महापालिका प्रभाग रचनेसाठी गोपनीय कारभार
पिंपरी, ता. २४ : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. यात पिंपरी-चिंचवड महापालिकेचाही समावेश आहे. त्यासाठी प्रभाग रचनेचे काम सुरू असून राजकीय हस्तक्षेप टाळण्यासाठी गोपनीयता पाळली जात आहे. मात्र, २०१७ च्या निवडणुकीसाठी केलेल्या प्रगणक गटानुसार (ब्लॉक) आणि त्यावेळी इतकेच अर्थात १२८ प्रभाग केले जाणार आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत २०१७ मध्ये निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांची मुदत १३ मार्च २०२२ रोजी संपली. कोरोना प्रतिबंधक नियम, राज्यातील राजकीय बदलत्या घडामोडी, इतर मागासवर्गीय (ओबीसी) आरक्षणाचा न्यायप्रविष्ट मुद्दा अशा कारणांमुळे वेळेत निवडणूक होऊ शकली नाही. त्यामुळे १४ मार्च २०२२ पासून आतापर्यंत अर्थात गेली साडेतीन वर्षे महापालिका प्रशासक म्हणून आयुक्तच कारभार पाहत आहेत. दरम्यानच्या काळात चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक झाली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्यात. आता महापालिका निवडणूक होऊ घातली असून सर्वच पक्षांतील इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. साधारणतः सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यासाठी चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार निवडणूक घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महापालिका निवडणूक विभागाने प्रभाग रचना सुरू केली आहे. सरकारच्या निर्णयानुसार २०१७ प्रमाणेच ३२ प्रभाग आणि १२८ सदस्यांसाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी केलेल्या ब्लॉकनुसारच प्रारुप प्रभाग रचना (कच्चा आराखडा) तयार केली जाणार आहे.
अशी आहे प्रक्रिया
- २०११ च्या जनगणनेची आकडेवारी व नकाशानुसार प्रगणक गट (ब्लॉक)
- महापालिकेसाठी ३२ प्रभाग तयार केले जाणार असून १२८ सदस्य असतील
- प्रारूप प्रभाग रचनेसाठी समिती नियुक्त असून त्यात महापालिका क्षेत्राची संपूर्ण माहिती असलेला व प्रभाग रचनेशी संबंध नसलेला अधिकारी, नगररचनाकार आणि संगणक तज्ज्ञांचा समावेश
- प्रारुप म्हणजे कच्चा प्रभाग आराखडा तयार करून त्यावर हरकती व सूचना मागवल्या जातील
- राजकीय हस्तेक्षप टाळण्यासाठी गोपनीयतेचे पालन
प्रभाग रचनेचे नियम
- प्रभाग रचना महापालिका क्षेत्राच्या उत्तरेकडून सुरू होईल, म्हणजे तळवडे किंवा चिखलीत पहिला प्रभाग असेल
- उत्तरेकडून पूर्वेकडे म्हणजे मोशी, डुडुळगाव, चऱ्होली
- पूर्वेकडून पश्चिमेकडे म्हणजे दिघी-बोपखेल, भोसरीकडून संभाजीनगर, घरकूल, निगडी, रावेत, किवळे, मामुर्डी
- पश्चिमेकडून दक्षिणेकडे सरकून शेवटी दक्षिणेस म्हणजे दापोडी, जुनी सांगवीत समारोप अर्थात शेवटचा प्रभाग असेल
- प्रभागाच्या सीमारेषा मोठे रस्ते, गल्ल्या, नद्या, नाले, पूल असतील
- एक इमारत, चाळ, घरे, वस्त्यांचे दोन प्रभागात विभाजन करता येणार नाही
राज्य सरकारच्या निर्णयानुसार आणि निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रभाग रचनेचे काम सुरू आहे. त्यासाठी तज्ज्ञ अधिकाऱ्यांची समिती नियुक्त केली आहे. निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार प्रभाग रचनेचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
- अविनाश शिंदे, सहायक आयुक्त, निवडणूक विभाग, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.