राष्ट्रवादीची लवकरच पॅनेल निश्चिती
पिंपरी, ता. २३ : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी प्रक्रियेला वेग आला आहे. शहरातील ४५० इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण झाल्या असून, या प्रक्रियेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट लक्ष घालत मुलाखती मार्गी लावल्या आहेत. येत्या चार दिवसांत उमेदवारांचे पॅनेल निश्चित केले जाणार असून, ख्रिसमसनंतर अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
महापालिका निवडणुकीसाठी २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होत असली तरी अद्याप कोणत्याही पक्षाने पॅनेल जाहीर केलेले नाही. उमेदवारांची नावेही गोपनीय ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची धावपळ सुरू असून, प्रभागनिहाय विजयाची गणिते मांडली जात आहेत. पक्षप्रवेशांना देखील मोठे महत्त्व आले असून, भाजप आणि राष्ट्रवादी या दोन प्रमुख पक्षांमध्ये माजी नगरसेवकांची आवक-जावक सुरू आहे.
विशेष म्हणजे, अलीकडच्या काळात राष्ट्रवादीतील अनेक तगडे माजी नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाल्याने राष्ट्रवादीसमोर उमेदवार निवडीचे आव्हान उभे राहिले आहे. अनुभवी, विजयी क्षमता असलेले आणि स्थानिक पातळीवर प्रभावी उमेदवार शोधण्यासाठी पक्षाला कसरत करावी लागणार असल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः लक्ष घालून इच्छुकांच्या मुलाखती घेण्यावर भर दिला आहे. शहरातील सर्व प्रभागांमधून आलेल्या इच्छुकांच्या मुलाखती पूर्ण करण्यात आल्या असून, उमेदवारांची ताकद, स्थानिक राजकीय समीकरणे, अंतर्गत सर्वेक्षण, तसेच विरोधकांची स्थिती याचा सखोल अभ्यास करून उमेदवारी दिली जाणार आहे. राष्ट्रवादीकडून ख्रिसमसनंतर पॅनेल निश्चित करून अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे आगामी काही दिवसांत महापालिका निवडणुकीतील राजकीय घडामोडींना अधिक वेग येण्याची शक्यता आहे.
या प्रभागात बलाढ्य स्थान
सध्या प्रभाग क्रमांक पाच, सात, आठ, नऊ, दहा, बारा, वीस, एकवीस या प्रभागात राष्ट्रवादीचे बलाढ्य उमेदवार उभे राहणार आहेत. त्यांच्यावर इतर उमेदवार विजयी करण्याची जबाबदारी असणार आहे. यांच्यासह इतर प्रभागात बलाढ्य उमेदवार शोधण्याची स्थिती असणार आहेत.
नगरपरिषदांच्या यशस्वी निकालानंतरही शहरात शांतता
पुणे जिल्ह्यात नगर परिषद निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठे यश मिळाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात सकारात्मक वातावरण आहे. याचा फायदा पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत करून घेण्यास शहर पदाधिकाऱ्यांना यश येते का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
‘पक्षाकडे इच्छुक असलेल्या ४५० जणांच्या मुलाखती पार पडलेल्या आहेत. आता ख्रिसमसची सुट्टी झाल्यानंतर पॅनेल तयार केले जातील. त्यानंतर उमेदवारांची घोषणा होणार आहे.’
- योगेश बहल, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पिंपरी चिंचवड

