गुन्हे वृत्त
नेरेमध्ये एकाला मारहाण
पिंपरी : एका रंगाऱ्याने रंगकाम करण्यास नकार दिल्याच्या कारणावरून त्याला मारहाण करण्यात आली. ही घटना मुळशी तालुक्यातील नेरे येथे घडली. शिवाजी शेखर भालेराव (रा. कासारसाई, मुळशी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी वसंत राठोड, विशाल जाधव (दोघेही रा. नेरे- दत्तवाडी, मुळशी) आणि त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यातील विशाल जाधव याला अटक झाली आहे. आरोपी वसंत राठोड याने फिर्यादी यांना नेरे गाव येथे बोलावून घेतले. तसेच काम करण्यास नकार दिल्याच्या कारणावरून आरोपी राठोड व जाधव यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली.
दुचाकीच्या धडकेत दांपत्य जखमी
पिंपरी : एका भरधाव दुचाकीने दुसऱ्या दुचाकीला जोरात धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दांपत्य जखमी झाले. ही घटना पुणे - नाशिक महामार्गावर मोशीमधील बनकर वस्ती येथे घडली.
दीपांजली सोनटक्के व सौरव सोनटक्के (रा. मोशी) असे या अपघातात जखमी झालेल्या दांपत्याचे नाव आहे. या प्रकरणी सौरव सोनटक्के यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात दुचाकी चालकावर गुन्हा दाखल केला आहे. सौरव सोनटक्के आणि त्यांची पत्नी दीपांजली हे सांगवी येथून डुडुळगावच्या दिशेने दुचाकीवरून जात होते. मोशी येथे आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला भरधाव दुचाकीने धडक दिल्याने दीपांजली रस्त्यावर पडल्या. त्यांच्या डोक्याला, हाताला, चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. तसेच सौरव हे देखील जखमी झाले.
पिंपरीत महिला वाहतूक पोलिसाला मारहाण
पिंपरी : रस्त्यावर उभा केलेला टेम्पो बाजूला घेण्यास सांगितल्याने टेम्पो चालकाने महिला वाहतूक पोलिसाला मारहाण केली. ही घटना पिंपरीतील शगुन चौकाजवळ घडली.
या प्रकरणी महिला पोलिस शिपाई यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शरद अशोक कांबळे (रा. मांजरी खुर्द, पुणे) याला अटक केली आहे. फिर्यादी या पिंपरी वाहतूक विभागात नेमणुकीस असून त्या शगुन चौक येथे वाहतूक नियमन करीत होत्या. त्यावेळी शरद कांबळे टेम्पो घेऊन शगुन चौकातून साई चौकाकडे जात होता. दरम्यान, त्याचा टेम्पो एका दुकानासमोर रस्त्यावर थांबविल्याने वाहतुकीस अडथळा होऊ लागला. त्यामुळे फिर्यादी यांनी टेम्पोचालकाला टेम्पो पुढे घेण्यास सांगितले. त्या कारणावरून त्याने जाधव यांना शिवीगाळ करून त्यांच्या अंगावर धावून येत त्यांना मारहाण केली.