ऐन दिवाळीत ५० सोसायट्यांना १४ तासांचा ‘झटका’
वाकड, ता. १६ : ‘एज्युकेशन हब’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ताथवडे परिसरातील प्रसिद्ध गाडा रस्त्यालगतच्या ५० पेक्षा अधिक उच्चभ्रू सोसायट्यांना बुधवारी (ता. १५) ऐन दिवाळीत विजेचा १४ तास जोरदार ‘झटका’ बसला. अनेक तास विजेची वाट पाहिल्यानंतर सणासुदीत घरी अंधार नको म्हणून या सोसायट्यांनी जनरेटरचा आधार घेतला. त्यामुळे डिझेलवर तब्बल दहा लाख रुपयांहून अधिकचा भुर्दंड त्यांना बसला.
गाडा रस्त्याच्या दुतर्फा अनेक लहान-मोठ्या उच्चभ्रू सोसायट्या असून या परिसरात बुधवारी पहाटे सहाच्या सुमारास वीज खंडित झाली. ती पुन्हा दुपारी तीनला पूर्ववत झाली. दीड तासानंतर पुन्हा खंडित झाली. ते मध्यरात्री बाराच्या सुमारास परत आली. तब्बल १४ तास वीजपुरवठा खंडित झाल्याने रहिवाशांच्या संतापाचा सोशल मीडियावर अक्षरशः उद्रेक झाला.
दिवसभर वीज नसल्याने सोसायटी व्यवस्थापनांनी जनरेटर सुरू ठेवत काही प्रमाणात दिलासा दिला. पण, त्यासाठी तब्बल हजारो ते लाखो रुपयांची मोठी किंमत मोजावी लागली. ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्यांना ऑफिसकडे धाव घ्यावी लागली; तर घरातील ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि आजारी व्यक्तींना उकाड्यात राहावे लागले. पाण्याचा पुरवठाही ठप्प झाल्याने रहिवाशांच्या सहनशक्तीचा अंत झाला. दरम्यान, या उपकेंद्रावरील वीज ग्राहकांचा दत्तनगर फिडरवर वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.
या परिसरात वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. लाइन तपासणी आणि देखभाल वेळेवर केली जात नाही. त्यामुळे अशा बिघाडांचा पाढा चालू आहे. आमच्या सोसायटीत तब्बल १४ तास वीजपुरवठा ठप्प होता. जनरेटरवर सव्वा लाख रुपये खर्च झाले. आम्ही बिले वेळेवर भरतो. मग, इतक्या वेळ वीज गायब का ? एवढा डिझेल खर्च कोण भरून देणार ?
- स्नेहल फटिंग, अध्यक्षा, अक्षर एलेमेंटा सोसायटी
कुठे वीज खंडित ?
अक्षर एलेमेंटा, द नूक, ऑस्टिन काऊंटी, ऑस्टिन पार्क, गंगा अंबर, स्काय स्क्रॅपर, गंगा ऑरम, पॅलेडिओ, गंगा सायपर्स, कोहिनूर १, २, ३, स्टार उड्स, अटलांटे आदी.
अक्षरलँड येथील २२ केव्ही फिडरमध्ये सकाळी सहा वाजता बिघाड झाला. त्याचे दुरुस्तीचे काम करून वीज पुरवठा एक वाजता सुरू झाला. परंतु ब्रेकर रिलेमध्ये तांत्रिक बिघाड आल्यामुळे वीज पुरवठा तीन वाजता सुरळीत सुरू झाला. बंद काळामध्ये अक्षरलँड उपकेंद्रावरील आउटगोइंग उच्चदाब वाहिनीवर असलेल्या ग्राहकांचा वीज पुरवठा ११ केव्ही बीए कन्सल्टन्सी वाहिनीवर ‘बॅक फीड’ करण्यात आला. त्यामध्ये बंद भागांतील वीज ग्राहकांना चक्राकार पद्धतीने इतर वाहिनीवरून वीजपुरवठा सुरू ठेवण्यात आला.
- विकास पुरी, जनसंपर्क अधिकारी, महावितरण
WKD25A09688
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.