इनोव्हेटिव्ह वर्ल्ड स्कूलची तिरंगा रॅली जल्लोषात

इनोव्हेटिव्ह वर्ल्ड स्कूलची तिरंगा रॅली जल्लोषात

Published on

पिंपरी, ता. ८ ः चिखली येथील इनोव्हेटिव्ह वर्ल्ड स्कूलमध्ये नुकतीच तिरंगा रॅली काढण्यात आली. ही रॅली सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठ चिखलीपासून ते शाळेपर्यंत काढण्यात आली. दरम्यान विद्यार्थ्यांनी ‘हिंदुस्तान हमारा है, ये हमारी शान है’, ‘देश की ताकत हम सब बच्चे’, ‘दे सलामी इस तिरंगे को जिससे तेरी शान है’ अशा घोषणा दिल्या. विद्यार्थी, शिक्षक व नागरिक हातात तिरंगी ध्वज घेऊन रॅलीत सहभागी झाले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदाडे, पिंपरी आरटीओचे पोलिस निरीक्षक प्रवीण भोसले, सहाय्यक निरीक्षक, तेजस्विनी चोरगे व कोमल गाडेकर, तसेच शाळेच्या संचालिका कमला बिष्ट, संचालक डॉ. संजय सिंग, प्रचिती स्कूलचे अध्यक्ष प्रशांत पाटील, नूतन महाराष्ट्र महाविद्यालयाचे प्रबंधक विजय शिर्के उपस्थित होते.
विद्यार्थी क्रांतिवीर, सेनानी, देशभक्त यांच्या वेशभूषेत आले होते. त्यांनी परिसरातील नागरिकांचेही लक्ष वेधून घेतले. रॅली मैदानात दाखल होताच पूर्वप्राथमिक व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात आनंदाने स्वागत केले. तिरंग्याच्या तीनही रंगाचे फुगे आकाशात सोडण्यात आले. विद्यार्थ्यांनी भावपूर्ण भजन सादर केले. यावेळी सिंग यांनी ‘ऑगस्ट क्रांती’ साजरी करण्याबाबत माहिती देत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.
‘वंदे मातरम्’ या गीताने कार्यक्रमाचा समारोप झाला. शाळेच्या वतीने रॅली यशस्वी झाल्याबद्दल सर्व सहभागी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि मान्यवरांचे आभार मानण्यात आले.

Marathi News Esakal
www.esakal.com