सोमाटणे चौकात सातत्याने वाहतूक कोंडी

सोमाटणे चौकात सातत्याने वाहतूक कोंडी

Published on

सोमाटणे, ता. २० ः वाहन संख्येच्या तुलनेत अरुंद रस्ता, चौकात एकत्र आलेले पाच रस्ते, अतिक्रमणे, बेशिस्त वाहनचालक, ऊस वाहक ट्रॅक्टर तसेच अवजड कंटेनरमुळे सोमाटणे चौकातील वाहतूक कोंडी वाढली आहे. येथील कोंडीची समस्या सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी लोकप्रतिनिधींसह येथील नागरिकांनी केली आहे.
द्रुतगती मार्गावरील वाढलेला टोल वाहनचालकांना परवडत नसल्याने गेल्या वर्षभरापासून अनेक वाहनचालकांचा कल जुन्या पुणे-मुंबई महामार्गाने जाण्याकडे वाढला. याचा परिणाम पुणे-मुंबई महामार्गावर वाहनांची संख्या वाढली. वाढलेल्या वाहन संख्येच्या तुलनेत घोरावडेश्वर पायथा ते तळेगाव खिंड दरम्यान रस्त्याचे रुंदीकरण करून लेनची संख्या वाढवणे गरजेचे होते. परंतु जागेअभावी रस्ते विकास महामंडळाने महामार्गाची रुंदी केवळ दोन्ही बाजूला एक-एक लेनने वाढवली, टोलनाका हटवण्याऐवजी व टोलबूथची संख्या एकने वाढवून प्रत्येकी सात केली. याचा परिणाम वाहतूक कोंडी कमी होण्याऐवजी ती आणखी वाढली. सोमाटणे चौकात पुणे, मुंबई, शिरगाव, शंकरवाडी, परंदवडीसह द्रुतगती मार्गावरील सोमाटणे बाह्यमार्ग आदी पाच मार्ग चौकात एकत्र येतात. यामुळे चौकात वाहनांची संख्या प्रचंड वाढते. त्यातच सोमाटणे चौकात पुणे-मुंबई महामार्गालगत वाहतुकीला अडथळा ठरणारी अनधिकृत दुकाने सेवा रस्त्यावर आहेत. या अनधिकृत दुकानांमुळे सेवा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाल्याने परंदवडीकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना सोमाटणे चौकातील गर्दीतून वाट शोधत, वाहतूक कोंडीतील अडथळा पार करत पुढे जावे लागते. काही बेशिस्त वाहनचालक वाहतुकीला अडथळा ठरेल अशी रस्त्यालगत वाहने उभी करून पुणे, पिंपरी-चिंचवडकडे आपल्या कामासाठी अन्य वाहनाने जातात. संध्याकाळी परत आल्यानंतर ते उभी केलेली वाहने बाजूला घेतात.
सध्या संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू असून ऊस वाहतूक करणारे दोन ट्रॉलीचे ट्रॅक्टर सोमाटणे चौकात रस्ता ओलांडताना रस्त्यामध्ये दुभाजकात अधिक वेळ उभे राहतात व रस्ता मिळेल तेव्हा पुढे जातात, या ट्रॅक्टरमुळे सर्वच बाजूची वाहतूक ठप्प होते. गेल्या दहा वर्षात उर्से, बेबडओहोळ येथील कारखानदारी वाढली असून या कारखान्यासाठी कच्चा माल वाहून नेणाऱ्या अवजड कंटेनरची संख्या वाढल्याने कोंडी वाढली. शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी कोंडीत भर पडते. याचा त्रास प्रवाशांबरोबर स्थानिक नागरिक, सोमाटणे येथील रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णवाहिकांना होतो. प्रसंगी वाहतूक कोंडीमुळे वेळेत उपचार न मिळाल्याने रुग्णाच्या जिवावर बेतले जाते. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पूर्ण वेळ वाहतूक पोलिस कार्यरत असूनही अरुंद रस्ता व अतिक्रमणामुळे कोंडी सोडवण्यात पोलिसांना मर्यादा आल्या आहेत.
सोमाटणे येथील वाहतूक कोंडीवर तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी आमदार सुनील शेळके यांनी अधिवेशनात केली. परंतु, अद्याप काहीच उपाययोजना सुरू झालेली नाही.


उपाययोजना
-रस्ता रुंदीकरण
-अतिक्रमण काढणे
-टोलनाका अन्यत्र हलवणे
-वाहतूक पोलिसांची संख्या वाढवणे
-बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करणे

वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रस्ते विकास महामंडळाने रस्ता रुंदीकरण करावे, रस्त्यालगतची अतिक्रमणे काढावी.
-राजेश मुऱ्हे, माजी सरपंच

वाहतुकीला अडथळा ठरणारी रस्त्यालगतची अतिक्रमणे तातडीने हटविली जातील.
-राकेश सोनवणे, कार्यकारी अभियंता, रस्ते विकास महामंडळ पुणे


Smt2 0Sf1,2,3.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com