

पिंपरी, ता. २८ : पैशांचा वाद, गाडीने कट मारला, माझ्याकडे का पाहतो, दुसऱ्यासोबत का गेला, यांसारख्या किरकोळ कारणांवरून हल्ल्याच्या घटना वाढत आहेत. क्षणिक राग व खुन्नस यातून धारदार हत्यार, दांडक्याने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी होण्यासह एखाद्याचा जीवही जाऊ शकतो, याचे भानही राहत नाही. अशा घटना पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडत आहेत.
राग ही एक नकारात्मक भावना असून, त्याचा शरीरावर आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतो. राग जर अयोग्यवेळी आणि तीव्रतेने बाहेर पडला. तर समोरच्या व्यक्तीला नंतर तो कशाप्रकारे प्रतिक्रिया देईल, हे सांगता येत नाही. यातून भांडण, मारामारी किंवा इतर टोकाच्या घटनाही घडू शकतात. अगदी क्षुल्लक वादातून खून करण्यापर्यंत मजल जात आहे. किरकोळ कारणातून घडत असलेल्या या घटना चिंतेचा विषय ठरत आहेत.
कारणे
- मानसिक ताण वाढविणाऱ्या भावना, घटना, सतत आजूबाजूला घडणे, चुकीच्या संगतीत राहणे
- अपमानास्पद वागणूक, टीका सहन न होणे
- चिंता, असंतोष, निराशा. यामुळे रागाला खत पाणी मिळते
- जवळच्या व्यक्तीने निर्माण केलेल्या अडचणी
- विश्वासू व्यक्तीकडून झालेला अपेक्षाभंग, नकार मिळणे
- रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या निराशाजनक घटना
परिणाम
- रागातून वादविवाद, मारामारी या घटनांमुळे भविष्यात व्यक्तिगत आयुष्यात नकारात्मक परिणाम
- स्वतःला व कुटुंबालाही मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते.
- रागाचे प्रमाण जास्त व अयोग्य असेल तर नैराश्य भावना येऊन मानसिक संतुलन बिघडते
- मानसिक अस्वस्थता वाढते
- व्यक्तीच्या सर्जनशीलतेवर विपरीत परिणाम होतो. कल्पकता, विवेकबुद्धी हरवते
राग टाळण्यासाठी उपाय
- धैर्य, संयम, सकारात्मक विचार आणि आत्मनियंत्रण आवश्यक
- घडलेल्या घटनेवर, प्रसंगावर शांतपणे विचार करण्याची मानसिकता
- आपल्या जीवनशैलीत चांगले बदल आवश्यक
- वेळीच समुपदेशन, उपचार घेणे आवश्यक
‘‘राग हा आपल्या विचार करण्याच्या प्रक्रियेवर हल्ला करत असतो. व्यक्ती निराश, रागात, हताश अवस्थेत चुकीची कृती करण्याची दाट शक्यता असते. रागाला समजून घेण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी चिडचिड, मनावरील दडपण, जाणवणारी निराशा, चिंता, भारावून गेल्याची भावना ओळखून आणि त्याचे निराकरण वेळीच करून आपण आपल्या रागावर अधिक नियंत्रण मिळवू शकतो आणि तो नियंत्रणाबाहेर जाण्यापासून रोखू शकतो.
- वंदना मांढरे, समुपदेशिका
दृष्टिक्षेपात घटना
- ४ मार्च ः बाथरूमचा दरवाजा वाजवल्याच्या कारणावरून चिंचवडमध्ये तरुणाला रॉडने मारहाण, जुन्या भांडणातून चिखलीत महिलेला बेदम मारहाण, किरकोळ कारणावरून पिंपरीत एकाला दांडक्याने मारहाण
- ५ मार्च ः दुचाकीवर जाताना आवाज दिल्याच्या कारणावरून दारुंब्रेत अल्पवयीन मुलाला दगडाने जिवे मारण्याचा प्रयत्न
- ६ मार्च ः आणखी दारू न पाजल्याच्या कारणावरून चाकणजवळील भोसे येथे तरुणाला रॉडने मारहाण
- ७ मार्च ः भोसरी येथे किरकोळ कारणावरून तरुणाला काठीने बेदम मारहाण
- ८ मार्च ः पैशाच्या वादातून दापोडी येथे अल्पवयीन मुलावर धारदार हत्याराने वार
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.