शालेय जगत

शालेय जगत

Published on

शालेय जगत
--------
रक्षाबंधन, वृक्षारोपण अन् क्रांतिकारकांचा आदरांजली

सरस्वती माध्यमिक
आकुर्डी येथील सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील एनसीसी विभाग, स्काऊट गाइड, पर्यावरण व विज्ञान मंडळाच्यावतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला. नवनगर मंडळाचे संस्थापक गोविंदराव दाभाडे, पर्यावरण संवर्धन समितीचे अनिल दोडमणी उपस्थित होते. प्रास्ताविक राहुल वांगेकर, निवेदन धैर्यशील लवांड, शिक्षक मनोगत प्रतिमा काळे यांनी केले. आभार कैलास कोशिरे यांनी मानले. या वेळी विद्यालयाच्या प्राचार्या संगीता गुरव, पर्यवेक्षक संजय कांबळे, मनीषा जाधव, गणेश भोने, जगदीश चव्हाण उपस्थित होते.

जयवंत प्राथमिक शाळा
जयवंत प्राथमिक शाळेत विद्यार्थी शालेय निवडणूक प्रक्रियांची प्रत्यक्षात माहिती व्हावी, यासाठी शालेय मंत्रिमंडळ निवडणूक घेण्यात आली.
यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. यासाठी केंद्राध्यक्ष-जान्हवी पोलिस पाटील, निवडणूक अधिकारी क्रमांक १- मन्नतकौर शिखरबाबी, निवडणूक अधिकारी क्रमांक २-प्रतीक साळवे, निवडणूक अधिकारी क्रमांक ३ - शिवन्या वायकर यांनी मतदार यादीतील नाव वाचणे, रजिस्टरवर सही घेणे, बोटाला शाई लावणे ही कामे अत्यंत उत्तम रीतीने पार पाडली. शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना सावंत यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. मतदानाच्या आधी प्रमुख पाहुणे संस्थेचे मार्गदर्शक दिलीप चव्हाण व माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अजय रावत यांना वंदना कोरपे यांनी डिजिटल निवडणूक प्रक्रिया समजावून दिली. बसवेश्वर औरादे यांनी फलकलेखन व इतर साहित्य तयार केले. विजयी उमेदवारातून खातेवाटप करून मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आले. तसेच ढोल ताशाच्या गजरात विजयी उमेदवारांचे स्वागत करण्यात आले.

संचेती प्राथमिक विद्यालय
थेरगाव येथील संचेती प्राथमिक विद्यालयात शासनाच्या ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमानांतर्गत घोरावडेश्वर येथे वृक्षारोपण करण्यात आले. वर्षा टाटिया, संचालक आदित्य टाटिया, श्रीधर गायकवाड यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. चौथीचे ५० विद्यार्थी यांच्यासह मुख्याध्यापक लक्ष्मण मोरे यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व विशद केले. सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनी औषधी वनस्पती व आंबा, चिंच, कडुनिंब, पिंपळ, वड, जांभूळ विविध प्रकारची देशी ५० झाडे लावण्यात आली. इको क्लब उपक्रम प्रमुख अनिल शिंदे व शिक्षिका पुनम खेडकर उपस्थित होते.

कन्या विद्यालय
कन्या विद्यालय पिंपरी वाघेरे येथील ५ वी ते १० वी मधील सर्व विद्यार्थिनींनी स्वतः बनलेल्या राख्या देशातील जवान बांधवांना राख्या बांधल्‍या. स्काऊट गाइड अंतर्गत दहावी अ मधील सर्व विद्यार्थिनींनी बनविलेल्या राख्या व शुभेच्छा पत्रे आळंदी देवाची येथील पोलिस बांधवांना विद्यालयातील शिक्षिका मोनल रावल व स्वाती धामणे यांनी नेऊन दिल्या. यासाठी गर्ल गाइड प्रमुख लता सानप चित्रकला शिक्षक युनूस शेख, पर्यवेक्षिका वैशाली मेमाणे व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुवर्णा परदेशी यांची संकल्पना होती.

सौ जयश्री निंबारकर प्राथमिक विद्यालय
चिंचवड-मोहननगर येथील सौ जयश्री निंबारकर प्राथमिक विद्यालय व माध्यमिक विद्यालयाच्या वतीने शाळा ते चिंचवड स्टेशन येथील आद्य क्रांतिवीर वस्ताद लहुजी साळवे व वासुदेव बळवंत फडके यांच्या पुतळ्यापर्यंत मशाल मिरवणूक काढण्यात आली. विद्यालयामध्ये संस्थेच्या अध्यक्षा जयश्री निंबारकर, शाहीर आतराम कसबे यांच्या हस्ते भारत मातेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध क्रांतिकारकाच्या वेशभूषा केल्या होत्या. यावेळी उपायुक्त
अण्णा बोदडे, अध्यक्षा जयश्री निंबारकर, मुख्याध्यापक आयुष निंबारकर यांच्या हस्ते पूजन व पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. शालेय विद्यार्थी शिक्षक यांनी या दिनी ‘स्वच्छतेची शपथ’ घेतली. सूत्रसंचालन गणेश वाळुंज व धनंजय जगताप यांनी केले.

