मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १३ लाखांची फसवणूक
गुंतवणुकीच्या नावाखाली १३ लाखांची फसवणूक
पिंपरी ः ‘क्रिप्टो करन्सी’त गुंतवणुकीवर ३०० टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवत मारुंजीत एका व्यक्तीची १३ लाख ४१ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली.
या प्रकरणी रोहन देशमुख (बँक खातेदार व यूपीआय धारक) असे आरोपीचे नाव असून, त्याच्या विरोधात अक्षय बापुजी वाघ (वय ३६, रा. पार्क कनेक्ट सोसायटी, मारुंजी) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
देशमुख याने ‘क्रिप्टो करन्सीत’ गुंतवणूक केल्यास जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवले. यानंतर आरोपीने वेगवेगळ्या बँक खात्यांचे क्रमांक व यूपीआय आयडी पाठवून त्यावर पैसे भरण्यास सांगितले. वाघ यांनी देशमुख याच्याकडे रकमेच्या परतीबाबत विचारणा असता आणखी सात लाख रुपये भरावे लागतील, अशी मागणी केली. तक्रारदार वाघ यांनी अधिक रक्कम देण्यास नकार दिल्याने त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
अमली पदार्थ विक्री दुकानावर छापा
पिंपरी ः प्रतिबंधित ई-सिगारेट, सिगारेट तसेच तंबाखूजन्य हुक्का फ्लेवर विक्रीसाठी साठवून ठेवणाऱ्या संत तुकारामनगर येथील लाइव्ह इमारेट्स या दुकानावर पोलिसांनी कारवाई केली.
अहमद यासीन हमीद शेख (वय ३५, रा. संत तुकारामनगर, पिंपरी) असे दुकान चालकाचे नाव असून, अमली पदार्थ विरोधी पथकाने गुन्ह्याची नोंद केली आहे. संबंधित दुकानात प्रतिबंधित अमली पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार अमली पदार्थ विरोधी पथकाने या दुकानावर छापा टाकून धूम्रपानासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले.
आळंदीत तडीपार गुंडावर कारवाई
पिंपरी : आळंदी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका तडीपार गुन्हेगारावर कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. संबंधित गुन्हेगाराला पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या परिमंडळ क्रमांक तीन मधून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले असताना तो परिसरात फिरताना आढळला.
केतन प्रकाश शिंदे (वय २२, आळंदी, ता. खेड) असे गुन्हेगाराचे नाव आहे. आळंदी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता ३०० रुपये किमतीचा कोयता जप्त करण्यात आला.

