एमआयडीसीतच भंगार प्रक्रिया केंद्र अपेक्षित

एमआयडीसीतच भंगार प्रक्रिया केंद्र अपेक्षित
Published on

पिंपरी, ता. २७ ः पिंपरी चिंचवड शहरातील औद्योगिक कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भंगार निर्माण होते. त्यावर प्रक्रिया करण्यासाठी अथवा स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्याबाबत महापालिकेच्या विकास आराखड्यात विशिष्‍ट अशी नियमावली करण्यात आलेली नाही. एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये असा घातक कचरा निर्माण होतो. त्यामुळे एमआयडीसीतच भंगार प्रक्रिया केंद्र असणे अपेक्षित आहे, अशी माहिती नगररचना विभागाचे उपायुक्त विकास घारे यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड शहर हे औद्योगिक शहर असून असंख्य लहान-मोठ्या कंपन्या कार्यरत आहेत. त्यामध्ये निर्माण होणाऱ्या भंगार आणि टाकाऊ वस्तूंवर चिखली, कुदळवाडी येथील भंगार गोदामांमध्ये प्रक्रिया केली जात होती. मात्र, महापालिकेच्यावतीने येथील भंगार व्यावसायिक व गोदामांवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे शहरातील कंपन्यांमध्ये निर्माण होणाऱ्या घातक कचऱ्याचा (भंगार) प्रश्न गंभीर बनला आहे. भंगार संकलित करुन त्यावर प्रक्रिया करणे हा सुद्धा एक व्यावसायिक कंपनीचाच भाग आहे. परंतु, अशी कंपनी सुरू करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विकास आराखड्यामध्ये कोणत्याही प्रकारची नियमावली तयार करण्यात आलेली नाही. त्यामुळे भंगार व्यावसायिकांनी त्यांचा उद्योग कुठे सुरू करायचे ? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भंगार व्यवसायाबाबत नियमावली व विशिष्‍ट क्षेत्र (झोन) तयार करुन न दिल्यास शहरातील इतर ठिकाणी अनधिकृत भंगार दुकाने सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

उद्योग, व्यवसाय मग तो कोणताही असो, त्यासाठी विशिष्‍ट अशी नियमावली असते. त्यानुसार सर्व आवश्यक परवानग्या घेऊनच उद्योग सुरू करणे अपेक्षित असते. परंतु, चिखली, कुदळवाडी येथील भंगार व्यावसायिकांनी महापालिकेच्या विविध विभागांच्या परवानगी घेतलेल्या नव्हत्या. असंख्य दुकाने महापालिकेच्या जागेत होती. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. उद्योग सुरू करण्यास आमचा विरोध नाही. त्यासाठी नियमानुसार परवानगी घेऊन उद्योजकांनी आपले उद्योग सुरू करावेत, अशी माहिती अतिक्रमण विभागाचे उपायुक्त मनोज लोणकर यांनी सांगितली.

भंगार मालाचे दुकान असो अथवा पत्राशेड आपण त्यास परवानगी देत नाही. त्यासाठी विशिष्‍ट प्रकारची नियमावली असण्याचे कारण नाही. माझ्या विभागाचा त्याच्याशी दुरान्वये ही संबंध येत नाही.
- प्रसाद गायकवाड, उपसंचालक, नगररचना विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com