बेशिस्त, अवजड वाहनांना चाप आवश्यकच

बेशिस्त, अवजड वाहनांना चाप आवश्यकच

Published on

मंगेश पांडे : सकाळ वृत्तसेवा

पिंपरी, ता. ८ : अपघात टाळण्यासह वाहतूक सुरळीत राहण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या वाहतूक शाखेने काही मार्गांवर सकाळी आणि सायंकाळी अवजड वाहनांना प्रवेश बंद केला आहे. तरीही, अवजड वाहने सुसाट धावत आहेत. त्यामुळे अपघात होत यावर ‘सकाळ’ने सविस्तर आणि सचित्र वृत्त प्रसिद्ध केले. बेशिस्त वाहन चालकांमुळे होणारे अपघात व त्यामध्ये जाणारे निष्पाप नागरिकांचे जीव याबाबतची स्थिती त्यामध्ये मांडली. यावर अनेक नागरिकांनी ‘सकाळ’कडे प्रतिक्रिया नोंदविल्या. ‘‘बेशिस्त वाहन चालकांवर आणखी कारवाई करणे गरजेचे आहे.’’ तसेच ‘‘वाहतूक नियंत्रणाचे अधिकार सामान्य नागरिकांकडे द्यावेत,’’ असे मत वाचकांनी नोंदविले.

निगडी, प्राधिकरणातील सुभाष राणे म्हणाले, ‘‘वाहतूक नियमांचे उल्लंघन करून धावणाऱ्या वाहनांवर सध्या कारवाई केली जाते, त्याचा काहीही परिणाम त्यांच्यावर होत नाही. यासाठी कारवाईचे नियम कठोर करणे गरजेचे आहेत. यात वाहन परवाना जप्त करणे, रद्द करणे, त्यांच्या ट्रान्सपोर्ट ऑफिसकडून लेखी हमी घेणे, एवढे करूनही त्यांच्याकडून नियमाचे पालन होत नसेल, तर शेवटी त्यांचे वाहन जप्त करून ताब्यात घ्यावे. अशी कठोर कारवाई केली तरच ते नियमाचे शंभर टक्के पालन करतील. नाही तर आता चालले आहे ते असेच सुरू राहील आणि सामान्य नागरिकांचे अपघात होतील.’’

तसेच ‘‘प्रतिबंधित वेळेत एखादे अवजड वाहन त्या भागात धावत असेल आणि जर एखाद्या नागरिकाने त्याचा फोटो किंवा व्हिडिओ तारीख आणि वेळेसह पाठवला, तर त्या वाहनाला दंड आकारून त्या रकमेतील पन्नास टक्के रक्कम त्या नागरिकाला बक्षीस म्हणून देण्यात यावी,’’ असे मत एका नागरिकाने व्यक्त केले आहे.

‘‘मी गेली वीस वर्षे वडगाव-तळेगाव मार्गाने प्रवास करत आहे. वडगाव चौकात पोलिसांकडून अवजड वाहनांना सोडले जाते. तळेगाव चौकात कित्येक अपघात घडले आहेत, तरीही कारवाई करावी असे पोलिसांना वाटत नाही. बेशिस्त अवजड वाहनांना रोखण्यासाठी या चौकात सात मीटरचा लोखंडी खांब लावावा व त्याचे नियंत्रण सामान्य माणसाच्या हाती द्यावे, कारण पोलिसांवरील विश्वास संपत चालला आहे.’’
- सचिन काळे, तळेगाव दाभाडे, नागरिक.


९० गुन्हे दाखल, ११२ वाहनांवर कारवाई
शहरात बेशिस्त वाहन चालकांमुळे होणारे अपघात तसेच ठिकठिकाणी होणारी वाहतूक कोंडी याबाबत ‘सकाळ’ ने वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध केले आहेत. याची दाखल घेत पोलिसांचा वाहतूक विभागाला खडबडून जाग आली आहे. वाहतूक शाखेने पाच ते सात ऑगस्टदरम्यान विशेष मोहिम राबवत सार्वजनिक रस्त्यावर धोकादायकरित्या, बेदरकारपणे, हयगयीने वाहन चालविणारे चालक तसेच सार्वजनिक रहदारीस अडथळा होईल, अशा प्रकारे रस्त्यालगत वाहन पार्क करणाऱ्या वाहनांच्या चालकांवर कारवाई केली. तर, कलम २८१ प्रमाणे एकूण ३६ गुन्हे दाखल करुन ४१ वाहनांवर कारवाई केली. तर कलम २८५ प्रमाणे एकूण ५४ गुन्हे दाखल करुन ७१ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.

स्वतःच्या व इतरांच्या जिवाच्या सुरक्षेकरिता तसेच न्यायालयीन कार्यवाही टाळण्यासाठी वाहनचालकांनी आपल्या ताब्यातील वाहन धोकादायकरित्या बेदरकारपणे, हयगयीने चालवू नये. सार्वजनिक रहदारीस अडथळा होईल, अशाप्रकारे अनधिकृतरित्या वाहने रस्त्याचे कडेला पार्क करू नये.
- विवेक पाटील, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com