रेल्वे प्रवाशांच्या मागण्या बेदखलच

रेल्वे प्रवाशांच्या मागण्या बेदखलच

Published on

पिंपरी, ता. २२ : ‘‘चिंचवड रेल्वे स्थानकावर सर्व एक्स्प्रेस गाड्यांना थांबा द्यावा. मुंबईला जाणाऱ्या एक्स्प्रेसला बोगी (डब्बे) वाढवा, पुणे-लोणावळा लोकल फेऱ्या वाढवाव्यात,’’ अशा विविध मागण्या अनेक वर्षांपासून होत आहेत. मात्र, प्रवाशांच्या मागणीला रेल्वे प्रशासन दाद देत नसल्याचे चित्र आहे. प्रशासनाला निवेदने, लोकप्रतिनिधीचे उंबरे झिजविण्याव्यतिरिक्त प्रवाशांच्या पदरी अद्याप काहीच पडलेले दिसत नाही.

पिंपरी-चिंचवड शहराचा औद्योगिक विकास झाल्यामुळे देशातील आणि राज्यातील विविध भागातील नागरिक रोजगारानिमित्त शहरात स्थायिक झाले आहेत. शहराचा विस्तार आणि लोकसंख्याही झपाट्याने वाढत आहे. शहरातून दररोज शिक्षण, व्यवसाय, नोकरीनिमित्त रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र, शहरात सर्व एक्स्प्रेस रेल्वेगाड्या थांबतील असे एकही रेल्वे स्थानक नसल्यामुळे प्रवाशांना पुणे रेल्वे स्थानकावर जावे लागते. त्यामुळे चिंचवड रेल्वे स्थानकवार सर्व एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्याची मागणी होत आहे. तसेच शिक्षणासाठी ग्रामीण आणि उपनगरांतून दररोज हजारो विद्यार्थी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात लोकल रेल्वेने ये-जा करतात. पण, दुपारी लोकल नसल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच दररोज कामानिमित्त मुंबईला जाणाऱ्या एक्स्प्रेसला जनरल डब्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे अनारक्षित तिकीटधारकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे पुणे-मुंबईदरम्यान धावणाऱ्या एक्स्प्रेसच्या डब्यांची संख्या वाढविण्याची मागणीही गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे.
रेल्वे समस्यांबाबत प्रवाशांकडून आणि विविध प्रवासी संघटनांकडून गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वे प्रशासनाला आणि मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना अनेक निवेदने दिली जात आहेत. पण, प्रवाशांच्या पदरी आश्‍वासनांपलिकडे काहीच पडत नाही. वर्षानुवर्षे त्याच त्याच मागण्यांसाठी रेल्वे प्रवाशांना रेल्वे मुख्यालयाचे आणि खासदारांचे उंबरे झिजवावे लागत आहे. अजून किती दिवस उंबरे झिजवायचे? असा संतप्त सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे.

प्रवाशांच्या मागण्या
गर्दीच्या वेळेस लोकल फेऱ्या वाढवा किंवा सेमी फास्ट लोकल सेवा सुरू करा
चिंचवड स्थानकांवर प्रगती एक्स्प्रेसला थांबा द्या
सह्याद्री एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलपर्यंत सुरु करा
प्रगती, सिंहगड एक्स्प्रेस आणि डेक्कन क्वीनला बोगी वाढवा
सिंहगड एक्स्प्रेसला मासिक पासधारक महिला प्रवाशांसाठी आरक्षित बोगी द्या
सिंहगड एक्स्प्रेसला तळेगाव रेल्वे स्थानकावर थांबा द्या


फक्त आश्वासनांची खैरात
पिंपरी चिंचवड शहरात दोन खासदार, विधानसभेचे तीन आणि विधानपरिषदेचे दोन आमदार आहेत. पण, प्रलंबित रेल्वे समस्यांबाबत कोणताही लोकप्रतिनिधी आवाज उठविताना दिसत नाहीत. निवडणुका आल्या की मतांसाठी आश्वासनांची खैरात करायची अन् निवडणुका झाल्या की विसरुन जायचे. असाच अनुभव कित्येक वर्षांपासून येत असल्याचे रेल्वे प्रवाशांनी सांगितले.

प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी रेल्वे प्रशासनाला वेळोवेळी निवेदने दिली आहेत. पण, प्रशासन या निवेदनांची कोणतीही दखल घेत नाही. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रवाशांच्या मागण्या प्रलंबित आहे. रेल्वे प्रशासनाने या मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा.
- इकबाल मुलानी, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com