मे महिन्यात विक्रमी पाऊस ! शहरात ३७८.७ मिमी पाऊस, सतरा वर्षातील सर्वाधिक नोंद

मे महिन्यात विक्रमी पाऊस !  
शहरात ३७८.७ मिमी पाऊस, सतरा वर्षातील सर्वाधिक नोंद
Published on

पिंपरी, ता. १ ः राज्यातील बहुतांश भागाला मान्सूनपूर्व पावसाने अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. मे महिन्यातच ओढे, नाले, नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातही मे महिन्यात पहिल्यांदाच गेल्या १७ वर्षातील सर्वाधिक पाऊस झाला. शहरात ३७८.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मे महिन्यात एकाच दिवसात सर्वाधिक पाऊस होण्याचा विक्रम देखील यंदाच्या वर्षी झाला आहे. २१ मे रोजी एकाच दिवसात १०३ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे यंदाच्या मे महिन्यातील उन्हाळा पावसाळ्यात बदलल्याचे दिसून येत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात यंदाचा उन्हाळा तापदायक ठरला. शहरात तापमानाचा पारा ४० पार गेला होता. यावर्षी ९ एप्रिल रोजी विक्रमी कमाल ४०.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर मात्र तापमानाचा पारा कमी होत गेला. दुपारी कडक ऊन आणि सायंकाळी ढगाळ वातावरण पहायला मिळत होते. एप्रिलमध्ये चार दिवस अवकाळी पाऊस झाला. मात्र, मे च्या दुसऱ्या आठवड्यात शहरात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाळा सुरु झाला. अनेक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पाऊस पडला. त्यामुळे शहरातील काही रस्त्यांना अगदी नदीचे स्वरूप आल्याचे दिसून आले. अचानक आलेल्या आणि काही तासांच्या या पावसाने सर्वत्र दाणादाण उडवून दिली होती.
पिंपरी-चिंचवड शहरात २००८ मध्ये चिंचवड येथे हवामान विभागाने स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्र बसविले आहे. शहरात होणाऱ्या पावसाची वेगळी नोंद हवामान विभागात २००८ पासून ठेवली जात आहे. गेल्या १७ वर्षात सर्वाधिक पावसाची नोंद २०२५ मध्ये झाली आहे. यंदा पिंपरी-चिंचवड शहरात मे महिन्यात १९ दिवस पाऊस झाला. मे महिन्यात सर्वाधिक दिवस पाऊस पडण्याचा विक्रम यंदा पहिल्यांदाच झाला. या १९ दिवसात विक्रमी ३७८.७ मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांना यंदा मे महिन्यात उन्हाळ्याऐवजी पावसाळ्याचा अनुभव घेता आला. त्यामुळे दरवर्षी उकाड्यामुळे त्रस्त होणाऱ्या नागरिकांना यंदा दिलासा मिळाला आहे.
---------

मे मध्ये झालेल्या पावसाची नोंद (मिलिमीटर मध्ये)
२०१५ - २३
२०१६ ते २०२० - ०
२०२१ - ८
२०२२ - ०
२०२३ - ८०.५
२०२४ - ८५.५
२०२५ - ३७८.७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com