आकुर्डीत वारकरी भवनाच्या मुहूर्ताची प्रतीक्षा

आकुर्डीत वारकरी भवनाच्या मुहूर्ताची प्रतीक्षा

Published on

पिंपरी, ता. १८ ः जगद्‍गुरू संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी सोहळा दरवर्षी आकुर्डी येथील श्री विठ्ठल मंदिरात मुक्कामी असतो. मात्र, त्या परिसरातील पालखी तळाची जागा खूपच अपुरी पडते. त्यामुळे सोहळा प्रमुखांसह विश्‍वस्त व अन्य प्रमुख दिंड्यांतील वारकऱ्यांच्या मुक्कामाची गैरसोय होते. ती दूर करण्यासाठी आकुर्डीत वारकरी भवन अनेक वर्षांपासून प्रस्तावित आहे. महापालिकेने त्याबाबतचा ठराव २००६ मध्ये अर्थात १९ वर्षांपूर्वी केलेला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांचा ३५० वा जन्मोत्सवी वर्ष आणि संत तुकाराम महाराज यांचे ३७५ वे वैकुंठगमन वर्ष असल्याने यावर्षी त्याला मुहूर्त लागण्याची अपेक्षा वारकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
संत तुकाराम महाराज यांचे देहू आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचे संजीवन समाधी स्थळ आळंदी ही तीर्थक्षेत्रे आकुर्डीपासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर आहेत. वर्षभर विविध कार्यक्रमांनिमित्त वारकऱ्यांची आकुर्डीतून ये - जा सुद्धा सुरू असते. आषाढी वारीनिमित्त देहू येथून पंढरपूरकडे निघालेला संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा देहूनंतरचा पहिला मुक्काम आकुर्डीत असतो. त्यामुळे वारकऱ्यांच्या सोयीसाठी आकुर्डीत वारकरी भवन प्रस्तावित आहे. त्या संदर्भाचा ठराव महापालिका सर्वसाधारण सभेने डिसेंबर २००६ मध्ये मंजूर केला आहे. त्यासाठीची जागाही निश्चित करून ६६ लाख ९८ हजार रुपयांचा निधीही मंजूर केला होता. मात्र, अद्याप त्याला मुहूर्त मिळालेला नाही. मात्र, आता गेल्या महिन्यात महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी संबंधित जागेची पाहणी करून वारकरी भवन उभारण्याबाबतचा आढावा घेतला आहे. त्यामुळे पुढील वर्षीच्या वारीपर्यंत वारकरी भवन उभे राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

वारकऱ्यांच्या सुविधांचे नियोजन
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे आकुर्डी येथील मुक्कामाच्या ठिकाणाची व वारकरी भवनाच्या नियोजित ठिकाणांची पाहणी करून आयुक्त शेखर सिंह यांनी पंधरा दिवसांपूर्वी आढावा घेतला होता. त्यावेळी, पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने वारकऱ्यांसाठी देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही. वारकऱ्यांचा मुक्काम असणाऱ्या ठिकाणी वारकऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोयी सुविधांचे नियोजन केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

असा आहे ठराव
आकुर्डीत वारकरी भवन उभारण्यासंदर्भातील ठरावात असे म्हटले आहे की, आकुर्डी प्राधिकरण पेठ क्र. २८ मधील व्यापारी संकुलामध्ये वारकरी भवन, ध्यानगृह आणि संगीत विद्यालयासाठी सभागृह बांधण्यात यावे. तसेच वारकरी भवनाचे बांधकाम झाल्यानंतर त्याचे ‘संत नामदेव महाराज पालखी भवन’ आणि नियोजित सभागृहाचे ‘संत नरहरी रोहिदास अध्यासन ध्यानगृह’ असे नामकरण करण्यात यावे.

वारकरी म्हणतात...
यंदा संत ज्ञानेश्वर महाराज यांचे ७५० वे जन्मवर्ष आणि संत तुकाराम महाराज यांचे ३७५ वे वैकुंठगमन वर्ष आहे. या पर्वणी काळात पिंपरी चिंचवड महापालिकेने प्रशस्त व सुंदर वारकरी भवन उभारून वारकऱ्यांना आगळीवेगळी भेट द्यावी. वारकऱ्यांसाठी ही अनोखी भेट ठरेल.
- पुरुषोत्तम महाराज मोरे, माजी अध्यक्ष, श्रीसंत तुकाराम महाराज संस्थन, देहू

संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखीचा पहिला मुक्काम आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात असतो. वाढते शहरीकरण व नागरीकरणामुळे पालखी सोहळ्यातील दिंड्या, वारकरी, फडकरी यांना निवासाची अडचण भेडसावत आहे. वारकरी भवन उभारल्यास दिंड्यांमधील महिला वारकऱ्यांच्या निवासाची व्यवस्था होईल.
- विजय जगताप, अध्यक्ष, महाराष्ट्र वारकरी महामंडळ

आकुर्डी प्राधिकरणातील गंगानगर येथील जागेत पाच मजली वारकरी भवन उभारण्यात यावे. त्यामध्ये ग्रंथालय, संगीत वर्ग, प्रदर्शन कक्ष, विश्रामगृह, ध्यानकक्ष, संतदर्शन दालन असावे. शिवाय, प्रशस्त वाहनतळाची व्यवस्थाही करता येईल. यामुळे वारीकाळासह अन्य वेळीही वारकऱ्यांची सोय होईल.
- जयंत बागल, सचिव, महाराष्‍ट्र वारकरी महामंडळ तथा माजी
महासचिव संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन समिती, देहू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com