पिंपरी वर्धापन दिन नदी महात्त्म्य
वर्धापन दिन
--
नदी माझे जीवन,
नदी माझी समृद्धी
नदी आणि पर्यावरण संवर्धनासाठी गेल्या ‘जलदिंडी’च्या माध्यमातून मागील १७ वर्षांपासून मी प्रयत्नशील आहे. पवना धरणातून येणारा प्रवाह वेगवेगळ्या गावांतून शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी येतो. पण, साधारणपणे शिवणे गावापासून या नदीत प्रदूषण सुरू होते असे दिसते. ते टाळण्यासाठी प्रक्रिया करूनच सांडपाणी नदीत सोडले पाहिजे. त्यासाठी पर्यावरण व नद्यांच्या संरक्षणासाठी व्यक्तिगत पातळीवर सर्वांनी कटीबद्ध व्हावे लागेल.
- राजीव भावसार, विश्वस्त, जलदिंडी प्रतिष्ठान
--------
‘‘भलतेणेंसीही मेळु ।
पाणिया ऐसा ढाळु।।’’
ही संत ज्ञानदेवांची जलनीती. या माध्यमातून त्यांनी जलनीतीतला महत्त्वाचा सिद्धांत सांगितला आहे. याचा अर्थ पाणी सर्वांबरोबर जमवून घेते. पाणी संवेदनशील असून ते कोणाचेही वाईट करत नाही. पाण्याला कोठेही ठेवले, तरी ते त्यांत सामावून जाते. पाणी अथवा नदीतला पाण्याचा प्रवाह कसाही वेडावाकडा खडकातून वाहत जाताना ते सरळ जाते. ही सरळता सक्रिय असते. मानवाने पाणी प्राशन केल्यांनतर अथवा वृक्षाच्या मुळाशी गेल्यांनतर ते जिरून जाते. त्यामध्ये सामावून जाते. पाण्याची ही समरसता जगण्याचा महान अर्थ सांगून जाते. चंद्राची शीतलता-गारवा तसे सूर्याची तेजस्विता. दोन्ही आरोग्यास उपायकारक असून यांना एका ठिकाणी आणण्याचे काम पाणी करते. शीतल पाण्याने तहान भागते, तसेच गरम पाण्याने घसा बरा होतो. पाण्याचा महत्त्वाचा स्रोत नदी आहे. या नद्या मानवासाठी आणि परिसंस्थेसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. पिण्याचे पाणी, शेती सिंचन, वाहतूक, औद्योगिक आणि जलविद्युत निर्मितीसाठी नद्या मुख्य स्रोत आहेत. आपल्या संस्कृतीत ‘लोकजनन्य: नद्यः’ असे संस्कॄत वाक्य आहे. म्हणजे नदीचा गौरव करून तिला लोकमाता म्हटले आहे.
जीवनदायिनी पवनामाई
आपल्या पिंपरी चिंचवड शहराची जीवनदायिनी म्हणजे आपली पवनामाई. जी ३५ लाखांपेक्षा जास्त नागरिकांची तहान, त्यांचे उद्योगविश्व, शेती व इतर सर्व गरजा अविरत भागवत आहे. ही नदी फार वर्षांपूर्वी तरुण, सुंदर, खळाळती आणि प्रवाही तसेच चहूबाजूंनी वृक्षराजींनी नटलेली, हिरव्या शालूत सजलेली होती. सह्याद्रीच्या उदरामध्ये जन्म घेतलेली ही पवनामाई. पश्चिम घाटामध्ये तिचा संचार मुक्त आणि प्रवाही होता. आताही उगमापाशी अशीच सुंदर आहे व तिच्या काठावर कितीतरी सूक्ष्म जीव आणि वनस्पतींची वाढ होते. आपले पूर्वज तर पवनामाईच्या कुशित पोहायला शिकले. त्यांनी पवनामाईचे सुंदर असे रूप अनुभवले होते. असा युगायुगांचा समृद्ध प्रवास पवना नदीचा राहिला आहे. पण, आज चित्र नेमके उलटे दिसते. तिचे प्रदूषण वाढले आहे. तिची शुद्धता, स्वच्छता व निर्मळता कायम राहावी, यासाठी काठावरील प्रत्येकाने सतर्क तर काठाबाहेरील सर्वांनी जागरूक असणे आवश्यक आहे. पाणी हे जीवन आहे. शुद्ध पाणी जीवन निरोगी व सुदॄढ ठेऊ शकते. तर अशुद्ध व दूषित पाणी जीवन बिघडवू शकते. हे फक्त आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे. म्हणून प्रत्येकाने हातात हात घालून या पर्यावरण रक्षणाच्या महत्त्वपूर्ण कामात स्वयंस्फूर्तीने सहभागी होणे, कार्यरत असणे आवश्यक आहे.
