प्रभागनिहाय मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध

प्रभागनिहाय मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध

Published on

पिंपरी, ता. २० : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने महापालिकेच्या निवडणूक विभागाने राज्य निवडणूक आयोगाच्या नियम व तरतुदींचे पालन करून तयार केलेली प्रभागनिहाय अंतिम मतदान केंद्रांची यादी शनिवारी (ता. २०) प्रसिद्ध केली. ही अंतिम मतदान केंद्रांची यादी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नागरिकांच्या सोयीसाठी प्रभागनिहाय अंतिम मतदान केंद्रांची यादी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील निवडणूक विभाग, सर्व निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालये तसेच आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी कोणत्याही प्रकारचा गोंधळ किंवा गैरसोय होऊ नये, यासाठी मतदारांनी आपले संबंधित मतदान केंद्र कोणते आहे, याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन निवडणूक विभागामार्फत करण्यात आले आहे. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखत मतदारांना सुलभ आणि सुरक्षित मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही अंतिम यादी तयार करण्यात आली असल्याचेही निवडणूक विभागातून सांगण्यात आले.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक प्रक्रियेतील पुढील टप्प्यांसाठी अंतिम मतदान केंद्रांची यादी तयार करण्यात आली असून, मतदान प्रक्रियेत सुलभता, पारदर्शकता आणि मतदारांना सोयीची व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही प्रभागनिहाय अंतिम मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
---

Marathi News Esakal
www.esakal.com