शहरातील क्राइम

शहरातील क्राइम

Published on

शिरगाव येथे गावठी दारू जप्त
पिंपरी ः शिरगाव येथे पवना नदीच्या काठावर एका २८ वर्षीय महिलेने दारू भट्टी लावली. या दारू भट्टीवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने कारवाई केली. या कारवाईमध्ये दारूसाठी आवश्यक दीड लाख रुपयांचे रसायन नष्ट करण्यात आले. तसेच सात हजार रुपये किंमतीची ७० लिटर तयार दारू आढळली. संबंधित महिलेच्या विरोधात शिरगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तरुणास अटक
पिंपरी ः बेकायदेशीरपणे ५० हजार रूपये किंमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस बाळगल्या प्रकरणी गुन्हे शाखेने एका तरुणास अटक केली. ही कारवाई खेड तालुक्यातील निघोजे येथे करण्यात आली.
शुभम सोमेश्वर मुंगडे (वय २०, रा. कडाचीवाडी, खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

बोपखेल येथे तरूणाचा खून
पिंपरी ः तिघांनी मिळून एका तरूणाच्या डोक्यात सिमेंट ब्लॉक मारून खून केला. ही घटना बोपखेल येथील गणेशनगरमध्ये सोमवारी (ता.१६) सायंकाळी सव्वापाच ते साडेसहाच्या दरम्यान घडली.
या प्रकरणी दोन जणांना दिघी पोलिसांनी अटक केली असून १५ वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. विकास राजेश खरे (वय २४, रा. बोपखेल) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. रोहन अरुण गायकवाड (वय २१), माम्या उर्फ प्रतीक दौलत मोहोड (वय २७, दोघे रा. बोपखेल) अशी अटक आरोपींची नावे आहेत. नीरज राजेश खरे (वय २७) यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी गायकवाड याच्या नातेवाईक महिलेची विकास हा वारंवार छेडछाड करत असे. आरोपी आणि मयत विकास हे दारू पित बसले होते. त्यावेळी झालेल्या वादात आरोपींनी विकासच्या डोक्यात सिमेंटच्या गट्टू मारला.

गुंतवणूकीच्‍या बहाण्याने १५ लाखांची फसवणूक
पिंपरी ः ब्लिंक्स प्रो ट्रेडिंग अ‍ॅपच्या नावाखाली इन्व्हेस्टमेंटचे आमिष देत सुमारे १५ लाखांची फसवणूक करण्यात आली. ही घटना दत्त मंदिर रोड, वाकड येथे घडली. रिची आणि निनाद ( पूर्ण नाव माहिती नाही) अशी गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपींची नावे आहेत. याबाबत वाकड येथे राहणाऱ्या ३४ वर्षीय व्‍यक्‍तीने वाकड पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. ही घटना २९ एप्रिल ते २ मे २०२५ या कालावधीत घडली. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, २९ एप्रिल ते २ मे २०२५ दरम्यान आरोपींनी व्हॉट्सअ‍ॅपवरून फिर्यादीशी संपर्क साधून गुंतवणूक केल्‍यास दरमहा १० टक्‍के परतावा देण्‍याचे आमिष दाखविले. तसेच १४ लाख ९३ हजार ५०० रुपये विविध बँक खात्यांत वळते करून घेत कोणताही परतावा न देता फसवणूक केली.  

दोघा भावांची तरुणाला मारहाण
पिंपरी ः नातेवाईकाच्‍या टेम्‍पोची तोडफोड करताना अडविल्‍याच्‍या कारणावरून दोन भावांनी एका तरुणास मारहाण करून जखमी केले. ही घटना अजंठानगर, निगडी येथे घडली.
जीवन पोटभरे आणि आदर्श पोटभरे (दोघेही रा. अजंठानगर, निगडी) अशी गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपींची नावे आहेत. मयूर सुनील क्षेत्रे (वय २८, रा. अंजठानगर, चिंचवड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्‍यांनी याबाबत निगडी पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. आरोपी जीवन हा फिर्यादी यांचे नातेवाईक पप्‍पू सदाफुले यांच्‍या टेम्पोचे नुकसान करत होता. याबाबत फिर्यादी यांनी त्‍यास तसे करण्‍यास मनाई केली. या कारणावरून आरोपी जीवन याने फिर्यादीच्या डाव्या कानावर व मानेवर टणक वस्तूने मारहाण केली. तर आरोपी आदर्श याने लाथाबुक्क्या मारल्या.

टेम्पोच्या धडकेत रिक्षा चालक जखमी
पिंपरी ः टेम्पोने धडक दिल्याने रिक्षाचालक जखमी झाला. ही घटना वाकडमधील भूमकर चौकाजवळ घडली.
पोलिसांनी अज्ञात टेम्‍पोवरील चालकाच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे. बाळू बंडू गिरी (वय ३०, रा.पिंपळे गुरव) असे अपघातात जखमी झालेल्‍या रिक्षा चालकाचे नाव आहे. त्‍यांनी याबाबत हिंजवडी पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. अपघातात
फिर्यादीच्या पायाला फ्रॅक्चर झाले. प्रवासी महिला किरकोळ जखमी झाल्या.

विजेच्या झटक्याने कामगार महिलेचा मृत्यू
पिंपरी ः हॉटेलमध्ये विजेचा झटका लागून महिला कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना दत्तनगर, चिंचवड येथे घडली.
दीपाली नीनू जाधव (वय ३०) असे मृत कामगार महिलेचे नाव आहे. याबाबत तिचे पती नीनू नथुराम जाधव (वय ३८, ‍दत्तनगर, चिंचवड) यांनी पिंपरी पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली. हॉटेल चालक वैभव मोरे (रा.फुलेनगर, चिंचवड) असे गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपीचे नाव आहे. फिर्यादीची पत्नी दीपाली जाधव या हॉटेल मोरे व्‍हेज नॉनव्‍हेज चायनीज सेंटर येथे भांडी धूत असताना विजेचा झटका लागून मृत्यूमुखी पडल्‍या. घटनास्थळी पाणी साचलेले होते व सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना नव्हत्या.

तळवडे येथे वारकऱ्याचा मृत्यू
पिंपरी : भरधाव वेगातील क्रेनने धडक दिल्यामुळे एका वारकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना देहू - आळंदी रोडवर तळवडे येथे बुधवारी दुपारी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. नारायण गोरवे (वय ५७, रा. आहेरगाव, ता. माढा, जि. सोलापूर) असे मृत वारकऱ्याचे नाव आहे. ते देहूवरून आळंदीला पायी चालले होते. तळवडे येथील शेलार वस्तीजवळ आले असता पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या क्रेनने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. चिखली पोलिसांनी त्यांना त्वरित वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पोलिसांनी आरोपी क्रेन चालक याला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com