

महाविकास आघाडी
अद्याप एकीपासून ‘वंचित’
घटक पक्षांचे तळ्यात मळ्यात
पिंपरी, ता. १९ ः महापालिका निवडणूक ‘एकत्र लढवायची की स्वतंत्र’ याबाबत महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे शुक्रवारी (ता. १९) सायंकाळी सहापर्यंत एकमत झालेले नव्हते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साथ हवी आहे, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) सोबत हवी आहे. पण, कॉंग्रेसला ‘मनसे’ निर्णय नकोसा वाटतो. वंचित बहुजन आघाडीचा मेळावा पिंपरीत झाला. मात्र, त्यानंतर पक्षातील वातावरण शांतच आहे. भाजपला विरोध करण्यासाठी वंचितही महाविकास आघाडीत येऊ शकते, अशी चर्चा आहे. मात्र, त्यास होकार मिळताना अद्याप दिसत नाही. त्यामुळे, पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीबाबत महाविकास आघाडी एकीपासून ‘वंचित’ राहील, असे सध्याचे चित्र आहे.
महापालिका निवडणुकीचा बिगूल सोमवारी (ता. १५) वाजला आहे. त्यापूर्वीपासून भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना व भारतीय रिपब्लिकन पक्ष (आरपीआय आठवले गट) महायुती म्हणून आणि कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाविकास आघाडी म्हणून महापालिका निवडणूक लढतील की स्वतंत्र लढतील, अशी चर्चा सुरू आहे. ती अद्याप थांबलेली नाही.
महायुतीतील घडामोडी
भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेस स्वतंत्र लढणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. त्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुजोरा दिला आहे. त्यामुळे दोघांनी आपापल्या पक्षातील इच्छुकांच्या मुलाखती घेऊन मार्ग स्पष्ट केला आहे. परिणामी, भाजपसोबत शिवसेना व आरपीआय महायुती म्हणून लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महाविकास आघाडी
कॉंग्रेसने समन्वय समिती नियुक्त केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शहर पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेतली आहे. शिवसेना उबाठाला मनसेची साथ हवी आहे. मात्र, त्यास कॉंग्रेसचा नकार आहे. उबाठातील काही पदाधिकारी भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. दरम्यान, शिवसेना उबाठाच्या माजी आमदारांनी दोन्ही राष्ट्रवादींसोबत लढण्याबाबत शुक्रवारी सकाळी तयार दर्शवली आहे. मात्र, त्यांच्या पक्ष श्रेष्ठींकडून सायंकाळपर्यंत काहीही निर्णय नसल्याने ती केवळ चर्चा ठरली.
अन्य आघाडी घडामोडी
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर गेल्या आठवड्यात शहरात आले होते. पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक व सभाही घेतली होती. मात्र, त्यानंतरच्या हालचालींना फारसा वेग आलेला दिसत नाही. आम आदमी पक्षासह (आप) अन्य छोट्या पक्षांतही अद्याप फार हालचाली दिसत नाहीत.
भाजप प्रवेशाकडे लक्ष
राष्ट्रवादी कॉंग्रेससह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील माजी नगरसेवक, काही पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा तीन दिवसांपासून सुरू आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने राजीनामा दिला आहे. त्यामुळे भाजपमध्ये कोण प्रवेश करतो, त्यांची कोणत्या प्रभागातून निवडणूक लढविण्याची तयारी आहे, त्यानंतरच बहुतांश जणांच्या निवडणूक लढतीचे चित्र स्पष्ट होईल, अशी सद्यःस्थिती आहे.
‘वंचित बहुजन आघाडी महापालिका निवडणुकीत कोणाबरोबर आघाडी करणार अथवा किती जागा लढविणार याबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा अद्याप निर्णय झालेला नाही. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर याबाबत अंतिम निर्णय घेतील. त्यानंतरच पक्षाचे धोरण जाहीर केले जाईल.
- अनिल जाधव, प्रदेश उपाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी