

पिंपरी, ता. २७ : महापालिकेच्या पाच माध्यमिक शाळांमध्ये आता नववी व दहावीचे वर्ग सुरू होणार आहेत. आकांक्षा फाउंडेशनच्या मदतीने आगामी शैक्षणिक वर्षापासून हे वर्ग सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. यासाठीचा प्रस्ताव महापालिका शिक्षण विभागाने शिक्षण संचालनालय कार्यालयात पाठविला आहे.
महापालिकेच्या काही शाळा केवळ इयत्ता सातवीपर्यंत असल्याने पुढील शिक्षणासाठी प्रवेश मिळविताना विद्यार्थ्यांसमोर अनेक अडचणी येतात. त्यामुळे अशा दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी पाच शाळांमध्ये इयत्ता नववी व दहावीचे वर्ग सुरू केले जाणार आहेत. खासगी शैक्षणिक संस्था या शाळांचे संचलन करणार असून, महापालिकेतर्फे त्यांना शाळेची जागा आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
महापालिका प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग आणि आकांक्षा फाउंडेशन यांच्या विद्यमाने इयत्ता आठवीपर्यंत २०१५-२०१६ पासून इंग्रजी माध्यमाच्या पाच शाळा चालविल्या जातात. यापैकी अनुसया नामदेव वाघेरे इंग्रजी शाळा (पिंपरी) आणि छत्रपती शाहू महाराज इंग्रजी शाळा (कासारवाडी) येथे नैसर्गिक वाढीने इयत्ता नववी आणि दहावीचे वर्ग सुरू करण्यासाठी महापालिका सर्वसाधारण सभेची १३ फेब्रुवारी २०२४ रोजी मंजुरी मिळालेली होती. कै. दत्तोबा रामचंद्र काळे इंग्रजी माध्यम शाळा (काळेवाडी), पिंपरी-चिंचवड महानगरपालिका इंग्रजी माध्यम शाळा (बोपखेल), सावित्रीबाई फुले इंग्रजी माध्यम शाळा (मोशी) या शाळांचा त्यामध्ये समावेश आहे. या पाचही शाळांमध्ये २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता नववी तर, २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावीचे वर्ग सुरू केले जाणार आहेत.
महापालिका आयुक्तांच्या मंजुरीनंतर याबाबत प्रस्ताव शिक्षण संचालनालय कार्यालयात पाठविण्यात आला आहे. तेथून राज्य शासनास सादर करण्यात येणार असून चालू वर्षांत शासनाकडून परवानगी मिळाल्यास नववी व दहावीचे वर्ग सुरू होतील.
- संगीता बांगर, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.