उपनगरांतील रस्त्यांवर खड्डेच खड्डे शहरातील अवस्थाही बिकट ः वाहनचालकांना करावी लागतेय कसरत
पिंपरी, ता. २५ ः शहरात पडणाऱ्या जोरदार पावसामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडले असून, येता-जाता वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. महापालिकेच्या स्थापत्य विभागाने काही भागातील खड्ड्यांची तात्पुरती मलमपट्टी केली. मात्र, पुन्हा पडलेल्या पावसात त्याच ठिकाणी मोठे खड्डे तयार झाले आहेत. परिणामी, वाहनचालकांना खड्ड्यातून हादरे सहन करत मार्ग काढावा लागत आहे. पाण्यामुळे खड्ड्यांची खोली आणि व्याप्ती लक्षात येत नसल्यामुळे अचानक दुचाकी खड्ड्यात गेल्यानंतर दुचाकीस्वारांना मणक्याच्या असह्य वेदना सहन कराव्या लागत आहेत.
पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित झालेल्या पिंपळे सौदागर भागातील कुणाल आयकॉन ते काटे वस्ती या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. या भागात अनेक सोसायट्या, शाळा, कार्यालये, मॉल्स, व्यापारी गाळे, बाजारपेठ असल्यामुळे या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यातच रस्त्याचे काम सुरु असल्यामुळे एकेरी वाहतूक सुरु आहे. खड्ड्यांतून कशीबशी वाहने काढत पुढे मार्ग शोधावा लागत आहे. पावसामुळे पडलेल्या खड्ड्याचा वाहतुकीला अडथळा होत आहे. कुंजीर चौकात मोठमोठे खड्डे पडले आहेत. पीके चौकातील रस्त्याला बसवलेले दगड निखळून रस्ता निसरडा बनला आहे. याठिकाणी दुचाकी घसरण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागत आहे.
तसेच, रहाटणी भागात तांबे कॉर्नर ते काळेवाडी, तापकीर मळ्यातून पिंपरी गावठाणाला जोडणाऱ्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. रहाटणीतून पिंपरी गावात जाणाऱ्या नागरिकांना या खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. धर्मवीर संभाजी महाराज उद्यान ते नखाते वस्ती चौक अंतर्गत एकेरी मार्गावर देखील खड्डे पडले आहेत. दुचाकी व चारचाकी वाहने एकाच मार्गाने येत-जात असल्यामुळे या रस्त्यावरील कोंडी नागरिकांची डोकेदुखी बनली आहे. तसेच, औंध-रावेत रस्त्यावर सोळा नंबर येथील भुयारी मार्गातील रस्त्यावरचे डांबर निघून गेल्यामुळे रस्ता निसरडा झाला आहे. चारचाकी वाहनांसाठी प्रवेश बंदी असली तरी दुचाकी आणि तीनचाकी वाहनांमुळे रस्ता उखडला आहे. लक्ष्मणनगर येथील भुयारी मार्गात देखील अशीच परिस्थिती आहे. भुयारी मार्गातील डांबरी रस्ता निसरडा बनल्यामुळे दुचाकीचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
खड्ड्यातून बाजारपेठेत
वाकड येथील छत्रपती चौकातील रस्त्यावर बसवलेले दगड निखळून पडल्यामुळे खड्डा तयार झाला आहे. त्याचबरोबर पिंपरी गावठाणात पवनेश्वर मंदिर ते जयहिंद महाविद्यालयापर्यंत काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्याचबरोबर साई चौकातून लोहमार्गाच्या भुयारी मार्गात ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. अर्धा फूट खोलीचे खड्डे असल्यामुळे दुचाकीचालकांना हादरे सहन करत मार्ग काढावा लागत आहे.
खड्डे असणारे रस्ते व चौक
- पिंपळे सौदागर ः शिवार चौक ते काटे वस्ती रस्ता
- पिंपळे सौदागर ः कुंजीर चौक आणि पीके चौक
- रहाटणी ः तांबे कॉर्नर ते काळेवाडी, तापकीर मळा रस्ता
- रहाटणी ः धर्मवीर संभाजी उद्यान ते नखाते वस्ती रस्ता
- थेरगाव ः सोळा नंबर आणि लक्ष्मणनगर भुयारी मार्ग
- वाकड ः छत्रपती चौक
- पिंपरी ः पवनेश्वर मंदिर ते जयहिंद शाळा
- पिंपरी ः साई चौक भुयारी मार्ग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

