गुन्हे वृत्त
व्यावसायिक वादातून
दुकानदारावर प्राणघातक हल्ला
पिंपरी ः व्यावसायिक स्पर्धेच्या कारणावरून दुकानदाराला दगडाने डोक्यात मारून गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवारी (ता. २३) सकाळी अकराच्या सुमारास मारुंजी येथील कृष्णा किचन अँड इंटिरियर दुकानात घडली. काळूराम बिश्नोई, अशोककुमार बिश्नोई, रमेशकुमार बिश्नोई व मांगीलाल बिश्नोई (सर्व रा. मारुंजी, ता. मुळशी, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. मोहनलाल वरिंगाराम बिश्नोई (वय ४७, मारुंजी, ता. मुळशी) असे जखमी झालेल्या दुकानदाराचे नाव असून, त्यांनी याबाबत हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसांत संगनमत करून मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास फिर्यादी मोहनलाल यांच्या फर्निचर दुकानात आले. ‘या भागात फक्त आमचाच व्यवसाय चालेल’ अशी धमकी देत शिवीगाळ केली. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण करत दगडाने डोक्यात मारहाण करून फिर्यादीला गंभीर जखमी केले. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या फिर्यादीच्या मुलालाही मारहाण करण्यात आला. हिंजवडी पोलिस तपास करीत आहेत.
शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली ५६ लाखांची फसवणूक
पिंपरी ः बनावट शेअर ट्रेडिंग वेबसाइट व व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून ५५ लाख ८२ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी २८ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ५ जुलै २०२५ ते ३० ऑक्टोबर २०२५ या कालावधीत निगडी येथे ऑनलाइन माध्यमातून घडली. या प्रकरणातील पोलिसांनी विविध मोबाईल क्रमांकधारक व बनावट बँक खातेदार अशा २८ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रशांत शरद वैद्य (वय ४४, रुणाल बहार, निगडी, पुणे) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव असून, त्यांनी मंगळवारी (ता. २३) याबाबत निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी प्रशांत वैद्य यांना एका सोशल मीडिया ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. त्यांचा विश्वास संपादन करून केलेल्या गुंतवणुकीवर खात्रीशीर नफ्याचे आमिष दाखवले. बनावट वेबसाईटद्वारे ५५ लाख ८२ हजार रुपयांची गुंतवणूक करून घेतल्यानंतर त्यांना १४ कोटी १९ लाख ९१ हजार ५०७ रुपयांचा नफा झाल्याचे दाखविण्यात आले. फिर्यादी यांच्याकडे बँक चार्जेसच्या नावाखाली १९ लाख ८७ हजार ८८१ रुपयांची मागणी करण्यात आली. फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने गुंतवणूक केलेली रक्कम फ्रिज झाल्याचे सांगून आर्थिक फसवणूक करण्यात आली. निगडी पोलिस तपास करीत आहेत.
हॉटेलमधील वेटरला काटा-चमच्याने मारहाण
पिंपरी ः हातावर पाणी पडल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या दोन जणांनी वेटरवर काटा चमच्याने हल्ला करीत मारहाण करून जखमी केले. ही घटना मंगळवारी (ता. २३) सायंकाळी साडेचारच्या सुमारास पिंपरीतील कराची भवन हॉटेलमध्ये घडली. आशुतोष पांडुरंग काटे (वय ३३, पिंपळे सौदागर) व विजय उपाध्याय अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. विक्रम पेशूराम बत्तियारपूर (वय ३८, सायली पार्क, रहाटणी) असे मारहाणीत जखमी झालेल्या वेटरचे नाव असून, त्यांनी याबाबत पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ---
कारच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू
पिंपरी ः भरधाव वेगातील मोटारीने धडक दिल्याने एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (ता. २२) ताथवडेतील लोंढे वस्ती परिसरात घडली. रुद्राभिषेक प्रभातरंजन दास (वय ३२, माणगाव, ता. मुळशी, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या मोटारचालकाचे नाव आहे. माणिक ओव्हाळ (वय ४३, रा. ताथवडे) यांनी याबाबत हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अरुण ओव्हाळ (वय ४०, रा. मारणे वस्ती, माणगाव, मुळशी, पुणे) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. सोमवारी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास आरोपीने निष्काळजीपणे मोटार चालवून पादचारी अरुण ओव्हाळ यांना जोरदार धडक दिली. गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास हिंजवडी पोलिस
ठाणे करीत आहे.
गुटखा विक्रीप्रकरणी एकास अटक
पिंपरी ः छापा टाकून पोलिसांनी प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करीत एकाला अटक केली आहे. मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास चिखली येथील महालक्ष्मी कॉम्प्लेक्समध्ये ही कारवाई करण्यात आली. श्रवणकुमार आत्माराम देवासी (वय ३४, रा. चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्यांचा साथीदार महेंद्र देवासी यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकातील पोलिस हवालदार किरण जाधव (वय ३८) यांनी मंगळवारी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी बेकायदेशीररीत्या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करत असल्याचे आढळून आले असून सुमारे २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणाचा तपास चिखली पोलिस ठाणे करीत आहे.
चिखलीत ऑनलाइन जुगार अड्ड्यावर छापा
पिंपरी ः विनापरवाना ऑनलाइन गेम जुगारावर पोलिसांनी छापा टाकून एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई बुधवारी (ता. २३) दुपारी सव्वाएकच्या सुमारास चिखली येथील अंगणवाडी चौक परिसरात करण्यात आली. संदीप प्रकाश गायकवाड (वय २३, रा. मोशी टोल नाका, गायकवाड वस्ती, मोशी, पुणे; मूळ रा. अशोकनगर, निलंगा, जि. लातूर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याला नोटीस दिली आहे. पोलिस हवालदार के. जी. स्वामी यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अंगणवाडी चौक, मोरेवस्ती येथील गीता खानावळ हॉटेलसमोर एक बाजूने उघड्या असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये आरोपी विनापरवाना व बेकायदेशीररीत्या फन ॲण्ड जॉय या ऑनलाइन गेमवर लोकांकडून पैसे घेऊन जुगार खेळवत असल्याचे आढळून आले. छाप्यादरम्यान जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा १२ हजार ५१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास चिखली पोलिस ठाणे करीत आहे.
विनापरवाना देशी–विदेशी दारूचा साठा जप्त
पिंपरी ः विनापरवाना देशी व विदेशी दारू विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवल्याचा प्रकार पोलिसांच्या कारवाईत उघडकीस आला आहे. ही कारवाई मंगळवारी (ता. २३) सायंकाळी सातच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथील मनोहरनगर परिसरात करण्यात आली आहे. अतुल दिलीप राठोड (वय २३, मनोहर नगर, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे; मूळ रा. कोदरी, ता. महागाव, जि. यवतमाळ) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट चारमधील पोलिस हवालदार बाबाराजे मुंडे यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सवेरा बिअर शॉपीच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत आरोपी विनापरवाना व बेकायदेशीररीत्या देशी–विदेशी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने साठा जवळ बाळगत असल्याचे आढळून आले. कारवाईदरम्यान २३ हजार ८८० रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून, तळेगाव दाभाडे पोलिस तपास करीत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

