

आशा साळवी
सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ९ ः महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एकत्र येण्याच्या हालचालींचा वेग वाढत आहे. दुसरीकडे काँग्रेस पक्षाची राजकीय परिस्थिती सुधारण्याची चिन्हे मात्र दिसेनाशी झाली आहेत. स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षाला मरगळ आली आहे. रणनीतीचा अभाव, नेतृत्वाची उदासीनता आणि स्थानिक पातळीवरील गटतटामुळे काँग्रेसला शहरात अस्तित्वाची लढाई लढावी लागणार आहे. तरच पक्षाला मतदारांचा ‘हात’ मिळेल.
एकेकाळी सत्ताधारी असलेल्या काँग्रेसची शहरातील राजकीय स्थिती आणखी चिंताजनक बनली आहे. इतर पक्षांनी निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली असताना काँग्रेसला अद्याप उर्जितावस्था आलेली नाही. निवडणुकीची चाहूल लागूनही कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह दिसत नाही. शहराध्यक्ष पातळीवरून विभागनिहाय कामाची आखणी, बूथ कमिटीची रचना, प्रचार धोरणाबाबतचे मार्गदर्शन अशा सर्व बाबतीत पक्ष पूर्णपणे निष्क्रिय दिसत आहे. परिणामी पारंपरिक मतदारांमध्येही नाराजी वाढत आहे.
राज्यात सत्ता असलेल्या महायुतीच्या पक्षांकडे इच्छुकांचा ओढा वाढला आहे. इच्छुकांनी काँग्रेसकडे पाठ फिरवणे हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. इच्छुकांना आकर्षित करण्यासाठी शहर पातळीवर काही हालचाली दिसत नाहीत. काँग्रेसची स्थिती सुधारण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी आणि एकजूट दाखवण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.
मागील निवडणुकीत पक्षाशी निष्ठा ठेवणारे काही दमदार स्थानिक चेहरेही गेल्या काही महिन्यांत इतर पक्षांकडे वळाले. काहींनी तर पक्ष नेतृत्वातील अनास्था, स्थानिक पदाधिकाऱ्यांचे गटकारभार, तक्रारींवर होणारी उडवाउडवी आणि मार्गदर्शनाचा अभाव यांचा स्पष्ट शब्दांत उल्लेख करत काँग्रेसपासून फारकत घेत ‘हात’ सोडला आहे. इच्छुकांशी कोणताही संपर्क किंवा संवाद न झाल्याने काँग्रेसला उमेदवार मिळण्याची अपेक्षा कमी होत आहे. या सर्व परिस्थितीमुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वावरील नाराजी अधिक प्रकर्षाने व्यक्त होत आहे. पक्षाला पुनरुज्जीवित करण्यासाठी शहर पातळीवर कोणतेही ठोस उपक्रम हाती घेतले गेले नाहीत. वरिष्ठ नेते केवळ बैठका आणि आश्वासनांपुरते मर्यादित राहिल्याने तळागाळातील कार्यकर्ते दुभंगलेले आहेत. अनेकांना आपापल्या विभागात कामाची दिशा देण्यास कोणी जबाबदार नेता नसल्याची भावना निर्माण झाली आहे. परिणामी ‘हात’ दिवसेंदिवस दुर्बल होत आहे.
काँग्रेसची मनसेशी आघाडी ?
महाविकास आघाडीतून लढण्याबाबत कॉंग्रेसचे स्थानिक नेते सुरुवातीपासून अनुकूल आहेत. आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काँग्रेस सर्व जागांवर एकत्र लढण्याची चर्चा आहे. काँग्रेसचे काही नेते मनसेला सोबत घेण्यास उत्सुक आहेत, तर काही नेते विरोध करत आहेत. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळातसाहेब ठाकरे, मनसे आणि काँग्रेस अशी ‘आघाडी’ भाजपा आणि राष्ट्रवादीशी दोन हात करणार का, असा प्रश्न आहे. दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. काँग्रेसच्या प्रदेश नेत्यांकडून दोन्ही ठाकरेंसह एकत्र निवडणूक लढवण्याबाबत मतभिन्नता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडी सोडून राष्ट्रवादी काँग्रेससोबत लढल्यास उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना एकाकी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाकरे बंधू आणि काँग्रेस अशी ‘आघाडी’ करण्याबाबत प्रदेश पातळीवरील हालचालींना वेग आला आहे. त्या निर्णयावरच वरच शहरातील निर्णय ठरणार आहे.
---
महापालिकेच्या आगामी निवडणुकीमध्ये महाआघाडी करण्याचा विचार सुरू आहे. निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू आहे. याबाबत मित्र पक्षांच्या आणि काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.
- पृथ्वीराज साठे, राष्ट्रीय सचिव, अखिल भारतीय काँग्रेस समिती
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.