविला आहे. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अखत्यारितील दोन हजार ९०७.७२ चौरस मीटर क्षेत्रावर ‘एसआरए’ (झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र) प्रकल्प दर्शविला आहे. या प्रकल्पाबाबत ऑक्टोबर २०२४ मध्ये जाहीर नोटीस एसआरए विभागाने प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे रेडझोन हद्दीबाबतच्या संभ्रमात भर पडली आहे.
रेडझोनचा अचूक नकाशा हवा
शहराच्या डीपीमध्ये रेडझोनची सीमा दर्शवलेली आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण आहे. त्याबाबत काही अफवा पसरविल्या जात आहेत. त्याचा काही जण राजकीय गैरफायदा घेत आहेत. हा संभ्रम दूर करण्यासाठी महापालिकेने रेड झोनचा अधिकृत अचूक नकाशा जाहीर करावा, अशी मागणी स्थानिक रहिवासी सतीश मरळ यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.