आज पाडव्याला खरेदीचा बार उडणार
सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २१ ः दिवाळीचा उत्साह शिगेला पोचत आहे. मंगळवारी लक्ष्मीपूजनानिमित्त आतषबाजी केल्यानंतर नागरिक बुधवारी पाडव्याला खरेदीचा बार उडविण्यासाठी सज्ज झाले आहेत. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या पाडव्याला वाहन, सोने, घर आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, कपड्यांची खरेदी केली जाते. सराफा बाजारही तेजीत आहे.
जीएसटीचे दर कमी झाल्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, घरे, वाहनांच्या किमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे खरेदीदारांचा आनंद द्विगुणित झाला आहे. पाडव्याला वाहन घरी आणण्यासाठी नागरिकांची पसंती असते. सध्या वाहनांची माहिती घेऊन आरक्षणासाठी गर्दी होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. वाहन क्रमांक नोंदणी प्रक्रियेसाठी दोन ते तीन दिवस लागतात. दरवर्षी पाडव्याला सरासरी चार ते पाच हजार वाहनांची विक्री होते. यंदाही शहरातील विविध शोरुम्समध्ये गर्दी होत आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विक्रेत्यांनी आकर्षक सवलती जाहीर केल्या आहेत.
इलेक्ट्रॉनिक्स दुकानांमध्ये गर्दी
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स दुकानदारही विविध ऑफर देत आहेत. पाच ते दहा टक्के सूट, १० टक्के कॅशबॅक, फ्री होम डिलिव्हरी, जुन्या वस्तूंच्या बदल्यात नव्या वस्तूंवर सूट अशा ऑफर आहेत. विशेषत: महिला वर्गाकडून गृहोपयोगी वस्तू खरेदीला पसंती दिली जाते. यामध्ये वॉशिंग मशिन, टीव्ही आणि रेफ्रिजरेटरचा समावेश असतो. याशिवाय लॅपटॉप, मोबाईल आदींचीही खरेदी केली जाते. यंदा इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरील जीएसटी २८% वरून १८% टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. त्यामुळे किमती कमी झाल्याने खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे.
दागिने खरेदीला पसंती
सोने-चांदी खरेदीकडे दिवसेंदिवस कल वाढत आहे. गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवून नाणी आणि वळी खरेदीला प्राधान्य देत आहेत. यंदा मात्र सोने आणि चांदीचे भाव तेजीत आहेत. तरीही यंदा धनत्रयोदशीच्या दिवशी अनेकांनी सोने व चांदी खरेदीला पसंती दर्शवली. आता पाडव्याचा मुहूर्त साधण्यासाठी नागरिक सज्ज झाले आहेत. तर दिवाळीनंतर लग्नसराई सुरू होणार असल्यामुळे अनेकांनी पाडव्याच्या मुहूर्तावर दागिन्यांची खरेदी करण्यासाठी बेत आखला आहे.
-----
पाडव्याच्या मुहूर्तावर गृहप्रवेश
साडेतीन मुहूर्तापैकी दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर घर, जमीन खरेदी, नवीन वास्तूत प्रवेश करण्याची अनेकांची इच्छा असते. शहरात सुमारे २५० ते ३०० बांधकाम व्यावसायिक असून त्यांचे नवनवीन गृह प्रकल्प सुरु आहेत. तर काही प्रकल्प पूर्ण झाले आहेत. बांधकाम व्यावसायिकांनी दिवाळीच्या मुहूर्तावर घर खरेदी करणाऱ्यांसाठी मुद्रांक शुल्क आणि एकूण किमतीच्या फक्त दोन टक्के रक्कम भरून घराचा ताबा, इंटेरियर डिझाइनसह विविध ऑफर दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच सिमेंट आणि बांधकाम साहित्यांवरील जीएसटीचे दर कमी झाल्यामुळे नवीन प्रकल्पातील घरांच्या किमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे अनेकांनी नवीन प्रकल्पात बुकिंग करण्याला प्राधान्य दिले. यंदा घर खरेदीसाठी चांगला प्रतिसाद असून पिंपळे सौदागर, बाणेर, पुनावळे, ताथवडे, वाकड, रावेत, हिंजवडी, मोशी, चऱ्होली या भागांत घरांना सर्वांत जास्त मागणी असल्याचे बांधकाम व्यावसायिकांनी सांगितले.
--------
जीएसटीचे दर कमी झाल्यामुळे यंदा इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीकडे नागरिकांचा कल वाढला आहे. गतवर्षीच्या तुलनेत २० ते ३० टक्के ग्राहक वाढले आहेत. दिवाळीनिमित्त सूर्या इलेक्ट्रॉनिक्सकडून वर्षातील सर्वात मोठी ऑफर सुरु आहे.
- रमेश चौधरी, संचालक, सूर्या इलेक्ट्रॉनिक्स
---
दिवाळीचा मुहूर्त साधत अनेकांनी नवीन घराचे स्वप्न पूर्ण केले. नागरिक घर खरेदी करताना मुलांच्या गरजा लक्षात घेऊन दोन आणि तीन बीएचके घरांना पसंती देत आहेत.
- आकाश अग्रवाल, व्यवस्थापकीय संचालक, क्रिसाला डेव्हलपर्स
---
इलेक्ट्रीक वाहनांमध्ये आता नवनवीन मॉडेल आली आहेत. त्यामुळे
इलेक्ट्रीक वाहन खरेदीकडे दिवसेंदिवस नागरिकांचा कल वाढत आहे. गेल्या दोन वर्षापैकी यंदा वाहन विक्री जोरात आहे.
- मनीष मोहिते, संचालक, जय माता दी ग्रीन
--------
सोने चांदीचे दर वाढत असले तरी नागरिकांचा खरेदीकडे कल आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर अनेकजण सोने-चांदीची नाणी, दागिने खरेदी करतात. यंदाही पाडव्याच्या मुहूर्त साधत नागरिक सोने चांदी खरेदी करतील.
- राहुल चोपडा, संचालक, सत्यम ज्वेलर्स
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.