अतिक्रमणे, अवजड वाहनांमुळे महामार्गाची ‘कोंडी’

अतिक्रमणे, अवजड वाहनांमुळे महामार्गाची ‘कोंडी’

Published on

सोमाटणे, ता. १२ : सेवा रस्त्यावरील अतिक्रमणे, वाढलेली वाहन संख्या आणि त्यामुळे अपुरा पडणारा महामार्ग, टोलबुथची कमी संख्या अशा कारणांमुळे सोमाटणे परिसरात वाहतूक कोंडी वाढली आहे. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

गेल्या दशकभरात मावळाचा विकास झपाट्याने झाला. यात रस्ते, पाणी आणि प्रामुख्याने हवामान चांगले असल्याने ‘सेंकड होम’ म्हणून पुणे आणि मुंबईकरांनी प्रामुख्याने पवनमावळ परिसराला अधिक पसंती दिली. पण, या परिसरात प्रवासी वाहने, गहुंजे येथील क्रिकेट स्टेडियमकडे येणारे प्रेक्षक, उर्से-बेबडओहोळ परिसरातील कारखान्यात साहित्य व कामगार वाहतुकीसाठी वाढलेली वाहने, कासारसाई, आढले, कुसगाव, पाचाणे परिसरांत येणाऱ्या पर्यटकांमुळे वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
जुन्या पुणे-मुंबई मार्गावर वाढलेली वाहने, रस्ता अरुंद असल्याने टोल भरताना थांबावे लागत असलेली वाहतूक, सोमाटणे फाटा येथे द्रुतगती बाह्यमार्गासह शिरगाव, परंदवडी, जोडणारे अनेक रस्ते एकत्र येतात. सोमाटणे टोलनाका ते सोमाटणे फाटा या दरम्यान वाढलेल्या वाहनसंख्येचा विचार करुन कोंडी कमी करण्यासाठी रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) टोल नाक्याच्या दोन्ही बाजूंनी अमरजाईमाता मंदिर ते तळेगाव खिंडदरम्यानची अतिक्रमणे काढून रस्ता रुंदीकरण पूर्ण करणे गरजेचे होते. परंतु केवळ साइडपट्टीवर एक लेन वाढवून रुंदीकरण उरकण्यात आले. कोंडीच्या वाढत्या तक्रारींवर तात्पुरता उपाय म्हणून टोलनाक्यावर दोन्ही बाजूंनी दोन बुथची संख्या वाढवली व काम थांबवले.
रस्त्याचे हे रुंदीकरण वाहनसंख्येच्या तुलनेत अपुरे असल्याने सोमाटणे फाट्यावरील वाहतूक कोंडी कमी होण्याऐवजी ती आणखी वाढली. सोमाटणे फाटा चौकातील सेवा रस्त्याचा वापर वाहनांसाठी करुन वाहतूक कोंडी कमी करता येत होती. परंतु काही लोकप्रतिनिधींच्या अभयामुळे तेथे अतिक्रमणे करुन विक्रेत्यांनी भाजीपाला, खाद्य पदार्थांसह विविध वस्तू विक्रीचे दुकाने रस्त्यावर कायमस्वरुपी थाटली आहेत. त्यामुळे होणारी कोंडी सोडविण्याऐवजी पोलिसांकडून वाहनचालकांवर कारवाई केली जाते. त्यामुळे अनेक चालक वाहने पुढे नेण्याच्या प्रयत्नात गर्दीत शिरण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे कोंडी वाढते. महामार्गालगत व सोमाटणे, परंदवडी, सोमाटणे शिरगाव रस्त्यालगत उभ्या केलेल्या अवजड वाहनांवर कारवाई होत नसल्याने कोंडीत आणखी भर पडते.

सोमाटणे येथील सेवारस्त्यावर अतिक्रमण करुन वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. ही अतिक्रमणे तातडीने काढली जातील.
- राकेश सोनवणे, कार्यकारी अभियंता, रस्ते विकास महामंडळ

सोमाटणे चौकातील अतिक्रमणांमुळे रुग्णालयाकडे जाणाऱ्या वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. रुग्णवाहिकांचा मार्ग बंद झाल्याने रुग्णास उपचार मिळण्यास उशीर होतो.
- अजय मुऱ्हे, अध्यक्ष, रुग्णवाहिका संघटना

या उपाययोजना असाव्यात
सेवारस्त्यावरील अतिक्रमणे हटविणे
पुणे-मुंबई महामार्गाचे तातडीने रुंदीकरण
अरुंद जागेतील टोलनाका अन्यत्र नेणे
बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करणे
सोमाटणे चौकात पूर्णवेळ वाहतूक पोलिस नेमावेत
चौकात उड्डाणपूल उभारणे. सिग्नल यंत्रणा नियमित कार्यरत ठेवणे
महामार्गालगत उभ्या केलेल्या अवजड वाहनावर कारवाई करणे.

PNE25V38812, 13, 14, 16

Marathi News Esakal
www.esakal.com