खड्ड्यांमुळे मणक्याला ‘दणका’; वाहनांनाही फटका
शहरातील रस्त्यांची पावसामुळे चाळण; डांबरीकरण उखडून खडीवरून घसरण्याच्या घटना

खड्ड्यांमुळे मणक्याला ‘दणका’; वाहनांनाही फटका शहरातील रस्त्यांची पावसामुळे चाळण; डांबरीकरण उखडून खडीवरून घसरण्याच्या घटना

Published on

पिंपरी, ता. २५ ः पूर्व मोसमी पावसाने शहर परिसरात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे शहरातील रस्त्यांची चाळण झाली होती. ठिकठिकाणी पाणी साचले होते. महामार्गांसह अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडले होते. थोडी उघडीप मिळाल्याने महापालिकेने खड्डे बुजवायला सुरवात केली. काही ठिकाणी डांबरीकरणही केले. मात्र, पुन्हा पावसाने हजेरी लावली आणि जोरदार मोसमी पावसाची त्यात भर पडली. त्यामुळे डांबरीकरणासह खडी, माती, मुरुमाने बुजवलेले खड्डे, चर पुन्हा उखडले आहेत.
मोठ्या रस्त्यांसह अंतर्गत सर्वच रस्त्यांवर खड्डे, पसरलेली खडी, सांडपाणी वाहिन्यांचे खचलेले चेंबर यांची भर पडली आहे. दुरुस्तीचा दावा प्रशासन करत असले तरी, रस्तोरस्तीच्या खड्ड्यांमुळे दुचाकी व सायकलस्वारांसह पादचाऱ्यांना चालणे अवघड झाले आहे. खड्ड्यांचा अंदाज न आल्याने छोट्या चारचाकी वाहनांसह प्रवाशांच्या मणक्याला ‘दणका’ बसून, नुकसानीमुळे आर्थिक फटका बसत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांवर खड्डे पडल्याच्या तक्रारी नागरिकांकडून महापालिकेकडे येत आहेत. त्यानुसार खड्डे बुजविण्याचे कामही सुरू असल्याचे दिसते. मात्र, गेल्या महिन्यापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे बुजवलेले खड्डे पुन्हा उघडे पडत असून, त्यांची संख्या वाढत आहे. त्यावर उपाय म्हणून महापालिकेने खड्डे दुरुस्तीसाठी स्वतंत्र पथकांची नेमणूक केली आहे. नागरिकांना खड्ड्यांची तक्रार करता यावी, यासाठी खड्डे व्यवस्थापन प्रणाली ॲप विकसित केले आहे. त्यासह महापालिकेचे संकेतस्थळ आणि आठही क्षेत्रीय कार्यालयांत नागरिकांना तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, पावसामुळे पडलेल्या खड्ड्यांसह विविध वाहिन्यांसाठी शासकीय, निमशासकीय यंत्रणा व खासगी व्यक्तींना खोदलेल्या चरांची त्यात भर पडली आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक रस्त्यावर खड्डे दिसत आहेत. खड्डे बुजवून डांबरीकरणाने रस्त्यांची डागडुजी प्रशासनाकडून सुरू असल्याचे दिसते.

पावसाळ्यापूर्वीची स्थिती
साधारणतः सात जून रोजी पावसाळा सुरू होतो. मात्र, यावर्षी मे महिन्याच्या मध्यातच पूर्व मोसमी पावसाने हजेरी लावली होती. विक्रमी पाऊस झाल्याने व त्यापूर्वीच्या काळात केलेल्या मोजणीत महापालिकेला ८५५ खड्डे आढळले होते. त्यात पावसामुळे पडलेल्या खड्ड्यांची संख्या ५०१ होती. निगडी, आकुर्डी, भोसरी, सांगवी, वाकड, थेरगाव, चिखली, थेरगाव परिसरातील रस्त्यांवर सर्वाधिक खड्डे आढळले होते. ते खडी, मुरूम, डांबर, पेव्हिंग ब्लॉक, कॉंक्रिटच्या साह्याने बुजविण्याची कार्यवाही महापालिकेने केली होती. मात्र, पाऊस सतत सुरू राहिल्याने खड्ड्यांची संख्या ‘जैसे थे’ राहिली.

शहरातील सद्यःस्थिती
पूर्व मोसमी पावसाने विश्रांती न घेता लावलेली हजेरी आणि मोसमी पावसाचे वेळेपूर्वीच झालेले जोरदार आगमन यामुळे पाणी साचून रस्तोरस्ती खड्डे दिसू लागले आहेत. त्यातून नागरिकांसह वाहनचालकांना वाट काढावी लागत आहे. खड्ड्यांमुळे पसरलेल्या खडीमुळे दुचाकी घसरून अपघात होत आहेत. चारचाकी छोट्या वाहनांसह दुचाकी व रिक्षांचेही मोठे नुकसान होत आहे. खड्ड्यांपासून बचावासाठी वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. परिणामी, बहुतांश रस्त्यांवरील वाहतूक संथ गतीने होत असल्याने गर्दीच्या वेळी अर्थात सकाळी व सायंकाळी प्रत्येक रस्त्यावरील कोंडीत भर पडत आहे.

प्रशासनाचा दावा
रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू असल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. शहरातील खड्ड्यांची मोजणी केली जात आहे. प्रशासनाच्या मते पावसाळ्यापूर्वी ८५५ आणि पावसामुळे ५०१ असे एक हजार ३५६ खड्डे सात जूनपर्यंत शहरात आढळले होते. बुजवलेल्या ठिकाणी पुन्हा खड्डा पडल्यास ठेकेदाराकडून ते पुन्हा बुजवून घेतले जात आहेत. डांबर, कोल्ड मिक्स, बीबीएम अर्थात खडी, पेव्हिंग ब्लॉक, सिमेंट काँक्रिट यांच्या मदतीने खड्डे बुजविले जात आहेत. नवीन रस्त्यांवरील खड्डेही संबंधित ठेकेदारांकडून बुजवून घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

गंभीर स्थितीतील प्रातिनिधिक रस्ते
- चऱ्होलीतील दाभाडे वस्तीतील मुख्य रस्ता आणि मरकळकडे जाणारा बाह्यवळण मार्ग
- देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गाचे मामुर्डी ते वाकडपर्यंतचे दोन्ही बाजूचे सेवा रस्ते
- मुंबई-पुणे महामार्गावरील निगडी ते दापोडीपर्यंतचा कॉंक्रिटचा मुख्य रस्ता आणि डांबरी सेवा रस्ते
- वाकडमधील भुजबळ चौक व भूमकर चौकातून हिंजवडी जोडणारे दोन्ही रस्ते
--
फोटोः 26115

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com