एमईडीसी एमएसएमई कॅपॅसिटी बिल्डिंग समिट उत्साहात
पिंपरी, ता. १८ : महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिल (एमईडीसी) यांच्या वतीने आयोजित एमईडीसी एमएसएमई कॅपॅसिटी बिल्डिंग समिट २०२५-२६ ही परिषद हिंजवडी येथे बुधवारी (ता. १७) पार पडली.
माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), आरोग्यसेवा आणि जीसीसी क्षेत्रातील देश-विदेशातील तज्ज्ञ, उद्योग नेते व धोरणकर्त्यांच्या उपस्थितीमुळे ही परिषद विशेष ठरली. हिंजवडीतील ही परिषद नवोन्मेष, सहकार्य आणि ज्ञानविनिमयाला चालना देणारी ठरेल, असा विश्वास एमईडीसीचे अध्यक्ष अतुल शिरोडकर यांनी यावेळी व्यक्त केला.
सकाळी उद्घाटन सत्रात एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारसु, नॅसकॉम पश्चिम विभागाचे अध्यक्ष डी. पी. नांबियार, एमईडीसीचे उपाध्यक्ष सचिन ईटकर, प्रादेशिक संचालक प्रदीप कोपर्डेकर, राज्य सरकारचे गुंतवणूक आयुक्त सुशील गायकवाड आदी उपस्थित होते.
एमएसएमई क्षेत्रातील एआयद्वारे निर्माण होणाऱ्या संधी या विषयावर मुख्य भाषण झाले. त्यानंतर एआय फॉर एमएसएमईज व जागतिक विस्तार, जीसीसी-एआय-फिनटेक व हेल्थकेअरमधील संधी, आरोग्यसेवेत एआयचा वापर आणि क्षमता बांधणी अशा सत्राचे आयोजन करण्यात आले. समारोप सत्रात राजेश मुथा व डॉ. गिरीश देसाई उपस्थित होते. हाय टी व नेटवर्किंगने परिषदेची सांगता झाली.