पालक प्रशिक्षण व पालक सभा
डोअर स्टेप स्कूल फाउंडेशन व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले संस्था यांच्याद्वारे सौ जयश्री दिलीप निंबारकर प्राथमिक विद्यालयात पालक प्रशिक्षण व पालक सभा घेण्‍यात आली. विद्यार्थ्याला बाल्यावस्थेत अध्ययन व अध्यापनात येणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्यांच्यातील क्षमता विकसन करण्यासाठी व पालकांच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील सहभाग वाढावा यासाठी हे प्रशिक्षण आयोजित केले होते. यावेळी डोअर स्टेप स्कूल फाउंडेशनच्या पर्यवेक्षिका श्रुती संजय जोशी व पुस्तक परी स्नेहा अक्षय भिसे यांनी पालकांना हसत खेळत मनोरंजनात्मक खेळ घेत प्रशिक्षण दिली. मुळाक्षरेचे खेळ भेळ, अक्षर निवड शब्द तयार करणे, रांगोळीमध्ये नाव कोरणे दगडांचा वापर करून अक्षर तयार करणे तसेच ज्ञानेंद्रिय समन्वयाचे विविध खेळाचे प्रात्यक्षिक घेतले. सूत्रसंचालन उपशिक्षक धनंजय जगताप यांनी केले.

यशस्वी प्राथमिक व माध्यमिक
यशस्वी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील सावित्रीबाई फुले गाईड पथकाने एम.आय.डी.सी भोसरी पोलिस स्टेशनमधील दामिनी पथकामध्ये काम करणाऱ्या पोलिसांना राखी बांधून पोलिसांबद्दल असलेला आदर व त्यांच्या कार्याबद्दल असलेली कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. माजी सैनिक हरिदास कोकाटे व तुकाराम डफळ याच्या माध्यमातून सीमेवर कार्य करणाऱ्या सैनिकांसाठी राख्या पाठवल्या. यशस्वी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देवकाते, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शोभा देवकाते यांनी आयोजन केले होते. गाइड पथकातील विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतमधून पोलिसांबद्दलचा आदर व्यक्त केला.

क्रांती सप्ताहाची सांगता
श्री फत्तेचंद जैन विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, चिंचवड येथे क्रांती सप्ताहाची सांगता केली. प्रास्ताविक उपविख्याध्यापिका मनीषा जैन यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध क्रांतिकारकांच्या वेशभूषा परिधान करून सादरीकरण केले. भाषण स्पर्धेत ओम परदेशी (पाचवी), अर्णव खाडे (आठवी) आणि चेतन जाधव (दहावी) या विद्यार्थ्यांनी क्रांतिकारकांविषयी कृतज्ञता व्यक्त करीत देशभक्तीचे माहात्म्य सांगितले. विद्यालयाचे पर्यवेक्षक राजेंद्र पितळीया यांनी रक्षाबंधनाची माहिती सांगून नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषणात प्राचार्या सुनीता नवले यांनी स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांचे योगदान स्मरून सध्याच्या पिढीसमोरील विविध आव्हाने आणि नव्या क्रांतीची गरज यावर प्रकाश टाकत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन सोनाली ललवाणी यांनी केले. आभार पर्यवेक्षिका मनीषा कलशेट्टी यांनी मानले.

मॉडर्न हायस्कूल
मॉडर्न हायस्कूल यमुनानगर निगडी येथे क्रांतिदिन सप्ताहानिमित्त चित्रकला स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, रॅली, प्रश्नमंजूषा स्पर्धा अशा विविध स्पर्धा घेतल्‍या. विद्यार्थ्यांसाठी मिलिंद एकबोटे यांचे व्याख्यानाचे आयोजन केले होते. प्रसंगी पर्यवेक्षक विजय पाचारणे, गंगाधर सोनवणे, सांस्कृतिक विभाग प्रमुख जयश्री चव्हाण, गंगाधर वाघमारे, प्रशांत कुलकर्णी, विजय अहिरे, दिनेश गुंडगळ उपस्थित होते. या प्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका शारदा साबळे यांनी प्रास्ताविक केले. खंडू खेडकर यांनी परिचय करून दिला. दिलीप गुंड यांनी आभार मानले. नवेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे आयोजन वैशाली देसले, शिवाजी अंबिके यांनी केले. शाळा समिती अध्यक्ष प्रा. मानसिंग साळुंखे, व्हिजीटर प्रमोद शिंदे यांनी मार्गदर्शन केले.

पोलिस बांधवांसाठी रक्षाबंधन
जयवंत प्राथमिक शाळेच्या वतीने पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय चिंचवड येथे पोलिस बांधवांना राणी लक्ष्मीबाई गाइड पथकातील मुलींनी व शिक्षिकांनी राखी बांधून रक्षाबंधन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाअंतर्गत शाळेत मुलींनी मुलांना राख्या बांधल्या. मुलांनी भेटवस्तू दिल्या. प्रशालेच्या मुख्याध्यापिका वंदना सावंत यांनी विद्यार्थ्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देऊन नारळीपौर्णिमा व
रक्षाबंधनाची माहिती सांगितली व विद्यार्थी प्रतिनिधीस राखी बांधली. पहिली ते सातवीच्या वर्गातील काही मुलांनी भाऊ बहिणीचे गाणे, समूहगीत व नृत्य सादर केले. खाऊवाटप करून कार्यक्रमाचा समारोप झाला. कार्यक्रमाचे नियोजन जयश्री मोरे यांनी केले.


श्री सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर
आकुर्डी संचलित ‘श्री सरस्वती प्राथमिक विद्यामंदिरात रक्षाबंधन कार्यक्रम घेतला. यानिमित्ताने विद्यार्थ्यांना रक्षाबंधनाचे महत्त्व सांगण्यात आले. सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर शाळेचे मुख्याध्यापक राजू माळे उपस्थित होते. त्यांचेही औक्षण करण्यात आले. संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. प्रास्ताविक सविता पाटील यांनी केले. निवेदन रेश्मा बनसोडे यांनी केले. नयना पाटील, कैलास कोशिरे, विनोद गोयर, काळुराम पवार यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com