सायन्स पार्क येथे राष्ट्रीय गणित दिन उत्साहात
पिंपरी, ता.२३ : प्रख्यात भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिन राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो. या अनुषंगाने पिंपरी चिंचवड सायन्स पार्क येथे गणिताच्या गमतीजमतीसह कार्यशाळा व विविध उपक्रम आयोजित करण्यात आले.
या उपक्रमात २०० हून अधिक विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी सहभाग नोंदविला. या वेळी अनुभवाधारित शिक्षणाला चालना देण्यासोबतच विविध संवादात्मक व कृतीप्रधान गणितीय उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनी विविध भौमितिक आकार व कोन, टॅनग्राम कोडी, धाग्यांद्वारा नमुना निर्मिती तसेच ‘मेझ रनर’ या खेळांच्या माध्यमातून गणितीय संकल्पनांचा अनुभव घेतला.
संपूर्ण दिवसभरात तीन सत्रांमध्ये विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले. यामध्ये गणित केवळ पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित नसून दैनंदिन जीवनाशी कसे जोडलेले आहे, यावर भर देण्यात आला. पालकांनी या कृतीप्रधान उपक्रमांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सहभागींना ‘गणित क्रियाकलाप संच’ भेट देण्यात आला. या वेळी श्रीनिवास रामानुजन यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. श्रद्धा खंपरिया, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकिश तिरपुडे, विक्रांत लोंढे, घनश्याम साके, मंजुश्री पवार, कल्पकघर टीम, विज्ञान शिक्षक, पालक आणि विद्यार्थी चमूने मेहनत घेतली.

