धान्‍य पुरवठ्यातील घटची होईना नोंद

धान्‍य पुरवठ्यातील घटची होईना नोंद

Published on

पिंपरी, ता. ९ : शहरातील स्वस्त धान्य दुकानदारांनी धान्य पुरवठ्यातील घट भरून काढण्यासाठी वाढीव कोटा देण्याची मागणी सातत्‍याने केली आहे. अन्नधान्य पुरवठा व वितरण विभागाकडून शहरातील दुकानदारांना नियोजित कोट्यानुसार धान्य पुरवठा केला जातो. मात्र, गोडाऊनमधून दुकानापर्यंत धान्य वाहतूक आणि वाटपाच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात धान्याची गळती होत आहे. दुकानदारांना प्रत्यक्षात कोट्यापेक्षा कमी धान्य मिळत असल्याची तक्रार अनेकांनी व्यक्त केली आहे. मात्र, वाढीव कोटा देण्यास संबंधित विभागाची नकारघंटा मिळत आहे.
शहरातील २५६ स्वस्त धान्य दुकाने शिधापत्रिकाधारकांना मासिक कोट्यानुसार तांदूळ, गहू, साखर व इतर धान्याचे वाटप करतात. अन्‍नसुरक्षा व अंत्‍योदय शिधापत्रिकाधारकांसाठी याचे वाटप केले जाते. या प्रक्रियेसाठी अन्नधान्य वितरण विभाग प्रत्येक महिन्याला दुकानदारांना ठरावीक प्रमाणात धान्य गोडाऊनमधून पुरवतो. मात्र, पुरवठ्याच्या टप्प्यातील धान्याची गळती आणि घट यामुळे दुकानदारांकडे जे धान्य पोहोचते ते ठरवलेल्या कोट्यापेक्षा कमी असते. परिणामी, कोटा अपुरा पडतो आणि लाभार्थ्यांना संपूर्ण हक्काचे धान्य देणे कठीण होते. गोडाऊनमधून ट्रक किंवा टेम्पोद्वारे धान्य दुकानात आणताना पिशव्या फाटणे, पॅकिंग कमकुवत असणे, लोडिंग-अनलोडिंग दरम्यान धान्याची गळती अशा कारणांमुळे नुकसान होते. ही घट काही किलो ते काहीवेळा क्विंटलपर्यंत जाऊ शकते. या नुकसानीमुळे दुकानदारांना स्वतःच्या खर्चाने ही कमतरता भरून काढावे लागते किंवा लाभार्थ्यांना कमी प्रमाणात वाटप करावे लागते. या परिस्थितीत अनेकदा शिधापत्रिकाधारकांशी वाद होत असल्‍याची तक्रार दुकानदार करत आहेत.
या मागणीबाबत स्वस्त धान्य दुकानदारांच्या संघटनांनी वारंवार पत्रव्यवहार केला आहे. त्‍याला अन्नधान्य पुरवठा व वितरण विभागाकडून याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. विभागातील अधिकारी मात्र तांत्रिक कारणे आणि नियमांची अडचण सांगून हा विषय पुढे ढकलत असल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे.

सप्‍टेंबरमधील धान्‍य वाटप कोटा (मेट्रिक टनमध्ये)
योजना/ धान्य/ पिंपरी/ चिंचवड/ भोसरी
अन्‍नसुरक्षा योजना/ गहू/ २८९.४००/ ३३७.७००/ ३४०.७००
तांदूळ/ ४३३.६००/ ५०७.६००/ ५१०.५००
अंत्‍योदय योजना/ गहू/ १५.९००/ २.५०/ १९.२५०
तांदूळ/ ३९.७५०/ ५.१००/ ४८.१००

‘‘धान्य पुरवठा साखळीतील धान्याची गळती हा अनेक वर्षांचा प्रश्‍न आहे. धान्‍याचा वाढीव कोटा पिंपरी-चिंचवडमध्येही देणे अपेक्षित आहे. त्‍यामुळे दुकानदार आणि शिधापत्रिकाधारक दोघांचाही त्रास कमी होईल. विभागाने तातडीने या संदर्भात निर्णय घ्यावा.
- विक्रम छाजेड, स्‍वस्‍त धान्‍य दुकानदार

‘‘धान्‍याची घट गृहित धरूनच धान्‍य कोटा निश्‍चित केला जातो. त्‍यानुसार वाटप केले जाते. स्‍वस्‍त धान्‍य दुकानदारांच्‍या काही तक्रारी असतील तर त्‍याबाबत शहानिशा केली जाईल. त्‍यांच्‍या तक्रारी वरिष्ठांपर्यंत पोचविण्यात येतील.
- विजयकुमार क्षीरसागर, परिमंडळ अधिकारी, चिंचवड
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com