डेंगी मुक्तीसाठी ‘ब्रेक द चेन’ मोहीम

डेंगी मुक्तीसाठी ‘ब्रेक द चेन’ मोहीम

Published on

पिंपरी, ता. २४ : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंगी, मलेरिया आणि चिकूनगुनिया यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढतो.
तो रोखण्यासाठी महापालिकेतर्फे ‘ब्रेक द चेन’ ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून प्रतिबंधात्मक उपाय, जनजागृती, स्वच्छता आणि नागरिकांच्या सहभागातून डास निर्मूलन करण्यात येणार आहे.

राज्य शासनाच्या डेंग्यू प्रतिबंधात्मक धोरणानुसार ‘तपासा, स्वच्छ ठेवा आणि झाका’ ही त्रिसूत्री प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. याअंतर्गत प्रत्येक नागरिकाने आपल्या आजूबाजूच्या परिसरात साचलेले पाणी तपासणे, दर आठवड्याला टाक्या व पाणी साठवणाऱ्या भांड्यांची स्वच्छता करणे आणि पाणी साठवणारी भांडी झाकून ठेवणे आवश्यक आहे. ही उपाययोजना सर्वांनी केल्यास डेंगीच्या प्रसाराला प्रतिबंध करता येईल. याच अनुषंगाने महापालिकेने या मोहिमेला अधिक परिणामकारक बनवण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ मोहीम हाती घेतली आहे. नागरिकांनी डेंगीविरोधात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.


निरोगी आरोग्याची पंचसूत्री
डास उत्पत्तीची ठिकाणे शोधा व नष्ट करा, स्वतःचे डासांपासून संरक्षण करा, फॉगिंग व कीटकनाशक फवारणीस सहकार्य करा, ताप व इतर लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि पुरेसे पाणी प्या, शरीराचे द्रवपातळी संतुलित ठेवा, ही पाच सूत्रे लक्षात घेऊन शहरातील प्रत्येकाने उपाययोजना अमलात आणाव्यात, असे आवाहन पालिकेने केले आहे.

विविध ठिकाणी मोहीम
या मोहिमेंतर्गत सोमवार ते शनिवार दररोज विविध क्षेत्रांत कार्यवाही केली जाणार आहे. रुग्णालये, शाळा, बँका, मॉल्स, सिनेमागृहे, कार्यालये, उद्याने आणि सार्वजनिक ठिकाणांचा त्यामध्ये समावेश आहे. डासोत्पत्तीची ठिकाणे शोधून ती नष्ट केली जाणार आहेत.

आठ पथकांची नियुक्ती
जनजागृतीसाठी व्याख्याने, रॅली, पोस्टर स्पर्धा, पथनाट्य, सोशल मीडिया व्हिडिओ आणि एलईडी स्क्रिनद्वारे माहितीप्रसार या सर्व माध्यमांचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. सामाजिक संस्थांच्या मदतीने चर्चासत्र, परिसंवाद आणि जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. या मोहिमेची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होण्यासाठी नोडल वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक आरोग्य अधिकारी, कीटकनाशक निरीक्षक अशा अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या ८ विशेष पथकांची नियुक्ती केली आहे. ही पथके शहरभर डेंगीप्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी कार्यरत राहणार आहेत.

शहराच्या आरोग्यासाठी प्रशासन, वैद्यकीय विभाग, समाज आणि नागरिक एकत्रितपणे कार्यरत राहिले तर डेंगीसह सर्व कीटकजन्य व जलजन्य आजारांवर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. ‘ब्रेक द चेन’ ही मोहीम प्रत्येक पिंपरी-चिंचवडकराची जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येकाने यात सहभागी होणे प्रत्येकाची जबाबदारी आहे.
- डॉ. लक्ष्मण गोफणे, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com