काळेवाडी बीआरटी मार्गात अपघाताची मालिका सुरुच
पिंपरी, ता. २० ः पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दुर्लक्षामुळे काळेवाडी येथील बीआरटी मार्गातील उंच दुभाजकांवर वाहन चढून होणाऱ्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सुमारे नऊ इंच उंच असलेल्या या दुभाजकासमोर रिफ्लेक्टर किंवा इशारा फलक नसल्यामुळे खासगी वाहने वारंवार दुभाजकावर जाऊन अपघात होत आहेत, परिणामी वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. बीआरटी मार्गात बेकायदेशीरपणे घुसणाऱ्या खासगी वाहनांमुळे अनेकदा बीआरटी बस अडकून राहत असल्यामुळे प्रवाशांचा संताप होत आहे.
काळेवाडी-देहू-आळंदी बीआरटी मार्गावर नेहमीच वाहतुकीची वर्दळ असते. रहाटणी फाटा, धनगरबाबा मंदिर चौक, तापकीर चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दररोज कोंडी निर्माण होते. त्यामुळे वेळ वाचवण्यासाठी वाहनचालक बीआरटी मार्गातून बेकायदेशीरपणे वाहने चालवतात. यामध्ये काही चालक परस्परविरुद्ध दिशेने वाहन चालवतात, ज्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांच्या हेडलाइटचा प्रकाश डोळ्यावर पडून वाहनावरील नियंत्रण सुटते. येथे रिफ्लेक्टर नसल्यामुळे रस्त्याच्या मधोमध असणारा नऊ इंचाचा दुभाजक दिसत नसल्यामुळे वाहने थेट दुभाजकावर जाऊन अपघात होत आहेत. याबाबत दैनिक ‘सकाळ’ने वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध करून ही बाब महापालिकेच्या निदर्शनास आणून दिली आहे. तरी, महापालिकेने आजअखेर याठिकाणी रिफ्लेक्टर बसविले नाहीत. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
शुक्रवारी (ता. १७) सायंकाळी साडेआठच्या सुमारास अशाच प्रकारे भरधाव वेगात जाणाऱ्या वाहनचालकाला धनगरबाबा मंदिर चौकातील उंच दुभाजक दिसला नाही. त्यामुळे वाहन थेट दुभाजकावर आदळून अपघात झाला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले. या मार्गावर वारंवार होणाऱ्या अशा अपघातांमुळे नागरिकांनी बीआरटी मार्गावर रिफ्लेक्टर बसविणे, योग्य प्रकाशयोजना करण्याची मागणी केली आहे.
‘‘काळेवाडी बीआरटी मार्गात वाहतूक कोंडी आणि रिफ्लेक्टर नसलेल्या दुभाजकांमुळे अपघातांचा धोका वाढला आहे. महापालिकेने तातडीने रिफ्लेक्टर बसवून मार्ग सुरक्षित करावा.
- सचिन गायकवाड, वाहनचालक
‘‘बीआरटी मार्गातील दुभाजक, रंबलर पट्ट्यांना रंग देण्याचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण केल्यानंतर पुढील पंधरा दिवसांत दुभाजकासमोर दिशादर्शक रिफ्लेक्टर बसविण्याचे काम सुरू केले जाईल.
- बापूसाहेब गायकवाड, सहशहर अभियंता, बीआरटी स्थापत्य प्रकल्प विभाग, महापालिका