बेलगाम जड वाहने अन् प्रशासकीय नाकर्तेपणाचे बळी !

बेलगाम जड वाहने अन् प्रशासकीय नाकर्तेपणाचे बळी !

Published on

पिंपरी, ता. १३ ः खराब रस्ते, वाहतूक नियमनाचा अभाव आणि बेदरकार धावणारी अवजड वाहने या चक्रव्यूहात राजीव गांधी आयटी पार्कचा परिसर अडकला आहे. केवळ हिंजवडीच नाही; तर माण, मारुंजी, ताथवडे, पुनावळे या भागातही अशीच विदारक परिस्थिती आहे. अनेक वर्षांपासून ना रस्ते सुधारले, ना अवजड वाहनांवर कारवाई झाली. प्रशासनाच्या या अनावस्था आणि नाकर्तेपणाचे बळी मात्र या भागांतील नागरिक ठरत आहेत. या भागांत अवजड वाहनांमुळे अपघात होऊन गेल्या दहा महिन्यांत चार जणांचा बळी गेला आहे. यामुळे प्रशासनाने आता तरी ठोस कारवाई करावी, अशी मागणी आयटीयन्स व नागरिक करीत आहेत.

नियमावलीची गरज
या घटनेनंतर हिंजवडी व परिसरात अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध आणले गेले आहेत. मात्र, केवळ प्रवेशासाठी निर्बंध आणून हे अपघात थांबणार नाहीत; तर अवजड वाहनांसाठी काही नियमावली करावी, अशी मागणी आयटी कर्मचारी व स्थानिक रहिवासी करत आहेत. शहरातील सर्वच भागांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू आहेत. या बांधकामांसाठी लागणाऱ्या मालाची वाहतूक करण्यासाठी ट्रेलर, मिक्सर, डंपर ट्रक यासारख्या अवजड वाहनांची वाहतूक सुरूच राहणार आहे. त्यामुळे, त्यांना वेळेचे निर्बंध घालण्यासोबतच अन्य नियमही लागू करावेत, अशी अपेक्षाही ते व्यक्त करत आहेत.

काय आहेत मागण्या ?
- रस्त्यांवरील इतर वाहनांचा अंदाज येण्यासाठी अवजड वाहनांच्या दोन्ही बाजूला तसेच मागे कॅमेरे बसविण्यात यावेत
- जीपीएस प्रणालीद्वारे वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यात यावे
- ॲँटी कोलिजन किंवा सेन्सर या सुरक्षेसाठी आवश्‍यक प्रणालीचा वाहनांच्या उत्पादन होतानाच समावेश असावा
- चालकाचे वर्तन, शिस्त यावर नजर ठेवण्यासाठी वाहनांच्या केबिनमध्ये कॅमेरे असावेत
- सुरक्षेच्या नियमावलीचे उल्लंघन झाल्यास वाहनाचे उत्पादक, कंत्राटदार यांच्यावरही कारवाई करण्यात यावी
- प्रवासी वाहनांप्रमाणे अवजड वाहनांनी देखील मूलभूत सुरक्षा मानकांचे पालन केले पाहिजे
- वाहनांमध्ये कोणतीही सुरक्षेची मानके नसल्यास कमीत कमी क्लीनर असावा

जानेवारी २०२५ पासून झालेले अपघात
२४ जानेवारी ः नियंत्रण सुटून उलटलेल्या डंपरखाली चिरडून दोन विद्यार्थिनींचा माण येथे मृत्यू
३० जुलै ः खराब रस्त्यामुळे वाहन घसरून ट्रकच्या खाली आल्याने पुनावळे येथे व्यावसायिक महिलेचा मृत्यू
१२ ऑगस्ट ः रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या ११ वर्षीय प्रत्युषाचा डंपरखाली चिरडून मृत्यू
१० ऑक्टोबर ः कामानिमित्त बाहेर पडलेल्या ब्युटिशियनचा पांडवनगर येथे मृत्यू

खराब रस्तेही कारणीभूत
हिंजवडी आणि परिसरात होणाऱ्या या अपघातांसाठी अवजड वाहनांसोबतच खराब रस्तेही कारणीभूत आहेत. शुक्रवारी पांडवनगर येथे घडलेली घटनाही याला अपवाद नाही. गेल्या अनेक वर्षांपासून चांगले रस्ते, चालण्यायोग्य पदपथांसाठी येथील नागरिक व आयटी कर्मचारी विविध मार्गांनी आंदोलने करत आहेत. रस्ते, पायाभूत सुविधांचा अभाव व वाहतूक कोंडी यावर तोडगा काढण्यासाठी आयटी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यासोबत बैठक घेतली. उपमुख्यमंत्र्यांनीही या भागांत दोन वेळा भेट देऊन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. मात्र, येथील प्रशासकीय विभागांच्या नाकर्तेपणामुळे रस्त्यांच्या कामाला मात्र अद्यापही मुहूर्त लागलेला दिसत नाही.


पांडवनगर येथे झालेल्या अपघातानंतर आम्ही येथील पोलिस प्रशासनाला पत्र देऊन अवजड वाहनांची सुरक्षित वाहतूक कशी करता येईल ? याबाबत काही सूचना केल्या आहेत. सध्या या भागांतील कामे पाहता अवजड वाहने पूर्णपणे थांबवणे अशक्य आहे. मात्र, काही सुरक्षेचे नियम पाळले; तर नागरिकांचा जीव वाचेल. ही वाहने ज्या व्यावसायिकांची आहेत. त्यांनी या नियमांचे पालन करणे अनिवार्य करावे.
- पवनजीत माने, आयटी कर्मचारी व अध्यक्ष, एफआयटीई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com