भाजप, राष्ट्रवादीतील इच्छुकांचा मार्ग मोकळा
पिंपरी, ता. १६ ः पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक लढविण्यासाठी सर्वाधिक इच्छुक भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आहेत. दोन्ही पक्षांनी महायुती म्हणून निवडणूक एकत्र लढविल्यास आपल्याला तिकीट मिळणार नाही, अशी भावना बहुतांश इच्छुकांची होती. मात्र, आता दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा नारा दिल्याने दोन्ही पक्षांकडील इच्छुकांनी काही अंशी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. मात्र, पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी अद्याप ‘तिकिटा’चे पत्ते खुले न केल्याने काही प्रभागांतील इच्छुकांमध्ये अद्यापही उमेदवारी मिळण्याबाबत धाकधूक कायम आहे.
महापालिका निवडणूक भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष स्वतंत्रपणे लढणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (ता. १६) पुण्यात जाहीर केले. त्यास दुजोरा देत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही निवडणूक स्वतंत्रपणे लढणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे इच्छुकांच्या मनात सुरू असलेली घालमेल काही प्रमाणात थंडावली आहे. बहुतांश प्रभागातील लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एकत्र लढण्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे भाजप व राष्ट्रवादी यांच्यात मैत्रिपूर्ण लढत होणार की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढतील? याबाबत तर्क-वितर्क लढविला जात आहे. असे झाल्यास महाविकास आघाडी राहणार की तुटणार? याकडेही लक्ष लागून आहे. मात्र, एकत्र लढायचे की स्वतंत्र? निर्णय काहीही झाला तरी, निवडणूक लढविणे सोईचे होणार, हे भाजप व राष्ट्रवादीतील बहुतांश प्रभागांतील इच्छुकांचे मनसुबे पक्के झाले आहेत.
भाजप-राष्ट्रवादीचे राजकारण
- भाजप व राष्ट्रवादी यांच्यात मैत्रिपूर्ण लढत होणार असल्यामुळे आणि राज्यात व केंद्रात दोन्ही पक्ष सत्तेत असल्यामुळे कोणीही जिंकले तरी महापालिका सत्ताधाऱ्यांच्याच हातात जाणार, हे मात्र नक्की दिसते आहे.
- २०१७ च्या निवडणुकीत भाजपला ७७ व राष्ट्रवादीला ३६ जागांवर विजय मिळाला होता. पाच अपक्षही सुरुवातीस भाजप समर्थक होते. नंतरच्या काळात दोघांसह भाजपतील काहींनी राष्ट्रवादीची वाट धरली आणि भाजप नेतृत्वावर, महापालिकेतील कारभारावर सडकून टीका केली होती.
- राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी भाजपची साथ दिली, त्यानंतर भाजपमधून राष्ट्रवादीत आलेल्यांसमोर पेच निर्माण झाला होता. अखेर सर्वांना मूग गिळून गप्प बसावे लागले होते.
मैत्रिपूर्ण लढतीचे चित्र...
- भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेस स्वतंत्र लढत असल्याने राज्यस्तरीय निर्णय प्रक्रियेत आनंदोत्सव साजरा करणारे महापालिका निवडणुकीत आमने-सामने असतील
- दोन्ही पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या अधिक असल्याने तिकीट मिळविण्यासाठीच्या स्पर्धेची तीव्रता कमी होऊन ‘जिंकेल तो सत्तेत’ अशी स्थिती असेल
- अधिक इच्छुक असलेल्या प्रभागातील ‘जागा’ वाटपासाठी ‘खेळी’ खेळली जाऊन विजेता होण्याची ‘ताकद’ असलेल्यास संबंधित पक्षाकडून पाठबळ मिळेल
- निवडणुकीत विजयी झाल्यानंतर भाजप-राष्ट्रवादीने संयुक्तपणे सत्ता स्थापन केल्यास विरोधी पक्षनेताही सत्ताधारी गटातील पक्षाचा असू शकेल
महाविकास आघाडीबाबत अनुत्तरीत प्रश्न
- दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास महाविकास आघाडी कायम राहणार का?
- महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, कॉंग्रेस यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सोबत येणे चालेल का?
- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आल्यास महाविकास आघाडी राहणार का?
- दोन्ही राष्ट्रवादींसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, कॉंग्रेस, मनसे यांच्यात जागा वाटपाचे गणित कसे असेल?
--
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