‘जलदिंडी’तून जागृती
गेल्या १७ वर्षांपासून जनजागृती करण्यासाठी जलदिंडीच्या माध्यमातून प्रयत्नशील आहे. प्रत्येक वर्षी पवना नदीच्या उगमापासून ते चिंचवड गावापर्यंत नदीतून प्रवास करून ग्रामस्थ, शहरवासी तसेच शाळा व महाविद्यालयांमध्ये नदीची ओळख करून देत तिच्या समस्यांचा परिचय करून देतात आणि प्रदूषण कसे कमी करता येईल या संदर्भात जनजागृती करतात. पवना नदीची लांबी सुमारे ६२ ते ६५ किलोमीटर आहे. पवना धरणातून प्रवाह वेगवेगळ्या गावातून होऊन शहरात रावेत येथे जलशुद्धीकरण केंद्राद्वारे शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी येतो, पण साधारणपणे शिवणे गावापासून प्रदूषण सुरू होते असे दिसते. ते टाळण्यासाठी प्रक्रिया करूनच सांडपाणी नदीत सोडले पाहिजे. शहरातील सांडपाणी प्रक्रिया प्रभावीपणे चालविली पाहिजे. पाणी हे जीवन आहे; शुद्ध पाणी जीवन निरोगी व सुदृढ ठेवू शकते तर अशुद्ध व दूषित पाणी जीवन बिघडवू शकते. हे फक्त आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे. त्यामुळे पर्यावरण व नद्यांच्या संरक्षणासाठी व्यक्तिगत पातळीवर सर्वांनी कटीबद्ध व्हावे लागेल.
आपण हे करू शकतो
- नदी प्रदूषण कमी करण्यासाठी प्रत्येक स्तरावर काम करणे शक्य आहे. अगदी नदीवर न जाता सुद्धा आपण प्रदूषण कमी करू शकतो. शेतकरी असाल तर शेतीसाठी भयंकर रसायने, कीटकनाशके टाळा आणि सेंद्रिय खतांचा वापर करा.
- उद्योजक असाल, तर कारखान्यात तयार होणारे सांडपाणी तसेच इतर घटक थेट नद्यांमध्ये मिसळू नका; ते योग्य प्रकारे शुद्ध करूनच सोडा.
- सामान्य नागरिक असाल, तर घरातील रसायनं, साबण, शॅम्पू, क्लिनिंग लिक्विड यांचा वापर कमी करा आणि सांडपाण्याचा योग्य निचरा करा.
- प्लॅस्टिक वापरणे टाळा. गळणारे नळ दुरुस्त करा; अंघोळीसाठी शॉवरऐवजी बादलीचा वापर करा; झाडांना गरजेनुसार पाणी द्या
- भांडी धुताना, ब्रश करताना इतर काम करताना पाण्याचा नळ बंद ठेवा. असे केल्याने एकूण पाण्याचा अवाजवी वापर टळतो.
- नदीच्या काठावर नैसर्गिकरित्या पाणी शुद्ध करणारी झाडे लावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

