महिनाभरात यंत्रणा हलली; खड्डे मात्र कायम
अश्विनी पवार ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी,ता. ९ : हिंजवडीतील वाहतूक कोंडी आणि विविध पायाभूत समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १० जुलैला येथील विविध प्रशासकीय विभाग, आयटी कर्मचारी संघटना व लोकप्रतिनिधींची बैठक घेतली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही दोन वेळा हिंजवडीला भेट दिली. त्यामुळे, महिनाभरात तेथील यंत्रणा हलली. मात्र, असे असूनही येथील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात आले आहेत ना येथील वाहतुकीचा प्रश्न पूर्णपणे सुटला आहे.
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे हिंजवडीमध्ये जलकोंडी झालेली पाहायला मिळाली. रस्त्यांवर चार ते पाच फुटांपर्यंत भरलेल्या पाण्यामधून मार्ग काढणारी पीएमपी बस, वाहून जाणाऱ्या दुचाकी याची छायाचित्रे आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर समाजमाध्यमांवर व्हायरल झाले. हिंजवडीची ‘आयटी पार्क की वॉटर पार्क’ अशी टीका झाल्यानंतर पीएमआरडीए, एमआयडीसी व विविध प्रशासकीय विभागांच्या बैठका झाल्या. त्यानंतर १० जुलैला पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीएमआरडीए, पिंपरी चिंचवड महापालिका, पुणे महापालिका, एमआयडीसी यांच्यासह येथील लोकप्रतिनिधी व आयटी कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधी यांची बैठक घेतली. त्यामध्ये हिंजवडीतील प्रश्न तातडीने सोडवावेत, अशीही त्यांनी सूचना दिली. त्यानंतर आयटी फोरमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलेल्या समस्या अधिकाऱ्यांकडून सोडविल्या जात आहे. मात्र, समस्या शोधून त्या सोडविण्यासाठी प्रशासकीय विभागांनी एक स्वतंत्र यंत्रणा तयार करणे गरजेचे आहे. तसे होताना दिसत नसल्याचे आयटी कर्मचाऱ्यांनी सांगितले.
जूनमध्ये पहिली बैठक
८ जून ः अवघ्या अर्धा तास पडलेल्या पावसामुळे दोहलर कंपनीसमोर पाणीच पाणी झाले. दुचाकीही वाहून गेल्या. त्यानंतर पीएमआरडीए, एमआयडीसी यांनी आयटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांसह पाणी साठणाऱ्या ठिकाणांची पाहणी केली. त्यानंतर झालेल्या बैठकीत प्रत्येक विभागाने ३० जूनपर्यंत आपल्या विभागाशी संबंधित कामे करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, पीएमआरडीएने केलेल्या सर्वेक्षणात १४ नाले बुजविल्याने जलकोंडी झाल्याचे आढळून आले. पीएमआरडीएने संबंधितांना याबाबत नोटिसा बजाविल्या. २० जूनला आयटी कर्मचारी व संघटनांनी ‘अनक्लॉग हिंजवडी’ ही सह्यांची मोहीम सुरू केली. या मोहिमेला मिळालेल्या प्रतिसादानंतर २ जुलै रोजी मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवांची एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यासोबत बैठक झाली. त्यामध्ये नैसर्गिक प्रवाहांचे जाळे तयार करणे, उड्डाणपुलासाठी भूसंपादन करणे, कचरा व्यवस्थापन करणे अशी सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या.
घटनाक्रम...
१० जुलै ः मुंबई येथील बैठकीत मुख्यमंत्र्यांचे सिंगल पॉईंट ॲथॉरिटी नेमण्याचे आदेश
१३ जुलै ः उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हिंजवडीत पाहणी दौरा, समस्या सोडविण्याचे अधिकाऱ्यांना आदेश
१४ जुलै ः भूसंपादनासाठी कृती दल तयार करून प्रश्न मार्गी लावण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देश
१७ जुलै ः हिंजवडीकडे जाणाऱ्या रस्ता रुंदीकरणासाठी महापालिकेकडून काळाखडक येथे अतिक्रमण कारवाई
१७ जुलै ः पीएमआरडीएकडून अतिक्रमणांवर कारवाई
१९ जुलै ः भूसंपादनासाठी पीएमआरडीएची शेतकऱ्यांसोबत बैठक
२३ जुलै ः एमआयडीसीची ५३ अतिक्रमणांवर कारवाई
२२ जुलै ः विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आयटी कर्मचारी संघटना आणि रहिवाशांसोबत बैठक
२४ जुलै ः पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आयटी पार्कची पाहणी करून कोंडी सोडविण्याचे आदेश दिले
२६ जुलै ः अजित पवार यांचा हिंजवडी दौरा; वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आराखडा करण्याचे आदेश
२८ जुलै ः हिंजवडी फेज २ मधील दोहलर कंपनी समोरील नाल्यावर केलेल्या अतिक्रमणांवर हातोडा
१ ऑगस्ट ः हिंजवडीतील ग्रामस्थांची ग्रामसभा; भूसंपादनासाठी कायदेशीर प्रक्रिया राबविण्याची मागणी
५ ऑगस्ट ः पीएमआरडीएकडून मेट्रो मार्गावर रस्त्यांच्या डागडुजीला सुरुवात
७ जुलै ः पीएमआरडीए आयुक्त योगेश म्हसे यांची
भूसंपादनासंदर्भात स्थानिकांशी बैठक; समन्वयातून भूसंपादन करण्याचे आश्वासन
काय आहे सद्यःस्थिती
- बऱ्याच रस्त्यांवरचे खड्डे अद्यापही तसेच
- भुजबळ चौकाजवळील सेवा रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम अर्धवट
- अनेक भागांतील पदपथांवरील अतिक्रमणांवर कारवाई नाही
- भूसंपादनाचे प्रश्न अद्यापही ‘जैसे थे’
- बहुतांश ठिकाणी मेट्रो स्थानकांमुळे रस्ते अरुंद, मात्र त्यावर कार्यवाही नाही
गेल्या महिनाभरात विविध प्रशासकीय यंत्रणा आम्हाला घेऊन हिंजवडीत पाहणी करत आहेत. प्रश्न जाणून घेत आहेत. मात्र, केवळ आम्ही सांगितलेल्या ठिकाणीच काम केले जात आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना केली पाहिजे. त्याबाबत एक कार्यपद्धती अवलंबिली पाहिजे. महिनाभरात पाऊस बऱ्यापैकी कमी होता. मात्र, अपेक्षेप्रमाणे रस्त्यांची कामे झालेली नाहीत. अतिक्रमणे काढली गेली आहेत. मात्र, सेवा रस्त्यांवरील वाहतुकीचा प्रश्न सुटलेला नाही.
- पवनजीत माने, अध्यक्ष, एफआयटीई
गेल्या महिनाभरात हिंजवडीतील १९ किलोमीटरच्या रस्त्यांचे मार्किंग झाले आहे. ११ किलोमीटर रस्त्यांचे रूंदीकरण झाले आहे. विप्रो फेज २ ते मारुंजी रस्त्यांचे कामही सुरू झाले आहे. आतापर्यंत पीएमआरडीएकडून एक हजारापेक्षा अधिक अतिक्रमणांवर करवाई करण्यात आली आहे.
- डॉ योगेश म्हसे, आयुक्त, पीएमआरडीए
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.