वेश्या व्यवसायप्रकरणी दोघांना अटक

वेश्या व्यवसायप्रकरणी दोघांना अटक
Published on

पिंपरी : वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या लॉजवर पोलिसांनी छापा टाकून दोघांना अटक केली. तर एक पिडीत महिला व एका अल्पवयीन मुलीची वेश्या व्यवसायातून पोलिसांनी सुटका केली. ही कारवाई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकाने हिंजवडीतील विनोदेवस्ती येथील अतिथी लॉजिंग अँड बोर्डिंग येथे केली. लॉज व्यवस्थापक युवराज राजेंद्र पाटील (वय २९), लॉज चालक-मालक प्रवीण बळीराम असटकर (वय ३६, रा. कात्रज, पुणे) यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर राहुल चव्हाण उर्फ अमित (वय ३०) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पीडित महिला आणि एका अल्पवयीन मुलीला पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त केले. त्यातून मिळालेल्या पैशांतून आरोपींनी त्यांची उपजीविका भागवली. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाला याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून दोघांना अटक केली. त्यांच्याकडून ११ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

हुक्काप्रकरणी दोघांवर गुन्हा
पिंपरी : हॉटेलमध्ये बेकायदारित्या हुक्का पार्लर चालविल्याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला. ही कारवाई केएसबी चौक चिंचवड येथील लेवल वन रुफटॉप या हॉटेलमध्ये करण्यात आली. शेखर आनंद ओव्हाळ (वय ३४), महेश सुरेश म्हाब्दी (वय ३२, दोघेही रा. शाहूनगर, चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. केएसबी चौकातील लेवल वन रुफटॉप हॉटेलमध्ये हुक्का पार्लर चालवण्याबाबत हॉटेल चालकांनी कोणतीही परवानगी घेतली नाही. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत २६ हजार २०० रुपये किमतीचे हुक्का पॉट आणि हुक्का फ्लेवर जप्त केला आहे.

बेकायदा गॅस रिफिलिंगप्रकरणी दोघांवर गुन्हा
पिंपरी : कोणतीही परवानगी आणि सुरक्षेची खबरदारी न घेता बेकायदेशीरपणे गॅस रिफिलींग केल्याप्रकरणी चिखली आणि भोसरी येथे कारवाई करण्यात आली. चिखली येथे शेषनाथ गॅस सर्व्हिस या दुकानात कारवाई करत खंडणी विरोधी पथकाने २७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चिखली येथे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत अभिषेक वीरभद्र स्वामी (वय २४, रा. देहू-आळंदी रस्ता, चिखली) याच्यावर चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अभिषेक स्वामी याने घरगुती वापराच्या सिलिंडरमधून छोट्या सिलिंडरमध्ये बेकायदारित्या गॅस रिफील केला. दरम्यान, त्याने सुरक्षेची कोणतीही खबरदारी घेतली नाही. तसेच रिफिल केलेल्या सिलिंडरची चढ्या दराने विक्री केली. पोलिसांनी गॅससाठा आणि इतर साहित्य असा एकूण २७ हजार ७०० रुपयांचा ऐवज मुद्देमाल जप्त केला आहे.
तर भोसरीतील चक्रपाणी वसाहत येथे गुन्हे शाखा युनिट एकने ओम साई गॅस सर्व्हिस या दुकानात केलेल्या कारवाईत यश प्रेमदास सरदार (वय २०, रा. पांडवनगर कॉलनी, भोसरी) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी हा दुकानात बेकायदारित्या व धोकादायकपणे गॅस रिफिलिंग करत असल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

दोन दुचाकींच्या धडकेत एकजण जखमी
पिंपरी : भोसरीतील सेक्टर १२ येथे दोन दुचाकींची धडक झाली. या घटनेत एक दुचाकीचालक जखमी झाला आहे. प्रदीप साहेबराव तुरुकमाने (वय ४२, रा. भोसरी) असे जखमी दुचाकी चालकाचे नाव आहे. त्यांनी या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नरेंद्र संजय अहिरे (वय २६, रा. साने चौक, चिखली) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे त्यांच्या दुचाकीवरून जात होते. दरम्यान, सेक्टर क्रमांक बारा येथे दुसऱ्या दुचाकीवरून भरधाव आलेल्या नरेंद्र अहिरे याने त्याच्या दुचाकीने प्रदीप यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये प्रदीप हे गंभीर जखमी झाले.

मोटार अडवून तरुणाला मारहाण
पिंपरी : तरुणाची मोटार अडवून त्याला मारहाण केली. तसेच दारूची बाटली मोटारीच्या दिशेने फेकून मारली. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आला आहे. ही घटना हिंजवडीतील फेज एक येथे घडली. याप्रकरणी अजिंक्य मोहन पवार (वय २५, रा. बालेवाडी) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी पवार हे त्यांच्या मित्रासह मोटारीतून हिंजवडी फेज एक येथून जात होते. दरम्यान, आरोपींनी त्यांच्या मोटारीतून पवार यांचा पाठलाग केला. त्यांची मोटार अडवून शिवीगाळ करीत मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी देत दारूची बाटली पवार यांच्या मोटारीच्या दिशेने फेकून मारली.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com