पिंपरी वर्धापनदिन चिलेकर
पिंपरी वर्धापनदिन
--
राजकीय धडे शिकविणारी पाठशाळा
गाव ते पिंपरी चिंचवड महानगर होत असताना राजकारणाचा सारीपाटही बदलत गेला. तत्कालीन ग्रामपंचायत निवडणुकीत राजकारणाचे धडे घेतलेली व्यक्ती आज महानगर कसे चालवायचे, याचे खडे बोल शिकवत आहे. त्यांच्याच पाउलावर पाऊल ठेवत नवीन पिढी राजकारणाची बाराखडी गिरवत आहे.
- अविनाश चिलेकर, ज्येष्ठ पत्रकार
पुणे शहराच्या उत्तरेला मुळा नदीपलिकडे आणि इंद्रायणीच्या अलिकडे टुमदार खेड्यांचे मिळून बनलेले पिंपरी चिंचवड शहर. पवनेच्या पाण्यावर वाढलेले हे नगर. संत ज्ञानेश्वर माउलींच्या आळंदीचा आणि त तुकाराम महाराज यांच्या देहूचा वसा आणि वारसा सांगणारे मोठे गाव. गेल्या न्नास वर्षांतील गाव ते महानगर असा अखंड प्रवास. आज आकाशाला गवसणी घालणारे उंच- उंच टॉवर्स, दर पाच मिनिटांनी धावणारी मेट्रो, ‘बीआरटी’ आणि मॉल्स, मल्टिप्लेक्सने आधुनिकतेचा साज चढला आहे. कामगारनगरी, उद्योगनगरीनंतर ‘आयटी सिटी’ झालेले पिंपरी चिंचवड शहर आता देशातील नव्या संधींचे शहर म्हणून नावारुपाला आले आहे. नावाजलेल्या शैक्षणिक संस्थांचे मोठमोठे कॅम्पस आले. आज पूर्व-पश्चिम कुठेही पाहा प्रगतीचा वारू कसा चौखूर उधळतोय. या काळाच्या ओघात जमिनीला सोन्याचा भाव आला आणि पाण्यासारखा पैसा अंगणात खेळू लागला. ‘पैशांतून सत्ता आणि सत्तेतून पैसा’ हे सूत्र येथेही लागू झाले. तीस लाख खाणेसुमारीच्या शहरात भूमिपुत्रांची संख्या तशी मुठभर, पण राजकारणावरची पकड ढिगभर आहे. पूर्वी गावच्या चावडीवर जो काही रुबाब असे, तोच आज महापालिका भवनात आहे. गावकी-भावकीचे राजकारण काल होते, आज आहे आणि उद्याही राहील. गावाचे महानगर होताना सगळे-सगळे मुळासकट बदलले. पण, राजकारणाच्या रुप, रंग, छटा आहे तशाच राहिल्या. शहरात कोणत्याही राजकीय पक्षाची पाळेमुळे घट्ट करायची तर आजही गावकीचाच चेहरा मोहरा लागतो. दुसरा कोणीही असो तो फार काळ चालत नाही. पण, गाव ते महानगर होत असताना राजकारणाचा सारीपाटही बदलत गेला. तत्कालीन ग्रामपंचायत निवडणुकीत राजकारणाचे धडे घेतलेली व्यक्ती आज महानगर कसे चालवायचे, याचे खडे बोल शिकवत आहे. त्यांच्याच पाउलावर पाऊल ठेवत राजकारणातील नवीन पिढी राजकारणाची बाराखडी गिरवत आहे.
‘पिंपरी चिंचवडचे शिल्पकार’ अशी ओळख असलेले थोर नेते अण्णासाहेब मगर यांनी या शहराची मुहूर्तमेढ रोवली. त्यापूर्वी गावागावांतील पारावर गावकीच्या राजकारणाच्या गप्पा रंगायच्या. त्या ऐकता-ऐकता राजकारणात नवीन पिढी यायची. मोठे राजकीय नेते आल्यानंतर त्यांची भाषणे अशाच पारावर बसून ऐकली जायची. त्यांच्या शब्दांनुसार गावांचा ताल हलायचा. पुढे गावांचे शहर झाले, तरी राजकारण गावकी-भावकीच्या जोरावरच सुरूच होते. मग ती विधानसभा असो, की लोकसभा निवडणूक. त्यांच्या प्रचाराचा प्रारंभ गावांतील चावडीच्या ओट्यांवरून किंवा पारांवरून व्हायचा. मानाचे पान चघळले जायचे.
पुढे काळाची पावले झपाट्याने पडली. गावांचे शहर झालेल्या पिंपरी चिंचवडचे रुपांतर पुढे महानगरात झाले. औद्योगिकीकरण वाढले. त्यात काम करण्यासाठी राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून कामगारवर्ग आला. विविध सेवा क्षेत्रे सुरू झाल्याने व्यवयास-नोकरीनिमित्ताने येणाऱ्यांचा ओघ सुरूच राहिला. सर्व जाती-धर्मांतील व्यक्ती, विविध प्रांतांतील व्यक्तींचा त्यात समावेश होता. त्यामुळे शहराची ओळख ‘मिनी इंडिया’ झाली. गावगाडा हाकलेली पिढी मागे पडली होती. शहराच्या राजकारणात आलेली नवीन पिढी आता महानगराच्या राजकारणात मार्गदर्शन करत आहेत. त्यांच्याच पाऊलांवर पाऊल ठेवून नव्हे, तर त्यांच्यापेक्षा एक काकण पुढे होऊन नवीन पिढी राजकीय परिस्थिती हाताळत आहे. बस्तान बसविण्यासाठी नगरसेवक, महापौर, विविध समित्यांचे चेअरमन, पक्षांचे पदाधिकारी होऊन शहरी राजकारण हाताळत आहेत. त्यांना नोकरी- व्यवसायानिमित्त शहरात आलेल्यांची साथ मिळाली आहे. गावकीत फूट पडली म्हणून शिवसेनेचे दिवंगत नेते गजानन बाबर हे दोनवेळा आमदार झाले. मावळ लोकसभेच्या पहिल्याच निवडणुकीत धार्मिक मुद्द्यांवर प्रचार झाला आणि उभी गावकी-भावकी वज्रमूठ करून बाबर यांच्या मागे ठामपणे उभी राहिली, म्हणून ते मोठ्या मताधिक्याने खासदार झाले.
अण्णासाहेब मगर, शरद पवार अशा नेत्यांना पाहिलेल्या गावांमध्ये शिवसेना शाखेच्या उद्घाटनाला काळभोरनगरमध्ये खुद्द बाळासाहेब ठाकरे आले होते. गावकी-भावकी आणि गाववाला-बाहेरचा असा अनुभव घेत, इथली नवीन पिढीही प्रगल्भ होत गेली. पुरुषांपाठोपाठ महिलांनाही संधी मिळाली. भोसरी गावचे सरपंच राहिलेले ज्ञानेश्वर लांडगे शहराचे प्रथम महापौर झाले. पुढे जुन्या हवेली विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणूनही ते जिंकले. पिंपरी गावचे सरपंच दिवंगत भिकू वाघेरे पाटील हे महापौर झाले. आता तर महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्के आरक्षण असल्याने महापालिकेतही महिलांचाच आव्वाज असतो. तो आगामी काळातही दिसणार आहे.
--
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

