खासगी बस मालकांची ‘लॉबी’ मोकाट
पिंपरी, ता. १ : कामगारांची वाहतूक करणारे काही बसचालक मद्यपान करून, तर काही मोबाइलमध्ये रील्स बघत, इअरफोनद्वारे फोनवर बोलत बस चालवतात. मात्र, अशा बेशिस्तांकडे वाहतूक पोलिस आणि प्रादेशिक परिवहन विभागाचे (आरटीओ) ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष होत आले आहे. याची उदाहरणे यापूर्वी अनेक घटनांतून समोर आली आहेत. तर, या बस मालकांची मोठी ‘लॉबी’ सक्रीय आहे. तर, त्यांच्याकडे काम करणारे चालकही बेशिस्त आहेत.
पिंपरी चिंचवड शहर परिसराचा विस्तार झपाट्याने होत आहे. यात तळेगाव, चाकण, भोसरी एमआयडीसी आणि तळवडे या औद्योगिक क्षेत्रांसह हिंजवडी आयटी पार्क विकसित झाले आहे. एमआयडीसी परिसरात आठ हजारांहून अधिक प्लॉटधारक आहेत. यात पाच हजारांहून अधिक लघुउद्योग आणि वाहन क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत. यात काम करणाऱ्या लाखो कामगारांचा प्रवास सुखकर होण्यासाठी अनेक कंपन्यांनी घर ते कंपनी ये-जा करण्यासाठी खासगी बसची व्यवस्था केली आहे. पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागात अशा एक हजार ३२७ मॅक्सी कॅब आणि १७ हजार ५८३ बसची नोंद आहे. शहरात बस व्यतिरिक्त ३२ सीटर बसमधून कामगार वाहतूक होते. एका-एका मालकाच्या पाचशे ते हजार बस आहेत. त्यामुळे त्यांची ‘लॉबी’ तयार झाली असून, प्रसंगी त्यांना ‘वरदहस्त’ही मिळत आला आहे.
बसचालक-मालकांची दादागिरी
भोसरी, मोशी, चिखली, निगडी, तळवडे, भुमकर चौक, डांगे चौक या पीकअप पॉइंट असून या ठिकाणांवरून कामगारांना ने-आण केली जाते. हे चालक रस्त्यामध्येच बस उभी करून कामगारांची चढ-उतार करतात. या प्रकारामुळे नेहमीच वाहतूक कोंडी होते. तर, काही चालक बेदारकपणे बस चालवतात. रील्स किंवा चित्रपट पाहत बस चालवणाऱ्याला जाब विचारल्यास ते दादागिरी करतात. वाहतुकीचे सर्व नियम ही मंडळी पायदळी तुडवतात. अशा चालकांवर कोणतीही कारवाई होत नाही. किरकोळ अपघातानंतर अनेक वेळा बसमालक स्थानिक पोलिसांबरोबर ‘तडजोड’ करून प्रकरण ‘मिटवत’ असल्याचा आरोप होतो. यामुळे खासगी बसचालक ‘लॉबी’वर कोणाचेही नियंत्रण नसल्याची स्थिती आहे.
अनेक बसची मुंबईसह परराज्यांत नोंदणी
मुंबई शहरात आठ वर्षांवरील जुन्या वाहनांना बंदी आहे. त्यामुळे बहुतांश वाहने अन्य शहरांत चालवली जातात. पिंपरी चिंचवड आणि पुण्यात कामगार वाहून नेणाऱ्या अनेक बस मुंबई किंवा इतर जिल्ह्यांतील नोंदणीकृत आहेत. तसेच ईशान्यकडील राज्यांत नोंदणी असलेल्या बस मोठ्या प्रमाणात धावत आहेत. यातील बहुतांश बसची वैधता संपलेली आहे किंवा त्यांना आपत्कालीन दरवाजा नाही. तरीही, अशा बस रस्त्यांवर धावत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

