क्राइम
दारूंब्रेतील दारूभट्टीवर छापा
पिंपरी ः शिरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत दारूंब्रे येथे सुरू असलेल्या दारूभट्टीवर शिरगाव पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. या कारवाईमध्ये ७० हजार रुपये किंमतीचे २००० लिटर रसायन नष्ट करण्यात आले. निर्जना प्रेम मारवाडी (वय २५, रा. वाकड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिस शिपाई हणमंत माने यांनी शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दारूंब्रे येथे संत तुकाराम साखर कारखान्याच्या पाठीमागील मोकळ्या मैदानात एका महिलेने दारूभट्टी लावली असल्याची माहिती शिरगाव पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दारूभट्टीवर छापा मारला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी महिला पळून गेली.
पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तरुणास अटक
पिंपरी ः बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट दोनने एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे असा ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई वाल्हेकरवाडी येथे करण्यात आली. विशाल सुनील काळे (वय २९, रा. शिरूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस शिपाई शिवाजी मुंढे यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाल्हेकरवाडी येथे केजुबाई बंधारा येथे जाणाऱ्या रस्त्यावर एक तरुण पिस्तूल घेऊन आला असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट दोनला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून काळे याला ताब्यात घेतले.
गुटखा साठवणूक प्रकरणी एकास अटक
पिंपरी ः प्रतिबंधित गुटख्याची साठवणूक केल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली. ही कारवाई तळेगाव दाभाडे येथे करण्यात आली. पियुष आनंद अगरवाल (वय २५, रा. तळेगाव) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिस शिपाई संदीप गंगावणे यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अगरवाल याने एका खोलीत गुटखा साठवून ठेवला. त्याबाबत खंडणी विरोधी पथकाला माहिती मिळाली. पोलिसांनी छापा मारून कारवाई करत ३० हजार २०४ रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला.
दुचाकीची लोखंडी पट्टी धडक, एकाचा मृत्यू
पिंपरी ः रस्त्याच्या बाजूला लावलेल्या लोखंडी सुरक्षा पट्टीला एका भरधाव दुचाकीची धडक बसली. या अपघातात दुचाकीवरील सहप्रवाशाचा मृत्यू झाला. हा अपघात ३० मे रोजी घडला असून या प्रकरणी २४ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. प्रशांत बसवराज रेड्डी (वय २४) असे मृत सहप्रवाशाचे नाव आहे. या प्रकरणी रेवणसिद्ध शिवराज रेड्डी (वय २७, रा. मोशी) यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमर हुल्लेप्पा गुंगे (वय ३०, रा. चिखली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी रेवणसिद्ध यांचा चुलत भाऊ प्रशांत रेड्डी हा त्याचा मित्र अमर गुंगे याच्या दुचाकीवरून जात होता. देहूरोड येथून निगडीच्या दिशेने येत असताना जकात नाक्याजवळ दुचाकीची रस्त्याच्या बाजूला असलेल्या लोखंडी सुरक्षा पट्टीला धडक बसली.
हॉटेल चालकासह तिघांना मारहाण
पिंपरी ः हॉटेलमधील ग्राहकांशी दोघेजण वाद घालत होते. त्यामुळे हॉटेल चालकाच्या पत्नीने जाब विचारला असता त्यांनी तिघांना बेदम मारहाण केली. ही घटना भोसरी येथे घडली. जयराम अण्णाराव बिरादार (वय ४७, रा. भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सूरज गायकवाड, कुमार रामभाऊ ठोके (रा.भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयराम बिरादार यांचे भोसरी येथे हॉटेल आहे. त्यांच्या हॉटेलमध्ये आरोपी आले. त्यांनी हॉटेलमधील ग्राहकांशी विनाकारण वाद घालण्यास सुरुवात केली. भाचा दत्तात्रय भांडण सोडविण्यासाठी गेला असता आरोपींनी त्यालाही मारहाण केली. तसेच फिर्यादी यांनाही मारहाण केली.
हातोडीने डोक्यात मारहाण
पिंपरी ः घरात बसलेल्या व्यक्तीच्या पाठीमागून येऊन डोक्यात हातोडीने मारहाण करत गंभीर जखमी केले. ही घटना पिंपळे गुरव येथे घडली. वैभव असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या पत्नीने सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार समर्थ महावीर
सुतार (रा.पिंपळे गुरव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी यांचे पती वैभव घरी सोफ्यावर बसले होते. त्यांच्याकडे दोन वर्षांपूर्वी घरकाम करणाऱ्या महिलेचा मुलगा समर्थ हा वैभव यांच्या पाठीमागून आला. त्याने वैभव यांच्या डोक्यात हातोडीने मारून गंभीर दुखापत केली.
हॉटेलमधील कामगाराला मारहाण
पिंपरी ः हॉटेलमध्ये काम करणारा कामगाराला मारहाण करून हॉटेल मालकाला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना बावधनमधील आशापुरा हॉटेल येथे घडली. चोथाराम प्रेमाजी देवासी (वय २७,रा. बावधन) यांनी या प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आदित्य बिचवडे आणि त्यांच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी देवासी हे आशापुरा हॉटेलमध्ये काम करतात. सोमवारी दुपारी आरोपी हॉटेलमध्ये आले. त्यांनी देवासी यांना विनाकारण मारहाण केली. त्यानंतर हॉटेल मालक पुआराम यांना जीवे मारण्याची धमकी देत हॉटेल मधील साहित्याची तोडफोड केली.
बनावट कागदपत्रांद्वारे बँकेला ३८ लाखांना गंडा
पिंपरी ः घर खरेदी करण्यासाठी एका बांधकाम व्यावसायिकाच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून एका व्यक्तीने बँकेत सादर केली. त्यानंतर बांधकाम व्यावसायिकाकडून घर खरेदी न करता नुकसान भरपाई बंधपत्र दिले. हप्ते न भरता बँकेची ३८ लाखांची फसवणूक केली. ही घटना २८ डिसेंबर २०२१ ते ११ मार्च २०२४ या कालावधीत चिखली येथील युको बँक शाखेत घडली. या प्रकरणी ३१ वर्षीय व्यक्तीने एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रकाश नरेन निहलानी (वय ५०, रा. पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निहलानी याने तळेगाव येथील कोंडेश्वर को-ऑप हाउसिंग सोसायटी येथे फ्लॅट घेण्यासाठी रेनएसेन्स एंटरप्रायजेस व कोंडेश्वर सोसायटी यांच्यासोबत एग्रीमेंट टू सेल तयार केले. करारपत्राच्या आधारावर त्याने युको बँकेकडून ३८ लाख रुपये होमलोन घेतले. त्यासाठी बांधकाम व्यावसायिकाची बनावट कागदपत्रे त्याने बँकेत जमा केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

