गुन्हे वृत्त
चिखलीत तरुणावर चाकूने वार
पिंपरी : चकना सेंटर चालवणाऱ्या तरुणावर चाकूने वार केले. तसेच त्याच्या दोन मित्रांना मारहाण करून टोळक्याने परिसरात दहशत माजवली. ही घटना चिखली, कुदळवाडी येथे घडली.
आदित्य बालटकर (रा. घरकुल, चिखली), साहिल गावडे, हनुमंत सोडनर अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी आदित्य यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी केशव मोती विश्वकर्मा (रा. रहाटणी) आणि वकील मस्जिद खान (रा. चिंचवड) यांना अटक केली आहे. तर साहिल शेख (रा. चिंचवड), एक महिला आणि इतर चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी आणि त्यांचा मित्र साहिल गावडे चकना विकत असताना आरोपी महिला तिथे आली. चकना सेंटर बंद करण्याची धमकी दिली. त्यानंतर तिने तिचा मुलगा सोहेल याला बोलावले. आरोपी केशव, वकील यांनी येऊन आदित्य यांना दगडाने मारहाण केली. तर महिला आरोपीने चाकूने वार केले.
किवळेत मजुराचा मृत्यू
पिंपरी : लिफ्टच्या डक्टमध्ये पडून एका मजुराचा मृत्यू झाला. ही घटना किवळे येथील द स्कायलार्क सोसायटी येथे घडली. मोहम्मद जैद अब्दुल कलाम खान (वय २०) असे मृत मजुराचे नाव आहे. या प्रकरणी कयामुद्दीन अब्दुल कलाम खान यांनी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी असगर अली खान (रा. शिरगाव, मावळ) याला अटक केली आहे. फिर्यादीचा भाऊ मोहम्मद जैद अब्दुल कलाम खान हा इमारतीच्या चौथ्या मजल्यावर काम करत असताना तेथून खाली पडल्याने गंभीर जखमी झाला. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. कामाच्या ठिकाणी कामगारांच्या बचावासाठी कोणतीही सुरक्षेची जाळी लावलेली नव्हती. तसेच कोणताही सेफ्टी बेल्ट पुरवण्यात आला नव्हता. अशा असुरक्षित ठिकाणी काम करण्यास सांगितल्यामुळे फिर्यादीच्या भावाच्या झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
भाटनगरमध्ये तरुणाला मारहाण
पिंपरी : दोन वर्षांपूर्वी झालेल्या वादाच्या कारणावरून एका तरुणाला शिवीगाळ करून हाताने व सिमेंटच्या गट्टूने मारहाण केली. ही घटना पिंपरीतील भाटनगर येथे घडली. या प्रकरणी अबरार अल्ताफ शेख (रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी संकेत जाधव उर्फ मारी, नीलेश मोहिते यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी हे घरातील साहित्य आणण्यासाठी बाहेर जात होते. त्यावेळी त्यांना आरोपींनी अडवले. आरोपी आणि अबरार यांच्यात दोन वर्षांपूर्वी रिक्षाच्या भाड्यावरून वाद झाला होता. त्या वादाच्या कारणावरून आरोपींनी अबरार यांना मारहाण केली.