कुष्ठरोग तपासणी मोहिमेत ११ कुष्ठरोगींचे निदान
पिंपरी, ता. ४ ः पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या कुष्ठरोग शोध मोहिमेत ११ कुष्ठरोगींचे निदान झाले आहे. १७ ते २ डिसेंबर या कालावधीत झालेल्या या मोहिमेचा उद्देश शहरातील नागरिकांमध्ये कुष्ठरोगाविषयी जनजागृती करणे, रुग्णांचे निदान करणे व वेळेवर उपचार उपलब्ध करून देणे हा होता.
या मोहिमेसाठी वैद्यकीय विभागाच्या वतीने २१२ जणांचे पथक तैनात करण्यात आले होते, ज्यात तज्ज्ञ डॉक्टर, प्रशिक्षित आशा स्वयंसेविका तसेच पुरुष स्वयंसेवकांचा समावेश होता. सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली ढोणे यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाने ७९ हजार १७७ घरांना भेटी दिल्या. सुमारे तीन लाख ६१ हजार ८५४ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. सर्वेक्षणादरम्यान ११ रुग्णांना कुष्ठरोग असल्याचे निदान झाले. संशयित रुग्णांना तत्काळ प्राथमिक औषधोपचार देण्यात आले व पुढील मार्गदर्शन करण्यात आले.
या मोहिमेमुळे शहरात कुष्ठरोगाविषयी जनजागृती वाढली. लक्षणे असलेल्या अनेक नागरिकांनी तपासणी केली. समुपदेशन, उपचार, मार्गदर्शन आणि फॉलोअप यावरही विशेष भर देण्यात आला. शहराच्या आरोग्य रक्षणासाठी महापालिका प्रयत्नशील असून, अशा उपक्रमांना नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
कुष्ठरोग नियंत्रणासाठी लवकर निदान व तत्काळ उपचार हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. महापालिकेच्या वैद्यकीय पथकांनी या मोहिमेदरम्यान ज्या शिस्तबद्ध पद्धतीने सर्वेक्षण करून नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोचविल्या. महापालिका नागरिकांच्या आरोग्यविषयक गरजा ओळखून अशा उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप देत राहील.
- विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
कुष्ठरोगाची लक्षणे अनेकदा लहान वाटतात. पण, त्याकडे दुर्लक्ष केल्यास आजार वाढू शकतो. त्यामुळे वैद्यकीय पथकांनी प्रत्यक्ष जाऊन केलेले सर्वेक्षण अत्यंत निर्णायक ठरले. तपासणी, उपचार व समुपदेशन या माध्यमातून आपण शहराला कुष्ठरोगमुक्त करण्याच्या दिशेने ठोस पाऊल टाकत आहोत.
- डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

