सोळावं वरीस धोक्याचं

सोळावं वरीस धोक्याचं

Published on

पिंपरी, ता. १६ : सोळा वर्षीय मुलाने जुन्या भांडणातून त्याच्याच वर्गात शिकणाऱ्या सोळा वर्षीय मुलाचा धारदार हत्याराने वार करून खून केला. राजगुरुनगरमध्ये सोमवारी (ता. १५)
घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर अल्पवयीन मुलांकडून गुन्हेगारी कृत्यांचे वाढता प्रकार चिंतेचा विषय असल्याचा मुद्दा अधोरेखित झाला.
किरकोळ वादातून सुरू होणाऱ्या भांडणाचे काही क्षणांत प्राणघातक हल्ल्यात पर्यवसन होते. काही प्रकरणांमध्ये थेट जीव घेण्यापर्यंत मजल जाते. अल्पवयीन मुलांच्या हातात धारदार शस्त्रे, कोयते, चाकू, लोखंडी सळया आढळणे ही बाब समाजाच्या भविष्यासाठी अत्यंत धोकादायक आहेच. वेगवेगळ्या कारणांमुळे किशोरवयीन मुलांमध्ये गुन्हेगारीचे आकर्षण वाढत आहे. गुन्हा करून प्रसिद्धी मिळवण्याची मानसिकता तयार होत आहे. काहीजण हल्ल्याचे व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाकतात. एखाद्या भाईची पाहिलेली स्टाइल काही अल्पवयीन मुलांना प्रभावित करते. यातून ते चुकीच्या मार्गाला लागत असल्याचे दिसून येते.
यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. वेळीच ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर भविष्यात याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. त्यामुळे प्रतिबंध, संवेदनशील हाताळणी आणि सामूहिक प्रयत्न गरजेचे आहे.

वादाची कारणे क्षुल्लक
- मोबाईलवरील स्टेटस
- सोशल मीडियावरील कमेंट
- किरकोळ वाद
- प्रेमप्रकरण
- वर्चस्वाची स्पर्धा
----------
चुकीच्या प्रभावाचा परिणाम
- सोशल मीडियावरील रील्स
- वेब सिरीज
- चित्रपटांतून दाखवली जाणारी गुन्हेगारी जीवनशैली
- ‘भाई’ संस्कृती
- व्हायरल होण्याची हाव
------------------------------------------------
असे प्रकार का घडतात?
- किशोरवयातील भावनिक अस्थिरता व अपरिपक्वता
- राग, अपमान, नकार सहन करण्याची कमी क्षमता
- पालक-मुलांमधील संवादाचा अभाव
- सोशल मीडिया
- वेबसीरिजमधील हिंसेचे उदात्तीकरण
- चुकीची संगत व टोळीचे फॅड
- अभ्यासातील अपयश
- प्रेमभंग
- न्यूनगंड
- मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष
- समुपदेशनाचा अभाव
----------------------------------------------------------

होणारे परिणाम

- गुन्हेगारीचा कायमस्वरूपी डाग
- शिक्षण व करिअरचे मोठे नुकसान
- कुटुंबावर मानसिक, सामाजिक व आर्थिक ताण
- समाजात भीती व असुरक्षिततेची भावना
- एका चुकीमुळे अनेक आयुष्ये उद्ध्वस्त
-----------------------------------------------

हे टाळण्यासाठी काय करायला हवे
- पालकांनी दररोज मुलांशी मनमोकळा संवाद साधावा
- शिक्षा नव्हे, समजावण्यावर भर द्यावा
- मोबाईलपेक्षा मुलाला वेळ द्यावा
- शाळा व महाविद्यालयात नियमित समुपदेशन सत्रे राबवावीत
- शिक्षक-पालक संवाद वाढवावा
- अल्पवयीन मुलांसाठी हेल्पलाइन हवी
------------------------------------------

अल्पवयीन मुले गुन्ह्यातील वाढत्या संख्येन सामील होणे हा केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न नाही. सामाजिक, कौटुंबिक आणि मानसिक आरोग्याच्या पातळीवर हा गंभीर चिंतेचा विषय बनला आहे. हे रोखण्यासाठी मुलांशी योग्य वेळी संवाद, समुपदेशन आणि मार्गदर्शन आवश्यक आहे. या बाबी योग्य वेळी झाल्यास मुले जबाबदार नागरिक घडू शकतात.
- वंदना मांढरे, समुपदेशिका
-------------------------------------------
आरोपी अल्पवयीन असले तरी गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांत कायद्यानुसार कडक कारवाई होत आहे. पोलिसांकडून शाळा-महाविद्यालय परिसरात गस्त, समुपदेशन शिबिरे, पालक-विद्यार्थी संवाद तसेच गुन्हेगारी प्रवृत्ती रोखण्यासाठी विशेष मोहिमा राबविल्या जात आहेत. ‘एक दिवस शाळेसाठी’ या उपक्रमात शाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. यासह गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता असलेल्या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष बाल पथकामार्फत ‘दिशा’ उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमामुळे अनेक मुले सन्मार्गाला लागली आहेत.
- डॉ. विशाल हिरे, सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड

--------------------------------------

या महिन्यातील शहरातील काही प्रकार
६ डिसेंबर ः चिंचवडमधील गावडेनगरमध्ये अल्पवयीन मुलाकडून एक पिस्तूल जप्त
९ डिसेंबर ः पिंपरीतील नेहरूनगरमध्ये चार अल्पवयीन मुलांकडून एका तरुणाला बेदम मारहाण
१० डिसेंबर ः पिंपरी पुलाजवळ अल्पवयीन मुलाकडून दोन पिस्तुले जप्त
१० डिसेंबर ः मावळातील वराळे येथे किरकोळ भांडणावरून तीन अल्पवयीन मुलांकडून एका अल्पवयीन मुलावर कोयत्याने प्राणघातक हल्ला
-----------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com