पादचाऱ्यांनी रस्ता ओलांडायचा कसा?
पिंपरी, ता. २३ : चौकात वाहतूक सिग्नल लागल्यानंतर काही वाहनचालक थेट झेब्रा क्रॉसिंगवरच वाहने नेतात. त्यामुळे रस्ता ओलांडण्याचा पादचाऱ्यांचा मार्गच बंद होतो. रस्ता ओलांडायचा तरी नेमका कुठून, असा प्रश्न त्यांना पडतो. अखेर त्यांना धोका पत्करून रस्ता ओलांडावा लागतो.
शहरातील विविध मार्गांवर अशीच स्थिती पाहायला मिळते. झेब्रा क्रॉसिंग आणि त्याआधी वाहने थांबण्यासाठीचा सफेद पट्टा (स्टॉप लेन) असतो. झेब्रा क्रॉसिंग पादचाऱ्यांसाठी सुरक्षित मार्ग मानला जातो. चौकात सिग्नल लागल्यानंतर वाहनचालकांनी कुठे वाहन थांबवायचे, पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी कोणती जागा असावी, हे स्पष्ट होण्यासाठी झेब्रा क्रॉसिंग व स्टॉप लेनचे पट्टे आखले जातात. यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांचाही प्रवास सुरक्षित होतो.
प्रत्यक्षात अनेक दुचाकी, चारचाकी वाहने झेब्रा क्रॉसिंगच्या सफेद पट्ट्यांवरच थांबतात. काही वेळा तर वाहने इतकी पुढे येतात की संपूर्ण झेब्रा क्रॉसिंगच वाहनांनी व्यापले जाते. त्यामुळे वृद्ध नागरिक, महिला, लहान मुले तसेच दिव्यांग व्यक्तींना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते.
या परिस्थितीमुळे पादचाऱ्यांना वाहनांच्या मधून वाट काढत, सिग्नल सुटण्याच्या आधी किंवा सुटल्यानंतर घाईघाईत रस्ता ओलांडावा लागतो. याच वेळी समोरून वाहने वेगात येत असल्याने अपघाताचा धोका अधिक वाढतो.
शहरातील निगडीतील लोकमान्य टिळक चौक, भक्ती-शक्ती चौक, प्राधिकरण चौक, खंडोबा माळ चौक, चिंचवड स्टेशन चौक, मोरवाडी चौक, पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, नाशिक फाटा चौक, तळवडे चौक, कॅनबे चौक, थरमॅक्स चौक, केएसबी चौक, काळेवाडी फाटा आदी ठिकाणी हे चित्र पाहायला मिळते. विशेषतः गर्दीच्या वेळी बाजारपेठा, शाळा, महाविद्यालये, रुग्णालय परिसरातील चौक अधिक धोकादायक ठरत आहेत.
------------
सफेद पट्टे झाले दिसेनासे
शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे दिसेनासे झालेले आहेत. काही ठिकाणी रस्ते रुंदीकरणानंतर नव्याने रेषा काढल्या आखल्या नाहीत. तसेच पदपथावरील अतिक्रमण, उभ्या वाहनांमुळे पादचाऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागत असल्याचेही चित्र विविध ठिकाणी दिसून येते.
------------------------
दहा हजार ६१९ वाहनचालकांवर कारवाई
झेब्रा क्रॉसिंगवर वाहन उभे करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. या वर्षात १ जानेवारी ते अद्याप पर्यंत अशा १० हजार ६१९ वाहनचालकांवर कारवाई केली असून, त्यांच्याकडून दंड वसूल केला आहे.
---------------------------------
वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित ठेवण्यासाठी वाहनचालकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र, अनेक चौकात सिग्नलच्या वेळी झेब्रा क्रॉसिंगवरच वाहने उभी केली जातात. यामुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे कठीण होते. जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो.
- तेजस गरुड, नागरिक
--------------------------------------

